वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › ३. शरभंग ऋषींची भेट

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088075 · अभंग क्र. ३

3.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय तिसरा ॥
शरभंगऋषींचा उद्धार

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हत्वा त तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।
आश्रमं शरभंगस्य राघवौ तौ प्रजग्मतुः ॥१॥
तस्य् देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।
समीपे शरभंगस्य ददर्श महदद्भुतम् ॥२॥

श्रीरामाचे शरभंगाश्रमात आगमन :

महाभयानक विराधु । त्याचा क्षणार्धे केला वधु ।
प्रतापे शोभती दोघे बंधु । परम आल्हादु सीतेसी ॥१॥
मग तिघें जणें वेगेंसीं । निघालीं शरभंगाआश्रमासी ।
मार्ग क्रमितां दो कोशी । त्या आश्रमासी देखिले ॥२॥
तै शरभंग तपोराशी । तो न्यावया ब्रह्मलोकासी ।
ब्रह्मयाने धाडिलें इंद्रासी । विमानेंसीं हंसयुक्त ॥३॥

ब्रह्मदेवाचे विमान धाडले :

हंसयुक्त विमानंसी । बैसावया सामर्थ्य नाही इंद्रासी ।
पुढे घालोनि विमानासी । इंद्र रथेंसीं आश्रमा आला ॥४॥
जे विमानी बैसवेना इंद्रासी । ते विमान धाडिलें शरभंगासी ।
शरभंगाची निष्ठा कैसी । ब्रह्ययादिकांसी निजपूज्य ॥५॥
इंद्रादिक देव समस्त । येवोनि त्या आश्रमाआंत ।
अवघे लोटांगणें घालित । मग विनीत शरभंगा ॥६॥
इंद्र प्रार्थी मधुरवचनी । आम्ही आलो ब्रह्माज्ञेकरोनी ।
बैसोनि हंसयुक्त विमानी । ब्रह्मभुवनीं प्रवेशावें ॥७॥
तवं त्यासी शरभंग सांगत । या वना आला श्रीरघुनाथ ।
विराध वधोनिया निश्चित । आतांच येथ येईल ॥८॥

रामदर्शनापुढे सत्यलोकाची किंमत नाही :

न घेता श्रीरामदर्शन । मज न लगे ब्रह्मसदन ।
तुम्ही घेवोनि जावे विमान । मी येईन निजसत्ता ॥९॥
श्रीरामाच्या भेटीपुढे । ब्रह्मभुवन ते कायसे बापुडे ।
मज तेथे येणे न घडे । ब्रह्मयापुढें सांगावे ॥१०॥
ऐसे शरभंग बोलत । कर जोडोनि इंद्र ऐकत ।
तंव पातला श्रीरघुनाथ । तोही देखत इंद्रातें ॥११॥

विभ्राजमानं वपुषा सूर्यवैश्वानरप्रभम् ।
असंस्पृशंतं वसुधां ददर्श विबुधाधिपम॥३॥

सोलींव सूर्याची प्रभा । की तो अग्नीचा निजगाभा ।
तैशी इंद्राची अंगप्रभा । निजशोभा शोभत ॥१२॥
धरा नातळोनि अधर । रथ शोभे वारु निचित्र ।
मस्तकी चंद्रप्रभच्छत्र । युग्मचामर ढळताहे ॥१३॥
देवगण मरुद्गण । इंद्रासवें सिद्ध चारण ।
सवे बृहस्पति गुरु सज्ञान । तिही रघुनंदन देखिला ॥१४॥
सीता सौमित्र श्रीरघुनाथ । देखता अवघे जाले खद्योत ।
श्रीरामप्रभा अत्यद्भुत । देखोनि विस्मित सुरसिद्ध ॥१५॥
देखतांचि श्रीराघवा । सूर्यप्रकाशीं जैसा दिवा ।
तैशी दशा आली देवा । देवस्वभावा लाजिले ॥१६॥
तिही देखोनि श्रीरघुनाथ । सुख पावले अत्यद्भुत ।
नभीं जयजयकार करित । निघाले समस्त निजधामा ॥१७॥
शरभंग सांगे देवांप्रती । ब्रह्मसदनीं पुनरावृत्ती ।
श्रीरामदर्शनें अक्षयप्राप्ती । तेंही ब्रह्ययाप्रति पुसा तुम्ही ॥१८॥
श्रीराम देखतांचि दिठी । जन्ममरणा होय तुटी ।
खुंटली पुनरावृत्तीची गोठी । ऐसी सुखभेटी श्रीरामी ॥१९॥
इंद्रादि देवा उपेक्षून । ओसंडोनि ब्रह्मसदन ।
घ्यावया श्रीरामदर्शन । अति सज्ञान शरभंग ॥२०॥

