पत्रावळी काढी वैकुंठ
865.
पत्रावळी काढी वैकुंठनायक | धावूनिया शुक आला तेथे ॥१॥
दाटी पाहुनि द्वारी मानसी विचारी | जावया भीतरी काय काज ॥२॥
हा वाहे प्रसाद स्वहस्ते अनंत | वेचोनिया शीत घाली मुखी ॥३॥
घंटानाद वाजे लक्ष द्विजपंक्ती | अक्षयी वाजती वेळोवेळा ॥४॥
ऐकोनी विस्मित ऋषिसमुदाय | पुसे धर्मराव देवाजीसी ॥५॥
सांगतसे खुण वैकुंठनायक | ब्रह्मनिष्ठ एक आला तिथे ॥६॥
येथुनी उठले धर्म नारायण | बाहेर येऊन पाहताती ॥७॥
शुकाचिया मिषे व्यासाचा नंदन | सांगतसे खूण जगदीश ॥८॥
धरुनिया करी नेला तो भीतरी | नामा म्हणे करी पूजा त्याची ॥९॥
