अविश्वासीयाचे शरीर स
3401.
अविश्वासीयाचे शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढे ॥धृपद॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचे धोंडा उभा ठाके ॥२॥
तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकी जाणा खोटा तैसा ॥३॥
अर्थ :
अविश्वास असणाऱ्या मनुष्याचे शरीर सुतकी असते व पातकाने विटाळलेले असते त्याच्या अंत:करणामध्ये तो नेहमी भेद ठेवत असतो. अशा अविश्वासी मनुष्याचा परमार्थिक वेल हरीप्राप्तीच्या मांडवापर्यंत जाईल का जसे पूर्वसंचित कर्म त्याने केले तसेच त्याच्यापुढे ते आले. गर्भवती मातेला असे वाटते की आपल्या पोटी राजबिंडा पुत्र जन्माला यावा परंतू तिच्या जर नशिबात जर धोंडाच असेल तर तोच तिच्या उदरातून जन्म घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, अन्न शिजवताना स्वयंपाक करताना धान्यामधे एखादा कुचर दाणा असतो तो कितीही शिजवला तरी शिजला जात नाही त्याप्रमाणे परमार्थामध्ये लोक असे आहेत की जे विश्वासघातकी आहेत अविश्वासी आहेत खोटे आहेत त्यांना कितीही परमार्थाचा उपदेश केला तरी तो व्यर्थच ठरतो.
