तुम्ही पंढरीये जाता
425.
तुम्ही पंढरीये जाता । तरी मी पाया लागेन आता ।
चरणरजें जाली साम्यता । तुमचे पाऊल माझे माथा ॥१॥
जेथे जेथे पाउल बैसे । एका एकपणेंविण असे ॥धृ.॥
पंढरीचे वाटे । पसरिले ते मी गोटे ।
पाया लागेन अवचटे । ते सुख आहे मल मोठे ॥२॥
जेथे पाउलांचा माग । तेथे माझे अखंड अंग ।
चरणरज आम्हा भोग । काय करशील वैकुंठ चांग ॥३॥
संत भेटतील वाडेंकोडें । तरी मी आहे पायांपुढे ।
हेही आठवण न घडे । तरी मी वाळवंटीचें खडे ॥४॥
यात्रा दाटेल घसणी । लागेन अवघिया चरणी ।
एका जनार्दनी कीर्तनी । आठवा आसनी शयनी ॥५॥
