॥ श्रीएकनाथमहाराजकृत
52.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बावन्नावा ॥
हनुमंत – मकरध्वज भेट
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
अहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी :
अहिरावण महिरावण । धराया रघुनंदन ।
करिते झाले विवंचन । सावधान अवधारा ॥१॥
पाताळ सांडोनि त्वरित । जाले रणभूमीसी प्राप्त ।
धरोनि न्यावया संधि पाहत । अहोरात्र सावध ॥२॥
हनुमंताची प्रतिकारार्थ सिद्धता :
येरीकडे वानरभारी । दळ सज्जी कपिकेसरी ।
सन्नद्धबद्ध द्रुमकरी । निजगजरीं हरिनामें ॥३॥
हनुमान वीर निजभक्त । रामभजनीं सावचित्त ।
करोनिया कुरवंडी जीवित । स्वामीस राखित अहर्निशी ॥४॥
राक्षस मायावी निश्चिती । युद्धी पावले उपहती ।
धूर चोरिती अतर्क्यगती । म्हणोनि कपिपती राखित ॥५॥
न म्हणे वेळ अवेळ । दिवस रात्र अक्षर पळ ।
घटिका मुहूर्त काळवेळ । अचळ रामभजनीं ॥६॥
सर्व शरीर सर्वसंपत्ती । अंतर्बाह्य श्रीरामभक्ती ।
वेंचिली असे मारुती । साक्षेपस्थितीं अवधारा ॥७॥
एकले मन श्रीरामभक्तीं । लावितांचि बाह्यवृत्ती ।
सहज अर्पिले रघुपती । इंद्रियस्थिति श्रीराम ॥८॥
मने वचनें कर्मस्थिती । राखिता झाला रघुपती ।
श्रोती अवधान द्यावे चित्ती । कथासंगती सांगेन ॥९॥
मने कवळोनियां ध्याना । मोकळूं न जाणे रघुनंदना ।
संकल्प विकल्प गमनागमना । रघुनंदनासरिसेंचि ॥१०॥
बुद्धिनिश्चयें जाण । सावधान रघुनंदन ।
राखिते झाले अनुदिन । क्षणे क्षण न विसंबे ॥११॥
चित्तचिंतनसमवेत । धरोनि राहिले रघुनाथ ।
अहर्निशी राम राखित । सावचित्त सर्वदा ॥२॥
निजभिमानी कपिपती । रामोहमस्मि निजवृत्ती ।
धरोनि राहिला रघुपती । अहोरातीं सावध ॥१३॥
अंतःकरण व्यापक पाही । राम राखे सर्वा ठायी ।
बालाग्रमात्र सवडी नाही । राखण पाही हनुमंत ॥१४॥
अंतरी ऐसा हनुमंत । सर्वभावीं रघुनाथ ।
क्षणक्षणां सांभाळित । बाह्यव्रत अवधारा ॥१५॥
दृष्टिविषय रघुनंदन । दृश्यमात्रीं भरला जाण ।
राखता झाला अनुदिन । अनुसंधान अखंड ॥१६॥
श्रवणद्वारीं शब्दविषयो । अर्थावबोधें रामरावो ।
राखितसे महाबाहो । भक्तरावो हनुमंत ॥१७॥
घ्राणद्वारें गंधावबोध । श्रीरामपरम मकरंद ।
श्वासोच्छ्वासीं परमानंद । अगाध बोध कपीचा ॥१८॥
रसनारसें विषयस्थिती । श्रीराम स्वये चिच्छक्ती ।
गोडियेमाजी रघुपती । वीर मारुति न विसंबे ॥१९॥
त्वचा आलिंगिता स्पर्शी । उडवूनि शून्यत्व आकाशी ।
मिठी घालोनि श्रीरामासी । चिदाकाशीं राखित ॥२०॥
वाचेनें शब्दव्युत्पत्ती । गांठ घातली रघुपती ।
बोलता व्यवहार वदंती । राम मारुति न विसंबे ॥२१॥
