असो मंत्रहीन क्रिया
3983.
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारू ॥१॥
सेवेमधी जमा धरा । कृपा करा शेवटी ॥धृपद॥
विचारूनि ठाया ठाव । येथे भाव राहिला ॥२॥
आता तुकयापाशी हेवा । नाही देवा तांतडी ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही मंत्रहीन व क्रियाहीन आहोत त्यामुळे आमच्या आचाराविषयी तुम्ही विचारच करु नका. देवा आम्ही तुमची मंत्रहीन व क्रियाहीन प्रकारे जी पूजा केली ती तुम्ही तुमच्या सेवेच्या खात्यामध्ये जमा करुन घ्या आणि शेवटी आमच्यावर तुम्ही कृपा करा. मी खूप ठिकठिकाणांचा विचार केला आणि शेवटी माझा भक्तिभाव एक तुमच्या पायाजवळच स्थिर झाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता माझ्या ठिकाणी आता कोणताही हेवा राहिला नाही आणि मनुष्य देहातील कर्तव्य पूर्ण करण्याविषयी कोणत्याही प्रकारची तातडी राहिली नाही.
