वत्सासुर व बकासुर वध
93.
वत्सासुर व बकासुर वध.
चालियेल तेव्हा गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदाने ॥१॥
वत्साचिया वेषे वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥
पाहोनिया ऐसे तयासी मारिले । झोंकोनिया दिल्हे आकाशाते ॥३॥
चला आता जेवू बसू एके ठायी । काढारे लव-लाही शिदोरीया ॥४॥
गोपाळ मिळोनी आनंदे जेविले । ब्रह्मरस धाले कृष्णासंगे ॥५॥
उदक प्राशन करावया आले । बकाने देखिले कृष्णजीला ॥६॥
दुष्टबुद्धि तेव्हा देवासी गिळीत । ह्लदय जळत उगळीला ॥७॥
धरूनिया हाते उभाची चिरीला । आनंद देवाला न समाये ॥८॥
नामा ह्मणे आले घरासी सकळ । सांगताती बाळ वर्तमान ॥९॥
