जेऊनिया स्वस्थ उठिले
1085.
जेऊनिया स्वस्थ उठिले परिपूर्ण | केले आचमन वैष्णवांनी ॥१॥
वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे | गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
दोन प्रहरपावेंतो आटोपले भोजन | तृतीय प्रहरी कीर्तन आरंभिले ॥३॥
कीर्तनाच्या नादे मोहिला गोविंद | करावा उद्योग समाधीचा ॥४॥
नामा म्हणे देवा करिता उशीर | विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥
