भेदवादी जन वदतसे भिन
561.
भेदवादी जन वदतसे भिन्न | नव्हे ते लक्षण भजनाचे ॥१॥
विश्वी विश्वंभर कोंदलासे एक | भेदाचे कौतुक कैसे सांगा ॥२॥
ब्रह्मी नाही ठाव एकपणाचाही | तेथे दुजे काही सामावते ॥३॥
आदि मध्य अंत खेळूनिया खेळ | उरले ते निखळ अविनाश ॥४॥
हेमी जैसे केले तैसे होती नग | तरी ते अव्यंग सोनेपणी ॥५॥
केली जैसी भक्ति शैव का वैष्णव | पाहता तो देव नाही दुजा ॥६॥
शिवविष्णु दोघे एकचि अवतार | वेदांनी निर्धार हाचि केला ॥७॥
नामा म्हणे येथे दुजा नको भाव | विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥
