न करी रे मना काहीच क
2737.
न करी रे मना काहीच कल्पना । चिंती या चरणा विठोबाच्या ॥१॥
येथे सुखाचिया अमुपची रासी । पुढे कल्पनेसी ठाव नाही ॥धृपद॥
सुखाचे ओचिले साजिरे श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाही ॥२॥
तुका म्हणे येथे होईल विसावा । तुटतील धावा पुढिलिया ॥३॥
अर्थ :
हे मना तू कोणत्याही प्रकारच्या कल्पना करु नकोस केवळ या विठोबाचे चरणाचे चिंतन कर. अरे मना या विठोबाच्या चरणाजवळ अमूप सुखाच्या राशी आहेत आणि सुखाच्या राशीपुढे कोणत्याही कल्पनेला ठावच राहणार नाही. या विठोबाचे श्रीमुख म्हणजे सुखाचे उरलेले साजिरे स्वरुपच आहे आणि ते स्वरुप पाहिले की शोक मोह दु:ख हे नाश पावतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना विठोबाच्या चरणाजवळच तुला विसावा मिळेल आणि जन्ममरणाचे पुढे धावाच तुटून जातीन.