हस्ताची क्रियाशक्ती । क्रियामात्र रघुपती ।
घेता देता अर्थजाती । राम मारुति न विसंबे ॥२२॥
चरणाचें गमनागमन । आचरणेंचि राम जाण ।
पाऊलही न पडे शून्य । रघुनंदनावांचोनी ॥२३॥
लिंगाची स्वानंदरती । तंव ऊर्ध्वरेता मारुती ।
अखंडाननंद रघुपती । सहजस्थितीं राखित ॥२४॥
गुदाचा स्वभाव क्षर । क्षरीं अक्षर रघुवीर ।
उडवोनि क्षराक्षर । राम कपींद्र राखत ॥२५॥
राम प्राणाचा पाळक । कपि रामाचाही रक्षक ।
होवोनियां एकाएक । रघुकुळटिळक राखित ॥२६॥
पुच्छदुर्ग करोनि कटका । द्वारमुखाचे अलोलिका ।
कर्णरंध्रीं निर्गम देखा । कपिनायक रचीतसे ॥२७॥
उरले पुच्छाचे जे अग्र । ते तळी वरी निरंतर ।
भंवे जैसे विष्णुचक्र । अहोरात्र सावध ॥२८॥
वारियासी रीघ नाही । तेथे राक्षसे बापुडीं कायी ।
भ्रमण करिती लवलाही । धुरा पाही चोरावया ॥२९॥
अहिरावण – महिरावण यांचे चिंतायुक्त होऊन कुलदेवतेला आवाहन :
फेरे केले लक्षांत । तरी राम नोहे प्राप्त ।
भजनहीना रघुनाथ । नव्हे प्राप्त सर्वथा ॥३०॥
बहुत झाले खेदक्षीण । प्राप्त नव्हे रघुनंदन ।
मग करु आदरिलें स्तवन । कुळदेवता जाण कामाक्षी ॥३१॥
सकळ कामना संपूर्ण । स्मरतांचि करी आपण ।
म्हणवोनि तिसी अभिधान । कामाक्षी जाण बोलती ॥३२॥
बुद्धीची बुद्धी आपण । परमात्मा रघुनंदन ।
राक्ष्सां वोळला संपूर्ण । मोक्षदान द्यावया ॥३३॥
जंव नुपजे तीव्र अवस्था । शरण न रिघवे रघुनाथा ।
तंव कैंची मोक्षवार्ता । दुःखावर्तामाजी पडिजे ॥३४॥
राक्षस दोघे चिंताक्रांत । राघव साधावया तळमळित ।
ते जाणोनि श्रीरघुनाथ । बुद्धि प्रेरीत ते ऐका ॥३५॥
मांडिलें कामाक्षीस्तवन । तिचा प्रकाशक रघुनंदन ।
शक्तिरुपें संतोषोन । झाला प्रसन्न राक्षसा ॥३६॥
हनुमंताला शेपटीचा वेढा काढण्याची श्रीरामांची आज्ञा :
राक्षसांची करुणा । न सहावेचि रघुनंदना ।
बोलावोनि कपिनंदना । मधुर वचना बोलत ॥३७॥
हनुमंता तुझेनि नामे । विघ्ने दिक्पुटीं लागावें ।
भयें माथें नुधवावें । निर्भय व्हावे चराचर ॥३८॥
ऐकता कपिनामोच्चार । भेणे कांपती सुरासुर ।
येवढा ज्याचा नामनिर्धार । तो भेणे दळभार राखित ॥३९॥
ऐसी तुझी अपकीर्तीं । विस्तारेल त्रिजगती ।
ऐसे न करी मारुती । सांडी निश्चिती निजभय ॥४०॥
काढी पुच्छाचा पै वेढा । करी दारवंठा उघडा ।
स्वैर विचरुं दे माकडा । हुडाहुडां आल्हादे ॥४१॥
श्रीरामकटकीं अवरोध । हे गोष्टीचा असंबद्ध ।
क्षात्रधर्मा पावे बाध । माथा अपवाद बैसल ॥४२॥
देहभय दारुण । यत्न करावा जरी आपण ।
तरी सामर्थ्या आली नागवण । काळे वदन तयाचे ॥४३॥
देहभयें विषयसुख । सर्वथा प्राप्त नव्हे देख ।
अथवा नव्हे सांसारिक । परमार्थ देख तेथ कैंचा ॥४४॥
