॥ श्रीएकनाथमहाराजकृत
15.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ पंधरावा ॥
तापसी-हनुमंत-संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
सावध झाल्यावर त्या वानरांना सभोवती सुवर्णभुवन दिसते :
वानर होवोनि सावधान । पाहती तंव हेमभुवन ।
हेमशय्या हेमासन । उपरी आस्तरण हेमाचें ॥१॥
हेममय तेथींची क्षिती । हेममय अवघ्या भिंती ।
हेमदीपिका हेमदीप्ती । पात्रपंक्ती हेममय ॥२॥
हेमविमानें हेमांबरें । हेमबद्ध सरोवरें ।
हेममत्स्य हेमनगरे । जळचरें हेममय ॥३॥
मुक्ताफळें हेमरत्ने । हेमपदकें हेमभूषणें ।
हेममय उपकरणें । हेमाभरणें पशुपक्षी ॥४॥
ते विवर सर्व समृद्धीने निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण :
विवरी धनधान्यसमृद्धी । विवरी परमामृतनदी ।
विवरामांजि ऋद्धिसिद्धी । सुख त्रिशुद्धी वानरा ॥५॥
नसोनि रविचंद्रभास । विवरामाजी नित्य प्रकाश ।
तेणे वानरा अति उल्लास । पाहती वास वायपुत्राची ॥६॥
ऐसिये रमणीय स्थानी हनुमंत पाहोनिया नयनी ।
मनुष्यमात्र न दिसे नयनी । सकळ भुवनी शोधिता ॥७॥
त्या निर्जन प्रदेशात एका कुमारी तापसीचे दर्शन :
अपूर्व देखिले मंदिरामाझारीं । चीरकृष्णाजिनधारी ।
तापसी बैसली एक कुमारी । तेजेंकरीं देदीप्यमान ॥८॥
तपःप्रताप आगळा । अंगी तेजाचा उमाळा ।
तिसी देखतांचि डोळा । वानरपाळा शंकला ॥९॥
हनुमंताचा तिला प्रश्न :
तिचा शोधावया मुख्यार्थ । पुसता झाला हनुमंत ।
तू कोण या भुवनाआंत । बिलवृतत्तांत मज सांगे ॥१०॥
आत्मनस्त्वनुभावाद्वा कस्य चेदं महब्दिलम् ।
अजानतां नः सर्वेषां सर्वमाख्यातुमर्हसि ॥१॥
तू एकाकी स्त्री अबळा । तपःप्रभावें तेजःप्रबळा ।
कोणे निर्मिलें या बिळा । तुज या स्थळा केंवी प्राप्ति ॥११॥
विवरी समृद्धि संपूर्ण । सुखरुप शोभे भुवन ।
येथील राजा सांग कोण । तेणे हे का स्थान त्यजियेले ॥१२॥
आश्रमासी आलो येथ । आम्ही तुझे अभ्यागत ।
पुसिला सांगोनि वृत्तांत । करी स्वागत अतिथींचे ॥१३॥
एवमुक्ता हनुमंता तापसी धर्मचारिणी ।
प्रत्युवाच हनुमंतं सर्वभूतहिते रतम् ॥२॥
मयो नमा महातेजा मायावी दानवर्षभः ।
पुरा दानवमुख्यानां विश्वकर्मा बभूव सः ॥३॥
तेनेदं कांचनं सर्वं निर्मितं मायया वनम् ।
कथं चेदं बिलं दुर्गं युष्माभिरुपलक्षितम् ॥४॥
त्या गुप्त विवरात आल्याबद्दल तिला आश्चर्य :
ऐसे पुसतां हनुमंत । तापसी जाली अति विस्मित ।
हे विवर अति गुप्त । वानर येथ केंवी आले ॥१४॥
यक्षराक्षसां दुर्गम नित्य । देवदानवां विवर गुप्त ।
