आळस आला अंगा । धाव घ
3126.
आळस आला अंगा । धाव घाली पांडुरंगा ॥१॥
सोसू शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥धृपद॥
करावी व्यसने । दुरी येउनि नारायणे ॥२॥
जवळील दुरी । झालो देवा धरी करी ॥३॥
म्हणउनि देवा । वेळोवेळा करी धावा ॥४॥
तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरू नका अंगा ॥५॥
अर्थ :
पाडूरंगा परमार्थ करण्याविषयी माझ्या अंगामध्ये आळस आहे तरी तू धाव घाल आणि हा आळस दूर कर. शरीराचे धर्म किती दिवस सोसायचे त्यामुळे अनेक अवगुणाचे घाव माझ्यावर होत आहे. त्यामुळे हे नारायणा माझे सर्व व्यसने तुम्ही दूर करा. देवा मी तुमच्या नेहमी जवळ राहात होतो परंतू या दुर्गुणामुळे मी तुमच्यापासून दूर गेलो त्यामुळे तुम्ही माझ्या हाताला धरा. देवा म्हणून तर मी वेळोवेळी तुमचा धावा करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा म्हणूनच तर मी तुम्हाला विनंती करतो आहे की, मला तुमच्यापासून दूर धरु नका.