देहभयें साधन । सिद्ध न साधे गा जाण ।
देहभयें कर्माचरण । वृथा जाण जातसे ॥४५॥
देहभयें न साधे योग । देहभयें न साधे याग ।
देहभयें स्वर्गभोग । नव्हे सांग निजप्राप्ति ॥४६॥
देहभयें सकळ दुःख । अणुमात्र नव्हे सुख ।
आकल्प भोगावे नरक । दुःख अलोलिक देहसंगें ॥४७॥
ते देहभय आम्हांप्रतीं । असता कैंची विरवृत्ती ।
सकळ धर्माची होय शांती । भयें निश्चिती देहाच्या ॥४८॥
लोकापवाद बैसे माथा । देहभय रघुनाथा ।
ते चुकवावें हनुमंता । वेढा तत्वता काढोनी ॥४९॥
ऐकोनिया रामवचन । हनुमान घाली लोटांगण ।
अगाधबोध रघुनंदन । आम्हा पामरां ज्ञान कैंचे ॥५०॥
चरण वंदोनि तत्वता । वेढा काढिला परता ।
कर जोडोनियां रघुनाथा । संमुखता राहिला ॥५१॥
सुग्रीवादि वानरभार । त्यांसी सांगे रघुवीर ।
सुखे निद्रा करा समग्र । भयमात्र धरु नका ॥५२॥
लाहोनियां श्रीरामाज्ञा । वानर गेले निद्रास्थाना ।
लाज उपजली वायुनंदना । स्वये विवंचना करीतसे ॥५३॥
श्रीराम सकळांसी राखिता । त्या सांभाळीतसें रघुनाथा ।
कोण अर्थाजीतसें ॥५४॥
श्रीराम राखे त्रैलोक्यासी । त्या मी राखितसें रामासी ।
काळिमा लागली ज्ञानासी । कर्मटवेषी यथार्थ ॥५५॥
अगाधबोध रघुनाथा । प्रबोधिली यथार्थ वार्ता ।
मज एवढी कोण चिंता । स्वस्थ आता सुखे निजों ॥५६॥
ऐसे जाणोनि कपिकेसरीं । वेढा काढिला झडकरी ।
आपुलाले मेळिकारीं । सुखे वानरी निद्रा केली ॥५७॥
जाणोनिया पुढील कायार्थ । निद्रा करी रघुनाथ ।
राक्षस वेगे आले तेथ । चोरोनि नेत रघुनाथा ॥५८॥
निशि निद्रां समापन्नौ दाशरथी जहर्तुभृशम् ।
कुणपाद्वायुके पाशे यथा पातालमासुरैः ॥१॥
निद्रिस्त रामलक्ष्मणांना राक्षस मध्यरात्री घेऊन जातात :
पडली गडधूप अंधारी । मध्यरात्रीं निशाचरी ।
येवोनिया झडकरीं । केली चोरी धुरेची ॥५९॥
जैसे यमाचे यमपाश । न लक्षती कोणास ।
वेगे काढोनि प्राणास । नेती उदास निर्भय ॥६०॥
सुहृदस्वजनांदेखता । भूमीवरी सांडूनि प्रेता ।
प्राण हरी तत्वता । कोणाही सर्वथा लक्षेना ॥६१॥
तैसे प्रेतरुप वानरा । सांडोनिया मेळिकारां ।
दोघा जणीं दोनी धुरा । पाताळद्वारा पळविल्या ॥६२॥
राम वानरांचे जीवन । राम वानरांचा जीवप्राण ।
रामेंवीण । प्रेतवत् जाण सकळिक ॥६३॥
जरी रामे प्रबोधिला । तरी न राहे उगला ।
घरटीकार । होवोनि वहिला । पाहे वेळोवेळा हनुमंत ॥६४॥
राम-लक्ष्मण नाहीसे झाल्यामुळे हनुमंताचे चिंतायुक्त होऊन प्रयाण :
आलगेचा आला जव फेरा । तंव न देखे दोनी धुरा ।
होवोनि अत्यंत घाबरा । पाहे सैरा कटकांत ॥६५॥
मळमूत्रासीं नाही गेला । वनविहारा नवचे वहिला ।
श्रीराम कोणीकडे गेला । वेडावला कपिनाथ ॥६६॥
