वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › १८. निमि व वसिष्ठ कथा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088363 · अभंग क्र. १८

18.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय अठरावा ॥
रावणाचे राजा मरूत्ताच्या यज्ञाला जाणे

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मरूत्त राजाच्या यज्ञाला रावणाचे आगमन :

वेदवतीचें अग्निप्रवेशन । ते देखोनि दशानन ।
पुष्पकी आरूढोन पर्यटन । करिता झाला मेदनीतें ॥१॥
तदनंतरे मरूत्त भूपती । यज्ञ करीत होता उशीरपर्वतीं ।
मिळाले ऋषि देवपंक्तीं । मंत्राहुती घालीत होते ॥२॥
देवगुरूचा बंधु जाण । संवर्तनामें तो ब्राह्मण ।
जयाचे ज्ञान बृहस्पतिसमान । आचार्य पूर्ण यज्ञींचा ॥३॥
समस्त द्विजांसहित । होम करी राजा मरूत्त ।
तंव रावण देखिला येत । वरदोन्मत्त होवोनी ॥४॥
वरदानाचेंनि बळे । त्रैलोक्य जिंतीत चालिला सकळे ।
ते देखोनि द्विजदेवकुळें । अत्यंत भय पावलीं ॥५॥

रावणभयाने देवांनी निराळ्या योनींत प्रवेश केला :

तदनंतरे श्रीरघुपती । देव आणिक योनी प्रवेशती ।
ते कोण कोण जन्म धरिती । ते श्लोकार्थी सांगेन ॥६॥

इंद्रो मयुरः संवृत्तो धर्मराजस्तु वायसः ।
कृकलासो धनाध्यक्षो हंसो वै वरूणोऽभवत् ॥१॥

शचीपति झाला मयूर । धर्मराज वायसशरीर ।
कृकलास होवोनि कुबेर । हंसरूप वरूण झाला ॥७॥
राक्षसभयेंकरून । देवई वेष पालटोन ।
भयेकरीं राहिले लपोन । तंव रावण काय करी ॥८॥

रावणाचे मरुत्ताला युद्धाचे आव्हान :

रावण म्हणे रायासी । तू युद्ध करी आम्हांसी ।
नाही तरी हारविलें ऐसे वचनासी । उच्चारोनि बोलिजे ॥९॥
देखोनि रावणाची स्थिती । मग तो मरूत्त भूपती ।
कोण म्हणोनि रावणाप्रती । अट्टहासे पुसता झाला ॥१०॥
अट्टहासे गंभीर वचन । ऐकोनि संतोषला रावण ।
म्हणे तुवा केले गिरागर्जन । तेणे संतुष्ट मन झाले ॥११॥
तू कोणाचा कोठील कोण । येथे यावया काय कारण ।
आम्हांसी वांछितोसि रण । तेणे संतुष्ट मन झाले ॥१२॥
राया मी झालों सुप्रसन्न । मज कोण म्हणसी तरी ऐक सावधान ।
माझा ज्येष्ठ बंधु वैश्रवण । नाम रावण प्रसिद्ध माझे ॥१३॥
माझेनि धाके जाण । सुरासुर कंपायमान ।
देव दांतीं धरिती तृण । मानी कोण मजपुढे ॥१४॥
आपुलेनि सामर्थ्येकरून । म्या रणी जिंतला वैश्रवण ।
घेवोनि पुष्पक हिरोन । विराजमान विचरतसें ॥१५॥

रावणाची गर्वोक्ती ऐकून मरूत्ताने त्याचा धिक्कार केला :

ऐकोनि रावणाचे वचन । मग तो मरूत्त इक्ष्वाकुनंदन ।
रावणाप्रति काय वचन । निर्भत्सून बोलतसे ॥१६॥
धन्य धन्य तू दशानना । तुजसारिखा योद्धा या त्रिभुवना ।
माजि पाहां बंधूतें रणा । आणिला ऐसा न देखिला ॥१७॥
या त्रिभुवनामाझारी । ज्येष्ठ बंधु पितयासरी ।
त्याते जिंतोनि संपत्ति हरी । ऐसा नाही देखिला ॥१८॥
बंधु बंधूनें जिंतिले । ऐसे नाही पुराणीं ऐकिले ।
ते तुवा साच केले । रणी पाडिले अग्रजातें ॥१९॥
इतुक्या करोनि अधर्मा । पुढती श्लाघतोसि अधर्मा ।
तुजपरता पापात्मा । आणिक आम्हा दिसेना ॥२०॥
पूर्वी योद्धे अनेक । झाले ते ऐकिले सकळिक ।
बंधूस जिंतिले हे तुझेनि मुखें । आजि आपण ऐकिलें ॥२१॥
इतुके वदोनि भूपती । चाप घेतलें अति निगुतीं ।
बाण लाविलासे सिती । संग्रामाप्रती निघाला ॥२२॥