तुम्ही काय श्रीरामभक्त । तरीच येथे आलेती ॥१५॥
श्रीरामनामाचा प्रभाव :
श्रीरामनामाचा विश्वास ज्यांसी । नामी आवडी अहर्निशी ।
दुर्गमी रिघ त्या भक्तांसी । निश्चयेंसी मी जाणे ॥१६॥
नाम आवडे मानसी । स्मरण न करीच अति आळसी ।
वांझ गाय कपिला जैसी । जाण तैसी ते भक्ति ॥१७॥
श्रीरामनाम आवडे पोटी । नामेंवीण टवाळ गोष्टी ।
तेही आवडी समूळ खोटी । नये शेवटी उपयोगा ॥१८॥
मुलाम्याचीं नाणी जैसी । घातकी होती ज्याचीं त्यासी ।
दांभिक भक्ति जाण तैसी । साधकांसी अपघाती ॥१९॥
निजात्मप्रतीति कैंची त्यासी । भजन नुरे ज्यांचे त्यासी ।
विकल्प होळ पडिले भक्तीसीं । लोंभे त्यासी नागविले ॥२०॥
तुम्ही नेटाचे श्रीरामभक्त । विवरी प्रवेशतां येथ ।
देहलोभें नित्यनिर्मुक्त । तुम्ही समस्त मज पूज्य ॥२१॥
जन्ममरणाची भयशारी । तुम्ही घालोनि तोडरी ।
प्रवेशलेती या विवरी । राम निर्धारी भक्तांचा ॥२२॥
रामस्मरण अहर्निशी । विघ्ने निर्विघ्न होती त्यासी ।
तो प्रताप तुम्हा वानरांसी । तुमची दासी मी आता ॥२३॥
तुम्हा वानरा समस्ता । मुख्य भक्त तू श्रीहनुमंता ।
श्रीरामभजनी एकाग्रता । तुम्हा समस्ता तारक ॥२४॥
तपःसामर्थ्याने तिला हनुमंताविषयी ज्ञान व आदर :
म्या जे केले अनुष्ठान । तेणैं मज जाले ज्ञान ।
हनुमंताचे भक्तिसमान । नाही आन तिही लोकी ॥२५॥
ऐसे बोलता तापसी । प्रेम लोटलें तियेसी ।
लोटांगणी हनुमंतासी । उकसाबुकसी स्फुंदत ॥२६॥
अग्निकापुरा होता भेटी। विरोनि येरयेरांचे पोटी ।
निरालंब उरे शेवटी । तैसीच गोष्टी तेथे जाली ॥२७॥
निर्धारिता हनुमंतरुप । तापसी झाली अरुप ।
पाहता तापसीचें रुप । सुखस्वरुप हनुमंत ॥२८॥
भक्तभेटीचें लक्षण । लक्षालक्षातीत गहन ।
मनी मने चैतन्य । समाधान येरयेरा ॥२९॥
म्या तप केले निष्काममतीं । त्या तपाची जाली फलप्राप्ती ।
भाग्ये भेटलासी मारुती । भवनिर्मुक्ती तारक ॥३०॥
श्रीरामभक्त ज्यांस भेटती । दर्शन स्पर्शन संवाद स्थिती ।
भावे भवभावनिर्मुक्ती । हेही प्रतीती मज आली ॥३१॥
ऐसे बोलोनि तत्वता । हनुमंतचरणी ठेविला माथा ।
जे तवां पुसिले हनुमंता । समूळ कथा सांगेन ॥३२॥
तापसीची साद्यंत कथा, हैमदानवनिर्मितीचे स्थळ :
मयदानव तेजोराशी । मायविंदान तयापासी ।
दानवीं देखोनि लाघवासी । केले त्यासी विश्वकर्मा ॥३३॥
दानवांची पुरें मंदिरे । कवचें यंत्रें शस्रांस्रं ।
हेमविमानें छत्रचामरें । अति विचित्रें निर्मिलीं ॥३४॥
मुक्ताफळें हिरे रत्ने । हेमभूषणें हेमोपकरणें ।
मायालाघवविंदानें । जे करणे ते मायिक ॥३५॥
मायालाघवी चपळ । निजवस्तीलागी प्रबळ ।
तेणे निर्मिलें हेमबिळ । अर्तक्य स्थळ अति गुप्त ॥३६॥
येथे नसता रविचंद्रांसी । नित्य प्रकाश विवरासी ।
हे लाघव तयापासी । अतर्क्य कोणासी तर्केना ॥३७॥
हेमतरुतर स्वादफळीं । हेमसरोवर अमृतजळी ।
हेमजळचर क्रीडती तळी । हेमकमळीं सुगंध ॥३८॥
हेममंदीरें हेमभिंती । हेमभूमिका हेमक्षिती ।
मय मायिक मायावी स्थिती । जाण निश्चिती कपिराजा ॥३९॥
स तु वर्षसहस्राणि तपस्तप्त्वा महावने ।
पितामहाद्वरं लेभे सर्वमौशनसं धनम ॥५॥
विधाय सर्वबलवान्सर्वकामेश्वरस्तदा ।
उवास सुखितः कालं किंचिदस्मिन्महाबिले ॥६॥
मयासुराचे तप, ब्रह्मदेवाजवळ मरणरहित अवस्थेची याचना :
तेणे मयासुरे येथ । बैसोनियां महावनांत ।
ब्रह्मा प्रसन्न केला तपोयुक्त । तपनेमार्थ साधोनि ॥४०॥
मय वरद मागे आपण । म्या शत्रु मारावे संपूर्ण ।
मज न यावे मरण । ऐसे वरदान मज द्यावे ॥४१॥
ऐकोनि मयाचें वचन । ब्रह्मा झाला हास्यवदन ।
जन्मासवे नित्य मरण । वरदान केंवी लाभे ॥४२॥
निर्मरणवरु मागतां । हिरण्यकशिपु निजयोग्यता ।
सजीव निर्जीव नको म्हणता । नखाग्रता निमाला ॥४३॥
मयासुरा तेचि कथा । मरण नको वर मागता ।
यासी आली मरणावस्था । निर्मरणता केवी लाभे ॥४४॥
देहाभिमानाचिये माथा । नित्य वसे मरणावस्था ।
अहंममता न सांडितां । निर्मरणता केंवी लाभे ॥४५॥
ऐक माझे वरदान । विवरी असता नये मरण ।
बाहेर निघतांचि जाण । वैरी प्राण घेतील ॥४६॥
वैरी आलिया विवरांत । तुझेनि हातें पावती घात ।
बाहेर निघतां निःशंकत । तेथींचा तेथ निमसील ॥४७॥
मयासुरा ऐक निश्चित । जो जाला विषयासक्त ।
त्यावरी करी काळ घात । सत्य वाक्यार्थ ब्रह्मवाणी ॥४८॥
विवरात मृत्यू येणार नाही असे त्याला वरदानः
ब्रह्मा वदे वरदार्थ । सवेंचि पडिला विचारांत ।
सुरवर लोभे निघतां येथ । विवरी समस्त निमतील ॥४९॥
यालागी सुरवरा अतर्कित । बिळद्वार केले गुप्त ।
मयासुर होता नांदत । तोही मरणार्थ पावला ॥५०॥
विवर गुप्त ठेवून तेथूनच असुरांच्या हस्ते देवांवर जारणमारणाचे आभिचारिक प्रयोग :
तापसीस पुसे हनुमंत । मरण नये विवरांत ।
ऐसा ब्रह्मयाचा वरदार्थ । मयासुर मृत्यु का पावला ॥५१॥
मयासुर बैसोनि विवराप्रती । जारण मारण इंद्रवधार्थी ।
दैत्यदानवांस सांगे युक्ती । मंत्रयंत्रोक्ति मोहका ॥५२॥
यालागी मयासुरवधार्थ । इंद्र साक्षेपे टपत ।
रिघो न पावे विवरांत । द्वारी तिष्ठत सर्वदा ॥५३॥
बाहेर येणे नाही मयासी । इंद्र मारू न शके त्यासी ।
तो स्वये पुसे ब्रह्मयासी । मय मरावयासी निजयुक्ति ॥५४॥
