वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

अनुभव रहणीवीण कायसे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074772 · अभंग क्र. २६९

269.
अनुभव रहणीवीण कायसे श्रवण ।
गर्भ अंधु नेणे रत्नकिरण ॥
गेले मेले काय सांगाल गोष्टी ।
स्वये आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी ॥
जीवा जीवन अंतरी ।
बाहेजु निर्धारी ।
सर्व निरंतरी पूर्णभरित ॥
बाहेजु प्रवृत्ति अंतरी निवृत्ति ।
उभयता गति एक आहे ॥
प्रसुतिकाळी व्याली ।
वांझ अपत्य जवळी ।
वांझ क्रीडा विनोदे रळी खेळतसे ॥
अनुभव रहणीवीण ।
जाला भगवा दिगांबरू ।
जैसा नग्नवरू हिंडे हाटाबिदी ॥
तीर्थक्षेत्रव्रतदान ।
यागादिक साधन ।
अनुभव रहाणीविण ।
शून्य धिक् गेले ॥
सगुण निर्गुण पाही ।
दोहींमाजी होऊनि राही ।
तरी निवसी ठाईच ठायी अरे जना ।
सगुण निर्गुण पाही जयापासूनी ।
ते राहे अनुभउनी येर वाउगेचि रया ॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलेसी एकांतु ।
द्वैताद्वैताची मातु उरेचिना ॥१०॥

अर्थ :
अनुभवावांचून श्रवणाचा काय उपयोग, गर्भातील बालकाला रत्न दिसणार नाही. तसेच बहिर्मुख श्रोत्याला श्रवणाचे रहस्य कळणार नाही. गेलेल्यांच्या पुराणातल्या गोष्टी कशाला सांगत बसता. आत्मज्ञान संपादन करुन परमात्म्याला मिठी मारा. सर्व जीवांचे जीवन निरंतर परिपूर्ण अंतर्बाहा व्यापुन असा एक परमात्माच आहे. स्थूल दृष्टीने प्रवृत्ति व अंतरदृष्टीने निवृत्ति ही परमात्मस्वरूपी एकरूप होऊन जातात. मायिक पदार्थाच्या सर्व कथा व्यर्थ आहेत माया ही वांझ आहे, मिथ्या जगत हे तिचे पोर आहे. ते तिच्या जवळच माया त्या जगतरूपीपोराबरोबर क्रिडा करित आहे अशी ती माया तिचे मिथ्या जगतरुपी पोराना त्यांना मिथ्यात्वाने ओळखल्याशिवाय नुसती अंगावर भगवी वस्त्रे घेणे व दिगंबर म्हणून नग्न होऊन नवऱ्यामुलाप्रमाणे बाजारातून अथवा ओढ्यानाल्याकाठी हिंडणे व्यर्थ आहे. तसेच तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान, यज्ञादिक साधने कितीही जरी केली. तरी अनुभवाची खुण कळल्यावाचून सर्व व्यर्थ आहे. त्या साधनाचा धिक्कार असो. सगुण किंवा निर्गुण ह्या दोन परमात्मस्वरूपापैकी एका जरी स्वरूपाचा विचार केलास तरी भगवत् स्वरूप होऊन समाधानाला प्राप्त होशील. सगुण निर्गुण हे भेद ज्याच्या आश्रयाला राहातात त्याचा अनुभव घ्या इतर काही करणे सर्व फुकट आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांच्याशी एकरूप झालास तर द्वैताद्वैताची गोष्टच उरणार नाही असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग