आता हे शेवटी असो पाय
3375.
आता हे शेवटी असो पायावरी । वदती वैखरी वागपुष्पे ॥१॥
नुपेक्षावे आम्हा दीना पांडुरंगा । कृपादानी जगामाजी तुह्मी ॥धृपद॥
बोळवुनी देह सांडियेली शुद्ध । तोडियेले भेद जीवशिव ॥२॥
तुका म्हणे मन तुमचे चरणी । एवढी आयणी पुरवावी ॥३॥
अर्थ :
देवा मी माझ्या वैखरीने जे काही तुझे गीतरुपी गुणगान गात व वागपुष्पे वर्णन करीत आहे ते शेवटी तुझ्या पायावरच असू दयावेत. हे पाडूरंगा आम्हा दीनांचे तुम्ही उपेक्षा करु नका जगामध्ये तुम्हीच एक कृपादान देणारे आहात. मी देहभावच नाहीसा केला आहे आणि जीव व शिव यामधील भेदच नाहीसा करुन तुझ्याशी एकरुप झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे मन तुमच्या चरणावर नेहमी असू दयावे एवढी माझी आर्त इच्छा तुम्ही पूर्ण करावी.