श्रीरामांनी शरभंगांचे दर्शन घेतले :

ऐकोनि ऋषींचे वचन । इंद्रादि देव गेले निघोन ।
आश्रमा आला रघुनंदन । केले नमन शरभंगासी ॥२१॥

तस्य पादौ च संगृह्य रामः सीता च लक्ष्मणः ।
निषेदुस्तदनुज्ञाता लब्धवासा निमंत्रिताः ॥४॥

श्रीरामे वंदिलें ऋषीचे चरण । सीता आणि लक्ष्मण ।
दोघी घातले लोटांगण । सस्तकी चरण वंदिले ॥२२॥
ऋषीने दिधले अलिंगन । मधुपर्कविधीनें पूजन ।
पूजोनिया श्रीरघुनंदन । सावधान बैसले ॥२३॥

ततः शक्रोपयानं तु पर्यपृच्छत राघवः ।
शरभंगस्तु तत्सर्वं राघवान न्यवेदयत ॥५॥
अहं ज्ञात्वा नरश्रेष्ठ वर्तमानमदूरतः ।
ब्रह्मलोकं न गच्छमि त्वामदृष्ट्वा प्रियातिथिम् ॥६॥
अक्षया नरशार्दूल जिता लोका मया शुभाः ।
ब्रह्मचाश्च नाकपृष्ठ्याश्च प्रतिगृह्वीष्व मामकान् ॥७॥

शरभंगाकडून स्ववृत्त कथन :