युद्ध करिता भागला पूर्ण । गेला मेळिकार सोडून ।
केले अयोध्येंसी गमन । वंचिलों पूर्ण श्रीरामे ॥६७॥
हेंही न घडे सर्वथा । तो न विसंबे शरणागता ।
दीन वानरा समस्ता । सांडी सर्वथा हे न घडे ॥६८॥
शरणागता कृपाळु । श्रीराम दीनदयाळ ।
एवढा ब्रीदाचा कल्लोळ । वानरमेळ सांडील का ॥६९॥
बिभीषणा जाणवूं मात । आणि सुग्रीव वानरनाथ ।
गोष्टी फांकतां कटकाआंत । होईल आकांत सकळिकांसी ॥७०॥
गोष्टी जाईल लंकेसी । ठाउकें पडेल रावणासीं ।
धांवोनि येईल वेगेंसी । अंत सकळांसी करील ॥७१॥
रावण बापुडे ते किती । त्यासी मारावया जुत्पती ।
एकएकाची अद्भुत शक्ती । करितील शांती रावणाची ॥७२॥
तथापि राजनीतिविचार । आच्छादावा समाचार ।
धुरेवरीच पडले चोर । जघन्ये थोर वीरवृत्ती ॥७३॥
ऐसे विचारोनि कपिनाथ । बिभीषणा सावध करित ।
आणि सुग्रीव वानरनाथ । वृत्तांत सांगत तया दोघा ॥७४॥
येरा समस्ता कळो न देता । पाहो लागले रघुनाथा ।
कोठे न देखती सर्वथा । तिघां अति चिंता वर्तली ॥७५॥
बिभीषण सांगे तयांसी । व्यर्थ जाणे न घडे रामासीं ।
कांही योजिले कार्यासी । न पुसतां कोणासी मग गेला ॥७६॥
सर्वांगाचे दुर्ग करोनी । स्वमी राखतां अनुदिनी ।
रामे हनुमंत निवारोनी । कार्यालागोनी स्वये गेला ॥७७॥
आता काय करणे विचार । म्हणोनि झाले चिंतातुर ।
तंव सरसावला कपीद्र । काय उत्तर बोलत ॥७८॥
तुम्ही सावध रहा येथे । कळो न द्यावे कोणातें ।
संरक्षावे सैन्यातें । अति सामार्थ्ये सावध ॥७९॥
मी जावोनि वेगेंसीं । झाडा घेईन त्रैलोक्यासी ।
शोधोनि श्रीरामासी । अति वेगेंसीं आणिन ॥८०॥
सप्त पाताळांची चवडी । उल्लंघीन न लागता घडी ।
खचीत पर्वतांच्या दरडी । पृथ्वी रोकडी वाटीन ॥८१॥
एकवीस स्वर्गांच्या उतरंडी । पाडीन लागता घडी ।
पीठ करोनि रोकडी । मिळवीन तांतडी अव्यक्तासीं ॥८२॥
मोडीन वैकुंठ कैलासासी । शीक लावीन महेशासी ।
अनुग्रहिले रावणासी । उद्धत त्यासी करविलें ॥८३॥
रावण बापुडे ते किती । क्षणे नेईन भस्मांतीं ।
लंकेची करीन शांती । त्रिकूट निश्चिती खचवीन ॥८४॥
शोधीन विवरेंविवर । उल्लंघीन गिरिकंदर ।
तुम्ही दळभार रहा समग्र । अहोरात्र सावध ॥८५॥
मात गुप्त करोनि सत्वर । भारी राहवोनि समग्र ।
निघता झाला कपींद्र । अति सत्वर रामकार्या ॥८६॥
निघोनि कटकाबाहेरी । चिंताक्रांत कपिकेसरी ।
काय करु गा श्रीहरी । बुद्धि झडकरी मज देई ॥८७॥
तू अनाथांचा नाथ । निजभक्ता संरक्षित ।
न विसंबसी शरणागत । तोही रणांत सांडिला ॥८८॥
शरणांगतां वज्रपंजर । ऐसा ब्रीदाचा बडिवार ।
वाढविला अपार । तो साचार करी रामा ॥८९॥
उपेक्षिसी शरणांगतां । बोल लागेल निजव्रता ।