ब्रह्मा सांगे इंद्रापती । मयासी कामिनीकामप्रीती ।
बाहेर आणोनि प्रमदायुक्तीं । त्यासी तू घातीं अमरेंद्रा ॥५५॥
तमप्सरसि हेमायां सक्तं दानवपुंगवम् ।
शनैर्निष्क्रांतमालोक्य निजधान पुरंदरः ॥७॥
ब्रह्मदेवाच्या सूचनेवरुन त्याच्या प्रलोभनासाठी हेमा अप्सरेची नेमणूक :
हेमा अप्सरी सुंदरी । माझी सखी निजनिर्धारी ।
ब्रह्मयाने घातली विवरी । मयासुरा मरणार्थ ॥५६॥
कामिनीकामचा आल्हाद । शुंभनिशुंभ सुंदोपसुंद ।
पुरुष निमाले वििवध । मरण प्रसिद्ध स्रीकामें ॥५७॥
कामिनीकामाची आसक्ती । मागे निमाले नेणो किती ।
पुढे स्रीकामेंही मरती । अधोगती स्रीकामें ॥५८॥
हेमाप्सरी सुंदरी । येता देखोनी विवरी ।
मयासुर पडिला फेरीं । भाग्ये करी आलीसी ॥५९॥
हेमाकामिनीं काम गहन । दोघीं केले मद्यपान ।
करीत गायन नर्तन । बाहेरी आगमन दोघांचे ॥६०॥
तिच्याबरोबर बाहेर आल्यावर इंद्राचा त्याच्यावर वज्राघात :
कामिनिकामें नृत्यगीतस्वरीं । तीसवें आला विवराबाहेरी ।
इंद्रें साधूनिया वैरी । वज्रेंकरी मारिला ॥६१॥
ब्रह्मदेवाने सुवर्णमय भुवन तिला दिले :
मय मायिक हेममंडन । ब्रह्मा होवोनि प्रसन्न ।
हेममय करोनि भुवन । दिधले स्थान हेमेसी ॥६२॥
इदं च ब्रह्मणा दत्तं हेमायै वनमुत्तमम् ।
शाश्वतः कामभोगश्च गृहं चेदं हिरण्ययम् ॥८॥
दुहिता मेरुसावर्णेरहं तस्याः स्वयंप्रभा ।
मम प्रियसखी हेमा नृत्यगीतविशारदा ॥९॥
तया दत्तवरं चेदं रक्षामि भवनं महत् ॥१०॥
ब्रह्मा होवोनि सुप्रसन्न । हेमेसी हेममय भुवन ।
स्वये दिधले संतोषोन । आणि स्थान अति दुर्गम ॥६३॥
सुवर्णमनूची स्वयंप्रभा नावाची कन्या :
सुवर्णमनूची मी दुहिता । स्वयंप्रभा नामांकिता ।
हेमा सखी माझी आप्तता । एकात्मता दोहींसी ॥६४॥
तेचि काळी म्या आपण । ब्रह्मयासी मागितले वरदान ।
द्यावे निष्काम अनुष्ठान । मुक्तत्व पूर्ण मज द्यावे ॥६५॥
ब्रह्मदेवाच्या कृपेनें निष्काम अनुष्ठानाचे तिला वरदान :
ऐकोनि माझी विनंती । संतोषला प्रजापती ।
आवडी मानोनी वचनोक्ती । अति प्रीती स्वये वदला ॥६६॥
धन्य निष्कामाचे वदन । धन्य निष्कामाचे वचन ।
धन्य निष्कामआगमन । जग पावन निष्कामे ॥६७॥
निष्कामाचे मज कौतुक । निष्कामाचे मज सुख ।
देखोनि निष्कामांचें मुख । परम हरिख हरिहरा ॥६८॥
ये विवरी हरिहर स्थान । पावसी निष्काम अनुष्ठान ।
स्वयंप्रभे सत्य जाण । हे वरदान तुज माझे ॥६९॥
श्रीरामभक्तांशिवाय दुसरे येथे कोणीही येणार नाही अशी वरप्राप्ती :
आणिका रीघ नव्हे येथ । विवरां येती श्रीरामभक्त ।
