ऐसी वर्मे आम्हा असोन
2961.
ऐसी वर्मे आम्हा असोनिया हाती । का होऊ नेणती दिशाभुली ॥१॥
पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा झालो नेदी ॥धृपद॥
आपुले इच्छेसी घालीन संपुष्टी । श्रीमुख ते दृष्टी न्याहाळीन ॥२॥
तुका म्हणे बहु सांडियेली मते । आपुल्या पुरते धरुनी ठेलो ॥३॥
अर्थ :
भक्तीसारखे एवढे चांगले वर्म आमच्या हाती असून देखील आम्ही दिशाभूल झाल्यासारखे का होऊ ? त्या पद्मनाभाच्या पायाला मी आलिंगन देईन व माझ्यावर कृपा कर तोपर्यंत मी तुला हलू देणार नाही असे त्याला सांगेन. मी माझ्या इच्छेने त्या श्रीहरीला माझ्या ह्दयरुपी संपुष्टात साठवून ठेवीन आणि श्रीहरीचे श्रीमुख माझ्या दृष्टीने न्याहाळीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी आतापर्यंत खूप जणांचे मते ऐकले व ते सोडूनही दिले आहेत टाकूनही दिले आहेत आता माझे हित ज्याच्यात आहे तेवढेच वर्म मी माझ्या हाती धरुन राहिलो आहे.