आणि विरुद्ध वेदशास्त्रार्था । दीन अनाथां सांडितां ॥९०॥
ऐसी तीव्र चिंता करिता । कृपा उपजली रघुनाथा ।
गेला तात्वतां यक्षिणीवटा ॥९१॥
हनुमंताची आदिशक्तीला प्रार्थना :
यक्षिणीवटातळीं मारुती । स्तविता झाला आदिशक्ती ।
तुज गमन त्रिजगती । माझी विनंती परिसावी ॥९२॥
सांडोनि वानरभारा सकळा । रामसौमित्र कोठे गेला ।
याचा समाचार वहिला । मज सांगितला पाहिजे ॥९३॥
तुम्ही पूर्वी मज प्रसन्न । म्हणोनि तुम्हासी आलो शरण ।
वेंगी सांगा रघुनंदन । केउते गमन केलेंसे ॥९४॥
मज वृत्तांत न सांगता । क्षोभ वाटेल रघुनाथा ।
ऐसे जाणोनि सर्वथा । शुद्धि तत्वता सांगावी ॥९५॥
ऐकोनि कपीचे उत्तरा । हडबडिली ते सुंदरा ।
त्यासी न सांगितल्या समाचारा । करील संहारा सर्वांसी ॥९६॥
अद्भुतशक्ति कपिनाथ । नाही कळिकाळासी भीत ।
नित्य रामनामे गर्जत । राम सेवीत सर्वदा ॥९७॥
आम्ही न सांगताही वृत्त । कार्य साधील निश्चित ।
आपण यश घेतल्या येथ । श्रीरघुनाथ सुखावे ॥९८॥
आम्ही न सांगो जरी । कार्य साधील तो तरी ।
मारील राक्षसांच्या हारी । चराचरी निजविजयी ॥९९॥
क्षोभ आलिया कपीसी । जीवे मारील सखळांसी ।
म्हणोनि पहिलेंचि कपीसी । समाचारासी जाणवूं ॥१००॥
गोष्टी सांगों जरी स्पष्ट । समाचार होईल प्रकट ।
क्षोभोनियां रावण दुष्ट । करील सपाट सर्वांचे ॥१॥
आदिमायेकडून गिधाडाच्याद्वारे हनुमंताला मार्गदर्शन :
काय करु विचार । म्हणोनि झाली चिंतातुर ।
बुद्धि स्फुरली सत्वर । प्रकारांतर योजिले ॥२॥
गीध गीधी वृक्षावरी । बैसली असता परस्परी ।
पक्षिणीचे संचरोनि अंतरी । कपिकेसरीतें वृत्त सांगे ॥३॥
गीधातें म्हणे गीधिनी । मज डोहळे होती मनी ।
नरमांस पाहिजे भोजनी । ते कोठोनी मेळविसी ॥४॥
तू माझा प्राणपती । मी तुझी अर्धागशक्ती ।
झणें उदास होसी चित्ती । डोहळे निश्चिती पुरवावे ॥५॥
गीध म्हणे गीधीप्रती । त्वरा न करावी सर्वांथीं ।
अनायासें मांस प्राप्ती । तुज निश्चिती होईल ॥६॥
अहिरावण महिरावण । सखे बंधु दोघे जण ।
चोरोनियां राम लक्ष्मण । नेले जाण पाताळा ॥७॥
त्यांच्या धांवण्यासी त्वरित । जावोनिया कपिनाथ ।
करील सकळांचा घात । मांस बहुत मिळेल ॥८॥
हनुमंताचे पाताळामध्ये गमन :
ऐसे बोलता तिही दोघी । कपीनें ऐकिलें वेगी ।
आनंद भरला सर्वांगी । गर्जे सवेग रामनामे ॥९॥
भूमी हाणोनि लात । विवर केले अत्यद्भुत ।
गेला पाताळा हनुमंत । राक्षसनाथ जेथ असे ॥११०॥
येरीकडे ते राक्षस । घेवोनि आले दोघांस ।
पुरले नवसिले नवस । जगदंबेस पूजित ॥११॥
पूजोपचारसामग्री । मेळविली बहुतांपरी ।
अति उल्लास राक्षसभारीं । निजगजरीं मांडिला ॥१२॥
आतुर्बळी वानर । मार्ग काढील सत्वर ।
धांवण्या वेगत्तर । येईल कपींद्र पै येथे ॥१३॥
मग कांही न चले मत । युद्ध करील त्वरित ।
सोडवील रघुनाथ । शक्ति अद्भुत कपीची ॥१४॥
राक्षसबंधु रामलक्ष्मणांना मकरध्वजाच्या बंदोवस्तामध्ये ठेवतात :
म्हणोनि नगरबाह्यप्रांतीं । राखणे ठेविली सभोंवतीं ।
मकरध्वज द्वाराप्रती । अद्भुतशक्ती राखण ॥१५॥
चौदा सहस्र राक्षस । अद्भुतशक्ती दुर्धर्ष ।
द्वारी सावध अनिमेष । मकरध्वजासमवेत ॥१६॥
न लावितां पातया पातें । द्वार राखिती सावचित्तें ।
तंव हनुमान पावला तेथे । श्रीरामाते पहावया ॥१७॥
कपिरुपें जाता भीतरी । वळखी पडेल राक्षसभारीं ।
राम आच्छादोनि झडकरी । महामारी उठतील ॥१८॥
युद्धाचे भय नाही मज । परी न लाभे रघुराज ।
सिद्धी न पवे स्वामिकाज । ऐसी वोज नये करु ॥१९॥
साधुवेषामध्ये हनुमंताचे आगमन :
साधावया स्वामिकार्यासी । झाला तापसी तीर्थवासी ।
तापसवेषे राजद्वारासीं । भीतरी जावयासी पै आला ॥१२०॥
अत्यंत चतुर कपिपती । रामप्रभावे स्तविली शक्ती ।
माया प्रेरिली निश्चिती । लागली सुषुप्ती सर्वांसी ॥२१॥
मकरध्वजाचा हनुमंताला प्रश्न :
जो स्वामिकार्या सादर । त्यासी नव्हे माया साचार ।
सावध मकरध्वज वीर । निरंतर स्वामिकाजी ॥२२॥
माध्यान्हीं निशी वेशीपासीं । देखिला अवचितां तापसी ।
भीतरी जाता वर्जिले त्यासी । जासी निशिं केउता ॥२३॥
भिन्न असता मध्यरात्र । कोठे जासी न पुसत ।
धरोनिया तापसव्रत । स्वेच्छा जात नगरांत ॥२४॥
भिक्षुकाचा धर्म पाही । दिवसा अपराण्हसमयी ।
गृहस्थ जेविल्या निजगृही । जावे तिही भिक्षेसी ॥२५॥
यजमान सकळ तृप्त । घरींचा वैश्वानर शांत ।
भिक्षेसी काळ तोचि प्राप्त । यथोचित भिक्षुका ॥२६॥
उचित काळ सांडोनिया जाण । अकाळी करिता गमन ।
लागे स्वधर्मा दूषण । ऐसे आपण न करावे ॥२७॥
तू अकाळी गमन करीसी । निजधर्मा बोल लाविसी ।
स्वामी क्षोभेल आम्हांसी । कोण निशीथीं विचरत ॥२८॥
आणिकीं ठेवावे दूषण । ते आम्हीच करितो प्रार्थन ।
येथून परतावे आपण । करावे गमन स्वाश्रमा ॥२९॥
ऐकोनि तयाचे बोलणें । तापस क्षोभला निजमनें ।
कांही धर्माधर्म नेणे । बैसविलें कोणे तुज येथे ॥१३०॥
आम्ही विरक्त तापसी । स्वेच्छें विचरू अहर्निशी ।
कोठेही निर्बंध नाही आम्हासी । तू का वारिसी निजमूर्खा ॥३१॥
निवारिता साधूसी । स्वये अधःपाता जासी ।
बोल आम्हांसी ठेविसी । व्यर्थ तापसी शापिलें ॥३२॥
ऐकोनि त्याचे बोलणें । मकराक्ष क्षोभला मने ।
अकाळी स्वेच्छा विचरणे । हे साधुत्व कोणे शिकविले ॥३३॥
जरी वांचविणें निजशरीर । तरी परतावें माघारा ।
मग होसील घाबिरा । धोत्रा वस्त्रा सांभाळी ॥३४॥
हनुमंताचे व मकरध्वजाचे युद्ध :
ऐकोनि क्षोभे तापस बोले । तुज का शाप देणे लागले ।
थापा हाणोनि दोनी डोळे । पाडीन तत्काळ भूमीसीं ॥३५॥
येरु क्षोभला तत्क्षणीं । मिसळले युद्धा लागूनी ।
दोघे आले झोंटधरणी । निष्टुर वचनी बोलती ॥३६॥
थापा हाणिती येरयेरा । गुडघे कोंपर परस्परां ।
बुकिया हाणिती सैरावैरा । दोही वीरा बळ सम ॥३७॥
परस्परें हाणिती थडका । परस्परें हाणिती झडका ।
परस्परें घालिती धडका । एकमेका मेचेना ॥३८॥
युद्ध करिता दोघे जण । परस्परें खेदक्षीण ।
हनुमान विचारी आपण । हा कोण कैंचा पा येथे ॥३९॥
माझ्या घायाचेनि आघात । पीठ होताती पर्वत ।
अद्यापि वांचला जीवे जीत । कोण निश्चित पुसों पा ॥१४०॥
अरे कोण तू काय आहेसी । माझ्या धायी वांचलासी ।
वेगी सांग मजपासीं । यमापासीं अन्यथा धाडीन ॥४१॥
हनुमंताला मकरध्वजाचे आत्मकथन :
ऐकोनी त्याचे बोलणें । मकराक्ष क्षोभला निजमनें ।
काय बोलत प्रतिवचनें । सावधाने अवधारा ॥४२॥
युद्ध करिता भागलासी । काकुळती येवोनि पुससी ।
तरी ऐक यथार्थेसी । मी तुजपासी सांगेन ॥४३॥
सवेंचि बोले वचन । तुज सांगोनि कार्य सोण ।
जाया दिधले जीवदान । सखे गमन करावे ॥४४॥
सुखरुप न करिसी गमन । तरी स्वर्गा तुज धाडीन ।
पुसतचि आहेसी तू कोण । सावधान अवधारी ॥४५॥
वायुसुत कपिराज । त्या हनुमंताचा आत्मज ।
माझे नांव मकरध्वज । बळ माझे पित्यासम ॥४६॥
अहिरावण महिरावण । हे सखे बंधु दोघेजण ।
तिही मज ठेविले रक्षण । द्वारी संपूर्ण आपुलिये ॥४७॥
त्यांचे कुळीं कुळस्वामिणी । कामाक्षी जाण यक्षिणी ।
तिसी बळिदानालागोनी । मानव दोनी आणिले ॥४८॥
त्यांच्या धांवण्यालागून । स्वर्गमृत्युलोकींहून ।
येईल कोणी धांवून । म्हणोन राखण ठेविले ॥४९॥
आता स्वस्ति असो तुजलागीं । सुखे जाय आले मार्गी ।
अन्यथा वृथा जाशी वेगी । ग्रासभागीं यमाचे ॥१५०॥
ऐकोनि त्याचे उत्तर । क्रोधे झाला कालग्निरुद्र ।
नेत्र भवंडी गरगर । बोले कपींद्र ते ऐका ॥५१॥
रे रे वानर सावधानमनसा वार्ता क्षणं श्रूयतां
सोऽहं मारुत राघवस्य कृपया पत्नीभगं नेक्षितम् ।
मिथ्या जल्पसि वेषवानरतनुः कोणात्मजो लक्ष्यसे
एहि त्वं समरे निशाचरगणैः पुत्रांतकोऽहं किल ॥२॥
हनुमंताला आश्चर्य वाटते व तो वृत्तांत विचारतो :
हनुमान म्हणे तयासी । तू राक्षस कपटवेषी ।
धरोनि वानरवेषासी । पुत्र म्हणविसी हनुम्याचा ॥५२॥
सांडोनि आपुला पिता । आणिकाचा पुत्र म्हणवितां ।
स्वये जातोसी अधःपाता । लाज सर्वथा तुज नाही ॥५३॥
ज्याचा पुत्र म्हणविसी । तो हनुमान मी निश्चियेंसी ।
जन्मादारभ्य तुज आम्हांसी । भेटी कैसी न झाली ॥५४॥