त्यांचे केलिया आतिथ्य । नित्यमुक्त त्यांचेनि ॥७०॥
हरिदासदर्शनस्पर्शन । अभिनंदन संभाषण ।
आतिथ्य करिता संपूर्ण । मुक्तपण निजवंद्य ॥७१॥
हरिदासांची संगती । भाग्येंवीण नव्हे प्राप्ती ।
हरिदासांची सद्भक्ती । नित्यमुक्ती स्वभावे ॥७२॥
ऐसे मज देवोनि वरदान । अदृश्य जाला चतुरानन ।
हेमा माझी सखी जाण । तिचे हे भुवन ब्रह्मदत्त ॥७३॥
हेमा सकाम कामसक्ती । येथे नाही पुरुषप्राप्ती ।
मज ठेवोनि रक्षणार्थी । स्वर्गाप्रती ते गेली ॥७४॥
ब्रह्मवाणी सत्यभूत । ते हे तुम्ही श्रीरामभक्त ।
माझेनि भाग्ये आलेती येथ । मज निर्मुक्त करावया ॥७५॥
ऐसे बोलोनिया जाण । तापसी घाली लोटांगण ।
वंदोनि हनुमंताचे चरण । काय आपण विनवित ॥७६॥
क्षुधे पीडिले वानर । वनी रिघोनि समग्र ।
फळं भक्षावीं मधुर । प्राशावें नीर स्वादिष्ठ ॥७७॥
अर्थी चास्मि प्रयच्छार्थं रणधर्ममनुत्तमम् ।
प्रीयमाणा निराहारान्संजीवय तपोधने ॥११॥
भुकेल्या वानरांसाठी आहाराची याचना :
ऐकोनि तापसीचें वचन । हनुमंत बोले आपण ।
भुकें वानरांचे जाती प्राण । वृक्षारोहण न करवे ॥७८॥
वानर असते सावधान । मघांची विध्वंसिते वन ।
तुज पुसावया राहतें कोण । क्षुधेने क्षीणबळशक्ति ॥७९॥
वानरांची शक्ती क्षीण । वृक्षीं न करवे उड्डाण ।
आणोनि द्यावे आपण । वांचवीं प्राण क्षुधितांचे ॥८०॥
अभिगम्योत्तमं दानं दानमाहूय मध्यमम् ।
याच्यमानं तु अधमं सेवादानं ततोऽधमम् ॥१२॥
दानचे प्रकार, स्वयंदान अत्युतम :
आणून देणे जे आपण । हे दानामाजी उत्तम दान ।
जे द्यावे घरा पाचारुन । मध्यम दान त्या नांव ॥८१॥
वेळोवेळा काकुळती । येवोनि याचक मागती ।
ऐसे देणे तयांप्रती । दानस्थिति ते निंद्य ॥८२॥
वसवसुन देती अन्न । एक देती निर्भर्त्सून ।
ते ते अधमाधम दान । पात्रा निंदोन जे दे ॥८३॥
सेवा घेवोनि आपण । द्विजांसी देती जे दान ।
दान नव्हे ते मजुरी जाण । दातृत्व पूर्ण अधमाधम ॥८४।
यालागी स्वधर्मक्षण । करावया स्वयंप्रभे जाण ।
आततांसी फळे अर्पून । वांचवी प्राण वानरांचे ॥८५॥
साधोस्तस्य वचः श्रुत्वा तापसी ब्रह्मचारिणी ।
आदाय फलमूलानि विधिनोपाहस्तदा ॥१३॥
भक्षयित्वा च ते सर्व पीत्वा च विमलं जलम् ।
प्रसन्नवदनाः सर्वे सर्वे संतुष्टमानसाः ॥१४॥
सर्वेऽपि बलवीर्याढ्यास्तत्रासन्हरियूथपाः ।
अपश्यन्सर्व एवैते दिशो वानरपुंगवाः ॥१५॥
तापसीने स्वतः फळे आणून वानरांना दिली :
ऐकोनि हनुमंताचे वचन । तापसी फळे आणूनि पूर्ण ।
करोनि विधियुक्त पूजन । दिधले भोजन ते ऐका ॥८६॥
पृथु चक्रवर्ती आपण । जैसे करी भगवत्पूजन ।