श्रीराम पुसे ऋषीप्रती । इंद्रादिक देवपंक्तीं ।
आले होते आश्रमाप्रती । कोणे अर्थी ऋषिवर्या ॥२४॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । शरभंग विस्मयापन्न ।
न करिता जप तप ध्यान । दिव्यदर्शन श्रीराम देखे ॥२५॥
दिव्यचक्षु श्रीरामाचे पोटी । श्रीराम देखे अखिल सृष्टी ।
श्रीरामे दाटुगी ब्रह्मदृष्टी । देखोनिया पोटी श्रीराम ॥२६॥
वेदशास्त्रांचे निजवर्म । श्रीराम केवळ परब्रह्म ।
दीन तारावया वनोग्दम । विश्रामधाम श्रीराम ॥२७॥
ऐसी श्रीरामाची कीर्ती । ते मज आली अति प्रतीती ।
ऋषि आपुली धर्मस्थिती । श्रीरामप्रती सांगत ॥२८॥
म्या साधिली जे जे प्राप्ती । अति दुस्तर ते जनांप्रती ।
त्या त्या धर्माची निजस्थिती । यथानिगुती सांगेन ॥२९॥
साङ्ग अविकाळ कर्मे देख । म्या आसाधिला पितृलोक ।
त्याचे न मानेच सुख । तो म्या निःशेख त्यागिला ॥३०॥
करोनि शत सोमयाग । म्या साधिला स्वर्गभोग ।
तंव तो वाटे क्षयरोग । तोही म्या साङ्ग उपेक्षिला ॥३१॥
महर्लोक जनलोक । आदिकरोनि तपोलोक ।
साधिल्या मज नव्हेचि सुख । ते म्या निःशेख त्यागिले ॥३२॥
ब्राह्मणभक्ति सत्वव्रत । तेणे सत्यलोक प्राप्त ।
इंद्रादिदेव समस्त । मज न्यावया येथ स्वये आले ॥३३॥
हंसयुक्त निजविमान । स्वये धाडी चतुरानन ।
परी तुझे देखोनि आगमन । म्या ब्रह्मसदन त्यागिले ॥३४॥
लोकलोकांतर प्राप्त । ऐसे पुण्य केले अद्भुत ।
परी ते तुज अर्पिले समस्त । श्रीरघुनाथ प्रीति पावो ॥३५॥
कर्म न करिता ब्रह्मार्पण । तरी ते वाढवी जन्ममरण ।
तुझे देखता निजचरण । श्रीरामार्पण सर्व कर्मे ॥३६॥
मज पूर्वी होती भ्रांती । जे पुण्यें होय ब्रह्मप्राप्ती ।
पुण्यपापक्षयाअंतीं । श्रीराममूर्ती तै भेटे ॥३७॥
लोकलोकांतरपुण्यें देख । न तुटे दुःख नव्हेचि सुख ।
तुझे देखतांचि श्रीमुख । अलोलिक सुखप्राप्ति ॥३८॥
साच श्रीराम देखिल्या दृष्टी । समूळ संसारासी होय तुटी ।
निष्काम पुण्याच्या कोटी । तै तुझी भेटी श्रीरामा ॥३९॥
तुझे भेटीलागीं जाण । सांडिलें सत्यलोकगमन ।
जालिया श्रीरामदर्शन । समाधान जीवशिवा ॥४०॥

श्रीरामांना सतीक्ष्णऋषीकडे जाण्याची शरभगांची सूचना :

देखता श्रीराममूर्ति । सर्वैद्रियांनित्य विश्रांति ।
हे तंव माझी निजप्रतीति । सत्य निश्चिती श्रीरामा ॥४१॥
ऐसी ऐकोनि ऋषिवचनोकित । संतोषला श्रीरघुपति ।
ऋषीची देखोनि अद्भुत शक्ति । स्वये त्याप्रती पूसत ॥४२॥
दंडकारण्य महावन । ये वनवासी निवासस्थान ।
कोठे म्या करावे आपण । आज्ञापन मज देई ॥४३॥

शरभंग उवाच –
सुतीक्ष्णमभिगच्छ त्वं राम शीघ्रं तपस्विनम् ।
रमणीये वनोद्देशे स ते वासं विधास्यति ॥८॥

शरभंग म्हणे श्रीरामासी । येचि वनी वनवासी ।
सुतीक्ष्ण वसे महाऋषी । शीघ्र त्यापासी तुम्ही जावे ॥४४॥
तो तुम्हासी वनवासी वस्ती । सांगेल पै यथास्थिती ।
जेणे वासे श्रीरामकीर्ती । यश त्रिजगती वाढेल ॥४५॥

एष पंथा महाप्राज्ञ मुहूर्त स्थीयतामिह ।
यावज्जहामि गात्राणि जीर्णां त्वचामिवोरगः ॥९॥

शरभंग ऋषी श्रीरामांसमोर आत्मदहन करुन सत्य्लोकाला जातात :

