काय करू मज नागविले आ
2738.
काय करू मज नागविले आळसे । बहुत या सोसे पीडा केली ॥१॥
हिरोनिया नेला मुखीचा उच्चार । पडिले अंतर जवळीच ॥धृपद॥
द्वैताचिया कैसा सापडलो हाती । बहुत करती ओढाओढी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सवे । न्यावे मज देवा सोडवूनि ॥३॥
अर्थ :
काय करावे मला या आळसाने फार नागवे म्हणजे माझे फार नुकसान केले आहे आणि प्रपंचाच्या हव्यासाने तर मला फार पीडा दिली आहे. काय करावे या आळसाने आणि प्रपंचाच्या हव्यासाने माझ्या मुखातून हरीनामाचा उच्चारच नेला आहे देव माझ्याजवळ असून देखील आमच्यात अंतर पडले आहे. मी व्दैताच्या हाती कसा सापडलो हे माझे मलाच कळले नाही आणि ते माझी खूपच ओढाओढ करीत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही मला या सर्व म्हणजे आळस व्दैत आणि प्रपंचाचा हव्यास यातून सोडून आपल्याबरोबर न्यावे.