तेंवी हनमंतासि वानरगण । पूजी संपूर्ण उल्लासें ॥८७॥
जया जैसे आवडे फळ । जया जैसे आवडे मूळ ।
तया तैसे अर्पूनि जळ । सुपरिमळ शिखरणी ॥८८॥
वानरा हेमाचीं ताटें । फळे ओगरिली चोखटे ।
नाना रसीं भरिले वाटे । अपूर्ण कोठे पडो नेदी ॥८९॥
आम्ररसें मधुरसें । अमृतरसे सुरस रसे ।
वानरा पीडिलें मासोपवासें । अति उल्लासें भक्षिती ॥९०॥
फळाचें अंतर्दृष्टीने वर्णन :
एके विडुळलीं सकाम वातें । एके हिरवी करकरितें ।
एके बहुबीजें बुचबुचितें । एके कचकचित अर्धकाचीं ॥९१॥
एके जडजाड्यें जारठली । एके सकाम लोभे सारटलीं ।
विकल्पमुरडें मुरकुटलीं । झडोन पडली अमार्गीच ॥९२॥
एके अभावववातें झडली । वनिताकुचकर्दमी पडली ।
सवेंचि तेथोनि गडबडलीं । ती बुडालीं अंधतमीं ॥९३॥
एके विवादकर्मठें । विधिनिषेधअतिअंबटें ।
एके तपस्तेजें तिखटे । एके तिरटें मतमुद्रा ॥९४॥
एके वरिवरी बरवंटें । आंत द्विजद्वेषाचें कांटे ।
एके दिसताती चोखटे । अति कडवटें परनिंदा ॥९५॥
एके भेदवादें खणुवालीं । सभेदाच्या बुचबुचित आळीं ।
त्यांसी न सेविती काउळी । पडिल्या धुळीतें मिळती ॥९६॥
गारठेलीं फळे अशांत । पडोनि फुटलीं जेथींची तेथ ।
वानर त्यांसी न लाविती हात । दुर्गंधि ते अति दुष्ट ॥९७॥
एक समेळ फळांचे घड गाढे । आदळले पाखाडियापुढें ।
फुटोनि होती पै तुकडे । पडती किडे सुळसुळती ॥९८॥
एके संज्ञानतेचिया शिखरीं । पडोनि जालीं काचरीं ।
त्यांसी न सेविजे वानरी । झडपिती घारी गर्वाच्या ॥९९॥
वनिता हातींहूनि निसटलीं । अहमंमतादेठींहूनि सुटली ।
संकल्पविकल्पें तुटली । फळे आली परिपाका ॥१००॥
नित्य निर्विकारें पाडा आली । शांतिसेजे स्वये मुरालीं ।
जी नैराश्ये मघमघिलीं । फळे सेविलीं वानरी ॥१०१॥
शांत दांत अरुवारलीं । आंत बीज न बाहेरी साली ।
सुखस्वरुपें साकारिलीं । फळे सेविलीं वानरी ॥१०२॥
निजात्मबोधे मघमधित । नित्य नैराश्ये रस गळत ।
जेथे हंस शुक झेंपावत । ती फळे भक्षित वानर ॥१०३॥
अहंकोहं सोहंविहीन । ब्रह्मी ब्रह्मत्वही लीन ।
सांडोनिया मीतूंपण । फळे परिपूर्ण सेविती ॥१०४॥
बहुकाळाचे बुभुक्षित । केले परिपूर्ण नित्य तृप्त ।
बाप कृपाळु श्रीरघुनाथ । संकटीं भक्त वांचविले ॥१०५॥
संकट बाधू जाती भक्त । संकटीं निकट श्रीरघुनाथ ।
द्वंद तेथे निर्द्वद्व होत । भक्त निर्मुक्त श्रीरामे ॥१०६॥
ऐसिया पूर्णत्वाचे सिद्धीं । वानरा जाली पारणाविधी ।
श्रीराम कृपाळु द्वंद्वबाधी । भक्त त्रिशुद्धीक वांचविले ॥१०७॥
ग्रंथीं बोलतो त्रिशुद्धी । त्रिशुद्धीची कवण विधी ।