येणेंचि पंथे महाप्राज्ञा । जावे सुतीक्ष्णऋषिदर्शना ।
परी कांहींएक असे विज्ञापना । ऐके सर्वज्ञा श्रीरामा ॥४६॥
तुझे देखतांचि चरण । दृश्य द्रष्टा नाही दर्शन ।
खुंटले भवभयाचें भान । गमनागमन मज नाही ॥४७॥
तरी प्रारब्ध बळी ये सृष्टी । अनिर्वाच्य त्याची गोष्टी ।
ते मज येथे दाटोवाटी । नेतें उठाउठी सत्यलोकां ॥४८॥
माझे अदृष्ट देखानें । ब्रह्मयाने धाडिलें विमान ।
ते म्या निवारिले जाण । तुझे दर्शन घ्यावया ॥४९॥
तुजसी जंव हाय भेटी । तंव प्रारब्धदेहाची गांठी ।
तुज देखता जगजेठी । उठाउठी देह पडेल ॥५०॥
तुज देखता सावधान । करुनि निजदेहाचें दहन ।
करीन सत्यलोका गमन । तंव आपण स्थिर व्हावे ॥५१॥
क्षणैक राहावे रघुपति । सर्प सांडी जैसी कांति ।
तैसी स्थूल देहाची निवृत्ति । करीन निश्चिती श्रीरामा ॥५२॥
स्थूल देह होती जाती । परी पालटेना आत्मस्थिती ।
मग योगाग्नीं दाहोनि देहाकृती । जाईन निश्चिती सत्यलोका ॥५३॥
तुझिया कृपें श्रीरघुनाथा । भय नाही जन्म धरिता ।
भय नाही कर्म करिता । देह मरतां भय नाही ॥५४॥
दोराअंगीं सर्प जन्मला । नांदोनियां स्वये निमाला ।
त्यासी दोर नाही भ्याला । तैसा जाला देहसंग ॥५५॥
जैसी देहासवें मिथ्या छाया । तैसी मुक्तांसवें मिथ्या काया ।
राहिलीसे श्रीरघुराया । भोगावया अदृष्ट ॥५६॥
ऐसे बोलोनिया जाण । श्रीरामादेखता आपण ।
शरभंगानें घालोनि आसन । केले दहन योगाग्नियोगें ॥५७॥

स च पावकसंकाशः कुमारः समपद्यत ।
उत्थायाग्निचयात्तस्माच्छरभंगो व्यरोचत ॥१०॥

करिता योगाग्नीं देहदहन । सत्यलोक भोगायतन ।
कुमारदेह पावला आपण । देदीप्यमान तेजस्वी ॥५८॥

सत्यलोकमहिमा :

याज्ञिक साधिती स्वर्गभुवन । त्याहून याचं महत्व गहन ।
अश्वमेध राजसूययज्ञ । त्याहून गहन महिमा याची ॥५९॥
क्रमोनियां पितृस्थान । क्रमोनि स्वर्ग महर्जन ।
क्रमोनियां देवसदन । विराजमान सत्यलोकी ॥६०॥
सत्यलोकी शरभंगासी । श्रीरामकृपा फळली कैसी ।
तेथेंही देहबुद्धि नाही त्यासी । पूज्य सर्वांसी जरी जाला ॥६१॥
ब्रह्मयाने सन्मानितां त्यासी । श्लाघ्यता न धरी देहबुद्धीसी ।
श्रीरामकृपा फळली ऐसी । भोगी प्रारब्धासी विदेहत्वे ॥६२॥
करिता श्रीरामनास्मरण । बाधूं न शके देहबंन ।
ते देखिलिया श्रीरामचरण । देही विदेही आपण शरभंग ॥६३॥
दीन तारावया जाण । श्रीरामाचे वनप्रयाण ।
एकाजनार्दना शरण । जगदुद्धारण श्रीराम ॥६४॥
विदेहकैवल्याचें ताट । शरभंगासी केले चोखट ।
सेविता देशभाषा उच्छिष्ट । जालो अवचट शेषभागी ॥६५॥
परमामृत रामायण । तेथे भोक्ते वसिष्ठ वाल्मीक पूर्ण ।
त्यांचे उच्छिष्ट सेविता जाण । एकाजनार्दन विदेही ॥६६॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शरभंगोद्धरणं नाम तृतीयोध्यायः ॥३॥
॥ ओंव्या ६६ ॥ श्लोक १० ॥ एवं ७६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग