गीतामाहात्म्य - अभंग
3546.
गीतामाहात्म्य - अभंग ३५४६ ते ३५५०
गीतेचें महिमान ऐकावे श्रवणीं । सावधान सज्जनीं द्यावे आता ॥१॥
जयाचे अंतरी वसे नित्य गीता । पावन तत्वता ब्रह्मरुप ॥२॥
गीता म्हणता ऐसे दोन्हीच अक्षरे । पाप ते निर्धारे दिशा लंघी ॥३॥
भगवदगीता पठण सर्वकाळ ज्यासी । मोक्षाची तो राशी मूर्तिमंत ॥४॥
गीता म्हणता त्यासी काय पुण्य आहे । इतिहास पाहे पुराणींचा ॥५॥
पार्वतीयेप्रती शिवे सांगितले । अध्यात्म बोलिले ब्रह्मविद्या ॥६॥ ’
ब्रह्मरुप त्याचे स्वये चित्त झाले । बोलणे खुंटले आहे नाही ॥७॥
नित्य म्हणता गीता वाचेसी स्मरण । केलिया पठण पुण्य काय ॥८॥
दोषाचे पर्वत भस्म होती तेणे । गीतेचे पठण केलियानें ॥९॥
श्रवण पठण गीतेचे पूजन । सर्वही साधन कलियुगीं ॥१०॥
पद्मपुराणीचें सांगितले सार । गीता आहे थोर ब्रह्मविद्या ॥११॥
सर्वही पातकें जळोनियां जाती । अर्जुना श्रीपती बोलियेला ॥१२॥
गीता अभ्यासितां कळे सारासार । महिमा आहे थोर पठणाचा ॥१३॥
गीता म्हणता आहे पापा प्रायश्चिता । मुक्ति सायुज्यता वरी त्यासी ॥१४॥
गीता म्हणता जाण भागीरथी स्नान । पृथ्वीचि दान दिधली तेणे ॥१५॥
गीता ध्याई नर सर्वदा तो सुची । सर्वही तीर्थांची महिमा तेथे ॥१६॥
तीर्थक्षेत्रयात्रा देवाचे पूजन । यज्ञयाग दान उद्यापन ॥१७॥
धरणी पारणी नित्य उपोषण । पृथ्वीचे भ्रमण निराहारी ॥१८॥
जप तप व्रत नित्य अनुष्ठान । कर्म आचरण उपासना ॥१९॥
पुराण श्रवण वेदशास्त्री जाण । सर्वही साधन घडे त्यासी ॥२०॥
ब्रह्मविद्या गीता सर्वांचे साधन । करी जो पठण नित्य काळी ॥२१॥
एका जनार्दनी नित्य हेंचि ध्यान । पूर्ण समाधान घडे तेणे ॥२२॥
