कोण आम्हा पुसे सिणले
2289.
कोण आम्हा पुसे सिणले भागले । तुजविण उगले पांडुरंगा ॥१॥
कोणापाशी आह्मी सांगावे सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥धृपद॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥२॥
कोणापे इच्छेचे मागावे भातुके । कोण कवतुके बुझावील ॥३॥
कोणावरी आह्मी करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥४॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणा । दंडवत चरणा तुमच्या देवा ॥५॥
अर्थ :
हे पांडुरंगा आम्ही दमलो आहोत का, शिणलो आहोत का असे तुझ्या वाचून आम्हाला दुसरे कोण विचारणार आहे? देवा आम्ही आमचे सुख दुःख तुझ्या वाचून दुसरे कोणाला सांगावे आणि दुसरे तरी कोण आमची तहान भूक दूर करील? आमच्या त्रिविधतापाचा परिहार तुझ्यावाचून दुसरा कोण करेल तसेच आम्हाला या भवसागरातून तुझ्या वाचून दुसरा कोण पार करील? देवा आमच्या इच्छेचे भातुके आम्ही कोणाजवळ मागावे तूझ्या वाचून दुसरे कोण आमचे लाड पूर्ण करेल? देवा आम्ही तुझ्या वाचून दुसरी कोणावर सत्ता करावी आणि आमची सत्ता सहन करणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात हे स्वामी माझ्या देवा तुम्ही सर्व जाणते आहात तुमच्या चरणावर माझा दंडवत आहे.
