देह तव आहे प्रारब्धा
3004.
देह तव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी का सीण वाहू भार ॥१॥
सरो माझा काळ तुझिया चिंतने । कायावाचामने इच्छीतसे ॥धृपद॥
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणे जन्मे ॥२॥
तुका म्हणे आलो सोसीत संकटे । मी माझे वोखटे आहे देवा ॥३॥
अर्थ :
देह तर प्रारब्धाच्या आधीन आहे मग मी याचा शीण आणि भार का वाहू ? देवा आता माझा सर्व काळ तुमच्या चिंतनातच जावा हीच इच्छा मी कायावाचामनाने करीत आहे. हे दातारा आता या जन्मामध्ये तरी मला यावाचून दुसरा कोणताही लाभ दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अहो मी अनेक योनीपासून अनेक प्रकारचे संकटे सोसीत इथपर्यंत आलो आहे याला कारण म्हणजे मी आणि माझे हा खोटा भ्रम आहे.