कोणी देखिले न ऐकिलें । पुत्र म्हणविसी उगले ।
लांछन पूर्वजां लाविले । जोड जोडिले अधःपाता ॥५५॥
श्रीरामकृपा मी हनुमंत । कौपीन लाधलों उदरस्थ ।
केव्हांही स्त्रीसंगाची मात । स्वप्नाआंतही न देखे ॥५६॥
जन्मादारभ्य पत्नीभोग । म्या देखिले नाही स्त्रीलिंग ।
कैंचा पुत्र झालासी सांग । मातेसी डाग लाविला ॥५७॥
राक्षसाचा पुत्र होसी । आणि आणिकाचा म्हणविसी ।
जीवे नाही मारिलासी । करुणा भाकिसी अनिवार ॥५८॥
तू पुत्र आणिकाचा असता । पिता म्हणविसी हनुमंता ।
व्यभिचारी केली निजमाता । देईन प्रायश्चिता तुज आजी ॥५९॥
मी स्त्रीमात्रीं सहोदर । मज कैंचा स्त्रीपुत्र ।
सांडी परता कपटाचार । निगें सत्वर युद्धासी ॥१६०॥
राक्षसगणसमवेत । दावी आपला पुरुषार्थ ।
पुत्रांतक मी हनुमंत । जाण निश्चित आलो असे ॥६१॥
मकरध्वजाच्या मातेचे पूर्वकथेचे सत्यकथन :
वचनें झाली संकोचता । मग पाचारिली निजमाता ।
पुसता झाला निजवृत्तांता । माझा पिता तो कोण ॥६२॥
मगरी म्हणे मकरध्वजा । नोळखिसी तू पवनात्मजा ।
भ्रमलासी कवण्या काजा। ऐक वोजा सांगेन ॥६३॥
ब्रह्मचारी पवनपुत्र । त्यासी कैंचे स्त्रीपुत्र ।
तुझ्या उत्पत्तीचे चरित्र । ऐक सविस्तर सांगेन ॥६४॥
सीताशुद्धीलागीं मारुती । आला होता लंकेप्रती ।
तेथे केली महाख्याती । लंकापती अपमानिला ॥६५॥
पुच्छी लावोनि आगी । उपरी धवलारांलागीं ।
दुर्गी लाविली आगी । हूडे सवेग खचविले ॥६६॥
जाळोनियां सकळ नगर । वेगी आला समुद्रतीरा ।
विझवावया पुच्छाग्रा । मांडिली त्वरा सागरी ॥६७॥
शरण आला समुद्र । तेणे विनविला कपींद्र ।
जळीं समग्र विझवितां पुच्छाग्र । जीव समग्र मरतील ॥६८॥
पुच्छ ठेवोनिया तीरीं । हळुच विझवी लहरीं ।
ऐसे विनविता सागरी । वचन कपींद्रीं मानिलें ॥६९॥
पुच्छ तीरा ठेवून । लहरीं विझविलें सानसान ।
स्वेद सांडिला निपटून । तो आपण गिळीला ॥१७०॥
अमोघवीर्य वायुनंदन । त्याहीवरी रामभजन ।
स्वेदें झाले गर्भाधान । गर्भ संपूर्ण वाढला ॥७१॥
त्या गर्भास्तव पाही । तू झालासी माझ्या हृदयी ।
पित्या पुत्रा दोघांही । भाग्ये पाही भेट झाली ॥७२॥
तुम्हा दोघा वैरभावो । सर्वथा नसावा पहाहो ।
सांडून युद्धाचा अविर्भावो । महाबाहो आलिंगी ॥७३॥
ऐकोनि मातेचे वचन । मकराक्षें घातले लोटांगण ।
येरें दिधले आलिंगन । समाधान दोघांसी ॥७४॥
एका जनार्दना शरण । झाले पिता पुत्रदर्शन ।
आता वधूं अहिरावण । महिरावण समवेत ॥७५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतकरध्वजदर्शनं नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥५२॥
ओंव्या ॥१७५॥ श्लोक ॥२॥ एवं ॥१७७॥
