(निर्याणाचे अभंग)
3625.
(निर्याणाचे अभंग)
बोलिलो ते आता पाळावे वचन । ऐसे पुण्य कोण माझे गाठी ॥१॥
जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी । काळक्षेप आम्ही करू कोठे ॥धृपद॥
न घडे यावरी न धरवे धीर । पीडता राष्ट्र देखोनि जग ॥२॥
हाती धरोनिया देवे नेला तुका । जेथे नाही लोका पराश्रम ॥३॥
अर्थ :
कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण हे वचन जे मी तुम्हाला पाळण्याकरता दिले आहे ते तुम्ही पाळावे व त्याप्रमाणे वागावे आणि तुम्ही जरी तसे वागले नाही तरी तुम्हाला जबरदस्तीने तसे वागण्यास लावावे एवढे पुण्य तरी माझ्या पदरी कोठे आहे ? हे माझ्या स्वामी मी तुमची आज्ञा घेऊन आता जात आहे आम्ही व्यर्थ काळ कोठे घालवावे ? हे राष्ट्रदु:खाने पीडित आहे हे पाहून मला धीर धरवत नाही आता मी येथे जास्त वेळ राहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हाताला धरुन देवाने मला अशा ठिकाणी नेले आहे की जेथे मला लोकांचे परिश्रम पाहण्यास मिळणार नाहीत.
(निर्याणाचे अभंग)
करावे ते काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघे एकमय । राज्य बोलो चालो नये ॥धृपद॥
दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आता ॥२॥
आता नाही तुका । पुन्हा हारपला लोका ॥३॥
अर्थ :
आता कोणत्याही प्रकारचे काम करणे म्हणजे उगाच श्रम वाढवण्यासारखे आहे. आता सर्वत्र एका ब्रम्हाचेच सामर्थ्य त्यावाचून दुसरे काहीही बोलणे चालणे नको आहे. आता एका ब्रम्हावाचून दुसऱ्या कशाचीही सत्ता न चालण्यासारखी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी या लोकांसाठी हरपलो आहे पुन्हा यांना मी दिसणार नाही.
