आजी महासुखे सृष्टी भ
845.
आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती | जालीसे विकृती पापा तापा ॥१॥
चालिले देखोनि वैष्णव जगजेठी | उभविती वैकुंठी गुडिया देव ॥२॥
आले आले रे हरीचे डिंगर | वीर वारीकर पंढरीचे ॥३॥
ज्याची चरणधुळी उधळे गगनपंथे | ब्रह्मादिका तेथे जाली दाटी ॥४॥
एकमेकांपुढे उडविती माथे | म्हणती आम्हाते लागो रज ॥५॥
भक्ति प्रेमभाव भरले ज्यांच्या अंगी | नाचती हरिरंगी नेणताती लाजू ॥६॥
हर्षे निर्भर चित्ती आनंदे डोलती | हृदयी कृष्णमूर्ती भेटो आली ॥७॥
कोंदले हरिरूप देखती विश्वाकार | सुटले पाझर नयन कमळी ॥८॥
गुढिया रोमांकुरी सात्विके दाटले | गर्जती विठ्ठले नामघोष ॥९॥
मोरपिसा कुंचे भात गरुड टके | भार ते नेटके मिरविताती ॥१०॥
तेथे केशवाचे नामे तनु हे तुळिका केली | पायघडी घातली हरिच्या दासा ॥११॥