सद्गुरुवीण नव्हे सिद्धीं । सावध बुद्धी अवधारा ॥१०८॥
शब्द निःशब्द शब्दशुद्धी । आशा निराशा मनःबुद्धी ।
देही विदेहत्व देहशुद्धी । जाणा त्रिशुद्धी पावन ॥१०९॥
ऐशिया त्रिशुद्धी वानर । पावोनि तृप्त अभयंकर ।
देती स्वानंदे उद्गार । तेणे अंबर गर्जत ॥११०॥
वानरांची तृप्ती :
फळे खाती गटागटां । मिटक्या देती मटमटा ।
लाळ येतसे नीळकंठा । भक्तवाटा सेवावया ॥१११॥
वांकुल्या दाविती सुरवरा । वांकुल्या दाविती ऋषीश्वरा ।
फळे सेविता वानरा । दुःखा दुस्तरा मुकले ॥११२॥
वानर भोजनसमाजें । मिटक्या देता अंबर गाजे।
तापसी धाडिली श्रीरघुराजें । कपिसमाजा वांचवावया ॥११३॥
संरक्षावया निजभक्तांसी । श्रीरामे निर्मिली विवरासी ।
श्रीरामे धाडिली तापसी । वानरांसी वांचवावया ॥११४॥
बुभुक्षितांना अन्नदान, सर्व दानाहून श्रेष्ठ :
बुभुक्षितांसी तृप्तिभोजन । तेणे सुखी श्रीभगवान ।
तापसीचें भाग्य गहन । श्रीरामजन सुखी केले ॥११५॥
दुष्काळींचें द्विजभोजन । राजसुर्ययागाहूनि गहन ।
अश्वमेधादिक रज्ञ । मशक होय त्यापुढे ॥११६॥
बुभुक्षितां दिधले अन्न । सुखी केले दीपजन ।
तेणे सुखावे श्रीभगवान । यज्ञादि पुण्य ते मशक ॥११७॥
तापसीचें भाग्य गहन । फळे आणोनि संपूर्ण ।
वानरा देतांचि भोजन । सावधान ते जाले ॥११८॥
विधिनोपाहरत्तदा । याचि धरोनि श्र्लोकाच्या पदा ।
वानरजनसंपदा । ग्रंथानुवादा मी वदलों ॥११९॥
व्यर्थ वाढविले ग्रंध्रा । ऐंसे न म्हणावें श्रोतां ।
मुनीच्या धरोनि पदार्था । ग्रंथी ग्रंथता राम वदवी ॥१२०॥
नेणे वेदशास्त्रश्रवण । माजे अंगी मूर्खपण ।
माझे हिरोनि मीपण । राम रामायण स्वये वदवी ॥१२१॥
श्रोते म्हणती नवलावो । वानरभोजनअभिप्रावो ।
शुद्ध साधूनी भक्तिसद्भावो । ब्रह्मान्वयो स्थापिला ॥१२२॥
आधींच रम्य रामायण । वरी हे रसाळ निरुपण ।
कथा नव्हे ब्रह्म पूर्ण । सुखी पूर्ण आम्हा केले ॥१२३॥
ऐकोनि श्रोतियांचे वचन । एकाजनार्दनी लोटांगण ।
जे देखाल माझे न्यून । ते ते संपूर्ण तुम्ही कीजे ॥१२४॥
श्रोते म्हणती नवल आंता । स्वये श्रीराम वदनी वक्तां ।
रामे रम्य रामकथा । न्यूनपूर्णता असेना ॥१२५॥
एकाजनार्दना प्रबोधी । वानरा जालीं पारणाविधी ।
पुढे लाभेल सीताशुद्धी शोधनविधी अवधारा ॥१२६॥
स्वति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
तापसीहनुमंतसंवादो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
॥ ओंव्या १२६ ॥ श्लोक १५ ॥ एवं १४१ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