मरूत्ताची रावणाशी युद्ध करण्याची तयारी पाहून संवर्ताकडून प्रतिबंध :

मरूत्त जाता संग्रामासी । संवर्त बोले मरूत्तासी ।
म्हणे राया रणभूमीसी । अधिकार नाही जावया ॥२३॥
धर्मकार्य अवलंबून । त्यासि सांडोनि करिसी रण ।
तरी सर्वथा नसे जयो जाण । सत्य वचन हे माझे ॥२४॥
घरी माहेश्वरयज्ञ । अवलंबिल्या करावा पूर्ण ।
पूर्णाहुति न होता निंद्य रण । ऐसे जाणोन नवजावें ॥२५॥
यज्~झी न होता पूर्णाहुती । सांडोनि गृहस्थ विमुख होती ।
तयांच्या वंशा होय शांती । जाण नृपती मरूत्ता ॥२६॥

दीक्षितस्य कुतो युद्धं क्रूरत्व दिक्षिते कुतः ।
संशयश्च रणे नित्यं राक्षसश्चैव दुर्जयः ॥२॥

गुरूपदेशामुळे युद्धापासून मरूत्त परावृत्त
झालेला पाहून राक्षसांकडून यज्ञीय ब्राह्मणांचा संहार :

दीक्षितासी युद्ध कोणिकडे । दीक्षितासी क्रूरत्व कोठे घडे ।
दिक्षिते मन होमाकडे । निजनिवाडे लावावें ॥२७॥
दिक्षिते उठोनि प्रातःकाळी । स्नानसंध्या सारोनि कुंडाजवळी ।
बैसावें मग मंत्रोमेळीं । अग्नि तृप्त करावा ॥२८॥
ऐकोनि गुरूचे वचन । राजा सांडी धनुष्यबाण ।
अग्नीपासीं येवोनि आपण । सावधान बैसला ॥२९॥
ते देखोनि लंकानाथ । जिंतिले म्हणोनि आनंदत ।
शुकसारणादि प्रधान समस्त । अवघे म्हणत जयो स्वामी ॥३०॥
जिंतिले म्हणोनि गर्जन । करिते झाले राक्षसगण ।
आपुले ठायी श्लाघोन । उल्लास जाण पावले ॥३१॥
यज्ञीं होते पोते उद्राते । आचार्य ब्रह्मा भक्षिले त्याते ।
रक्त पिवोनि खाती मांसातें । निशाचर तृप्तीतें पावले ॥३३॥

रावण निघून गेलेला पाहून देवांनी आपले मूळचे रूप धारण केले :

रजिपातें जिंतोन । जयो पावला दशानन ।
मग पुष्पकी आरूढोन । अवनिपर्यटन करिता झाला ॥३४॥
रावण गेला देखोन । इंद्रादिक देवगण ।
निजरूप धरिते झाले जाण । सावधान अवधारा ॥३५॥
अमरेंद्र निजरूप धरोन । मयूराप्रति बोले वचन ।
म्हणे मी झालों सुप्रसन्न । वरदान तुज देतों ॥३६॥

इंद्राकडून मोराला वरदान :

हे माझे सहस्त्र नेत्र । ते तुझे पांखीं भासती निश्चित ।
ते तुज दिधले स्वतंत्र । अगा भुजागारे विहंगमा ॥३७॥
माझे नेत्र सहस्त्रवरी । तुढे बर्ह होती निर्धारी ।
आणि मी वर्षेन जळधारीं । तुज आनंद भारी होईल ॥३८॥
पूर्वी मयूराचे पांख नीळवर्ण । त्यावरी इंद्राचे वरदान ।
नीळवर्णी विचित्र पूर्ण । रंग जाण भासला ॥३९॥
तदनंतरे श्रीरघुपति । वरूण वदे हंसाप्रति ।
अगा ये पक्षिराजा धर्ममूर्तिं । प्रसन्न झालों मी येथे ॥४०॥

वरूणाचे हंसाला वरदान :

