मृतिकेची खंती काय कर
538.
मृतिकेची खंती काय करतोसी ।
कोण मी नेणशी काय आहे ॥१॥
काय तुज जाले नाथिला संसार ।
कासयासी भार वाहतोसी ॥२॥
शुद्धबुद्धरूप तूचि परिपूर्ण ।
जन्म आणि मरण तुज नाही ॥३॥
अविद्येच्या योगे तुज जाण भुली ।
अनुभवूनी किल्ली छेदी आता ॥४॥
श्रीगुरूच्या कृपे म्हणे ज्ञानेश्वर ।
तरसी संसार निश्चयेंसी ॥५॥
अर्थ :
या जड देहाविषयी खेद काय करीत बसला आहेस? मी कोण आहे? काय आहे, हे तुला कळत नाही. तुला काय अडचण वाटते? नसलेल्या संसाराची काळजी कशाला करतोस. तू शुद्ध ज्ञानस्वरूप असून तुला जन्म मरण नाही असे तुझे पूर्ण सत्यस्वरूप आहे. पण अज्ञानाच्या योगाने तुला कशी भुल पडली आता श्रीगुरूकडून मुक्त होण्याची किल्ली म्हणजे वर्म समजून घे व संसाराचा छेद करून टाक. सदगुरूंच्या कृपेने तू संसारातून तरून जाशील. हे मी तुला खात्रीने सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
