मृत्यूचे प्रसंगी असा
168.
मृत्यूचे प्रसंगी असावे सावध ।
आत्मनिष्ठ बोध राखोनिया ॥१॥
ऐसे गीतेमाजी बोलिला वैकुंठ ।
आज तो शेवट असे आम्हा ॥२॥
अग्नीचे ते बळ आहे आजी देही ।
ज्योती ते हृदयी सावधान ॥३॥
दिवसाची मृत्यू शुक्लपक्षी आहे ।
सांगितले पाहे विचारूनी ॥४॥
नाही एक आजी उत्तरायण खरे ।
सद्गुरूनिर्धारे काय काज ॥५॥
उत्तराभिमुख घालुनी आसन ।
धैर्य सावरून प्राण रोधी ॥६॥
सद्गुरूस्मरणी पाचही ते योग ।
आम्हासी ते सांग फळा आले ॥७॥
बहेणि म्हणे तुज सांगितले वर्म ।
पुढीलही क्रम पाहे डोळा ॥८॥
