सगुणाची सेज निर्गुणा
686.
सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्णमूर्ति ॥१॥
मन गेले ध्याना कृष्णचि नयनी ।
नित्यता पर्वणी कृष्णसुखे ॥२॥
हृदयपरिवारी कृष्ण मनोमंदिरी ।
आमुच्या माजघरी कृष्णबिवे ॥३॥
निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्णसुखे ॥४॥
अर्थ :
निर्गुण स्वरूप हीच कोणी बाज, त्यावर माया विशिष्ट परमात्म्याचा बिछाना घालून, त्यावर शामसुंदररूप मनोहर श्रीकृष्णमूर्ति विराजमान आहे. त्याचे ध्यानांत मन प्रवृत्त झाल्याबरोबर सर्व शरीरांत कृष्णरूपच प्रगट झाले. अर्थात् डोळ्यांनी जे पहावे ते कृष्णरूपच दिसू लागले. मग त्या कृष्णसुखाची नित्य पर्वणी झाली. अंतःकरणांत कृष्णच प्रगट होऊन राहिला असून घरीही त्याचाच प्रकाश आहे. ज्यांत यत्किचितही अडचण नाही. अशा तहेची वाट श्रीगुरू निवृत्तिरायांनी दाखवल्यामुळे वैकुंठातील कृष्णसुखच आम्ही नित्य भोगित आहोत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