वरूण म्हणे हंसासि जाण । तुझे गंगातीरी क्रीडण ।
तुझे शरीर ओयासमान । संगी प्रभा पूर्ण भासेल ॥४१॥
ऐक माझी प्रसन्नता । पत्ररथ हंसनाथा ।
तुझा वर्ण मनोहर सौ म्यता । शशीसारिखा निर्मळ ॥४२॥
जैसा व्योमी समीरण । विचरतसे स्वेच्छेंकरून ।
तैसे तुझे उड्डाने गगन । शोभा गहन पावेल ॥४३॥
माझिया देहासमान । प्रभा होईल तोयचरा पूर्ण ।
जे जे ईप्सितें तुझे मन । ते मनोरथ जाण पावसी ॥४४॥
उदका तुज अति प्रीती । होईल विहंगमा निश्चिती ।
प्रीतीचें लक्षण ज्ञाते जाणती । प्रीतीनें प्रीती वाढतसे ॥४५॥
हंसा पूर्वी श्रीरघुनाथा । ऐक श्रावणारिसुता ।
वैश्रवण कृकलास वर देता । प्रत्युत्तरीं पै वदला ॥४७॥

कुबेराचे कृकलासाला वरदान :

कुबेर म्हणे कृकलासाप्रती । प्रसन्न झालों जाण निश्चिती ।
तुझे शरीर सुवर्णकांती । मी संतोषोन तुज देतों ॥४८॥
आणिक कृकलासा ऐक । तुझे मस्तकी शिखा देख ।
होईल जाण निःशेख । किंचित श्यामता शरीरी ॥४९॥
तदनंतरे धरणिजापती । यमराज हर्षानंदें चित्ती ।
कागाप्रति वदे वरदोक्ती । सुनिश्चितीं अवधारा ॥५०॥

यमाकडून कावळ्याला वरदान :

यम म्हणे कागासी । तुज मी प्रसन्न निश्चियेंसी ।
प्रीतीनें ऐक माझिया वचनासी । सावधान होवोनी ॥५१॥
दशाहाचा पिंड जाण । जे नर देती तुजलागोन ।
तयांसि होय स्वर्गगमन । अन्यथा जाण पै नव्हे ॥५२॥
जे नर मरण पावती । त्यांचे दहा दिवसांचे अंतीं ।
बळिप्रदान तुज देती । ते पावती स्वर्गासी ॥५३॥
आणिक तुज वरदान । देतो मी धर्मराज आपण ।
तुज होईल अमरपण । अमरत्वाचे लक्षण अवधारी ॥५४॥
शरीरी पीडा उपजोन । अनेक मरती प्राणिजन ।
तैसे तुज नाही जाण । देहआरोग्य सदा तुझे ॥५५॥
परहस्ते तुज मरण । होईल हे सत्य जाण ।
स्व-इच्छेने तुज मरण । नाही जाण पक्षिराजा ॥५६॥

एवं दत्वा वरांस्तेभ्यस्तस्मिन्यज्ञाश्रमे सुराः ।
निवृत्ते यज्ञसमये पुनः स्वविषयं गतः ॥३॥

यज्ञसमाप्तीनंतर देव आपापल्या लोकाला गेले :

ऐसा वर देवोनि तयांतें । यज्ञाश्रमी सुर जे होते ।
यज्ञसमाप्ति करोनि स्वकार्यातें । जाते झाले देवगण ॥५७॥
ते म्हणाल कोण कोण । तयांची नावें मी सांगेन ।
इंद्र यम कुबेर वरुण । हे मुख्य जाण चवघेही ॥५८॥
रावणाच्या भयेंकरीं । रूपे पालटलीं होती सुरीं ।
ते निजरुप धरोनि निर्धारी । आपुलालिया लोका पै गेले ॥५९॥
एका जनार्दना शरण । मी नेणे मूळींचें निरुपण ।
नेणे श्लोकपद अन्वय जाण । शास्त्रव्याख्यान मी नेणे ॥६०॥
मी नेणे कळाकुसरी । मी नेणे साहित्याची भरोभरी ।
नेणे सुगंधचातुरी । एका जनार्दनावाचूनी ॥६१॥
नेणे श्लोकिंचा श्लोकार्थ । नेणे नवरस कासिया म्हणत ।
नेणे प्रबंधरचना येथ । एका जनार्दनावांचूनी ॥६२॥
मी संतांचे लळिवाड । संत माझे पुरविती कोड ।
संतांवांचूनि भव अवघड । कोणाचेनि निवारे ॥६३॥
एका जनार्दना शरण । पुढे गोड निरुपण ।
पृथ्वीजयो पावेल दशानन । श्रोती सावधान ऐकिजे ॥६४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
मरुत्तयज्ञगमनं नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
ओंव्या ॥६४॥ श्लोक ॥३॥ एवं ॥६७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग