मिरवी अंगी अवतार लेण
461.
मिरवी अंगी अवतार लेणी ।
विराजित कीर्ति भूषणी ।
मुगुट कंडले कोटी तरणी ।
तैसे तेज बंबाळ ॥१॥
कंठी शोभ्ला कौस्तुभमणि ।
पदकी चरित्र रत्नाच्या खेवणी ।
बाहुभूषणे दिव्याभरणी ।
जडित कंकणेसुशोभित ॥२॥
भक्तस्तवनाच्या सुमनमाळा ।
वेदमर्यादा कटी मेखळा ।
शास्त्रे वसने सोनसळा ।
पुराणे ठसे उमटले ॥३॥
शंख चक्र पद्म गदा ।
शोभल्या भुजा त्या सायुधा ।
असुरमर्दनी झळकती सदा ।
मोक्षदानी वैरिया ॥४॥
संतसनकादिक उदरवासी ।
भरला आनंद सावकासी ।
नाभिकमळ प्रजापतीसी ।
ठाव दिधला अखंड ॥५॥
लक्ष्मी अर्धागी विराजली ।
चरण सेविता निमग्न झाली ।
तोडर दानवांचा शिसाळी ।
वामनचरणी रुळतसे ॥६॥
गगां वामांगुष्ठिहुनी ।
जन्मली उध्दरावया अवनी ।
महादोषांची करीत धुनी ।
चालिली पूर्व समुद्रा ॥७॥
सकळ देवाचे समुदाये ।
सिध्दही येती वंदिती पाये ।
नारद कीर्तनी उभा ठाये ।
नृत्य करी स्वानंदे ॥८॥
निळा म्हणे उदार ऐसा ।
भक्तचकोरा चंद्रमा जैसा ।
पुंडिलिकाच्या भावासारिसा ।
विटे उभा ठाकला ॥९॥
