वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

समुद्रवलयांकित तीर्थ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085836 · अभंग क्र. १६१८

1618.
समुद्रवलयांकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र । परी तेथे नसता भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥
ऐसा निर्णय शास्त्री । पुराणी सांगतसे व्यक्ति । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें परियेसा ॥२॥
जे शुचिर्भूत शुद्धमती । ईश्वर मानिती सर्वाभूतीं । ते सर्वदा वसती तीर्थीं । तीर्थे वसती त्यांच्या संगें ॥३॥
तीर्थीं नसतां तीर्थवास । सत्य निष्ठा नित्य निर्दोष । तीर्थो वसतां पुण्यलेश । न पावे तीर्थ निंदितां ॥४॥
मत्सर निष्ठुर भूतद्वेष । भजनमार्गीचा उपहार । तीर्थे घेती त्यांचा त्रास । कीटक द्वेष त्या करिती ॥५॥
काम क्रोध लोभ माया । स्पर्श न करी जयाची काया । तो तीर्थवासी जाणे राया । तीर्थे पाया वंदिती ॥६॥
विष्णुस्मरण शिवस्मरण । नित्य वसवी ज्यांचे वदन । तोचि तीर्थ जाण । तीर्थे चरण वंदिती ॥७॥
इंद्रिय नियमाचे आसनी । नित्य माधुर्य बोलली वाणी । अहंकार ज्याचिये ज्ञानीं । संतचरणा सर्वथा ॥८॥
तो सकळ शिष्टांचा धात्रा । तीर्थे करिती त्याची यात्रा । पादोदकालागी पवित्रा । तीर्थे माथा वोढविती ॥९॥
तीर्थीं असोनि इच्छारहित । प्रतिग्रहा न वोढवी हात । यथालाभें संतोषत । तो तीर्थरुप जाणावा ॥१०॥
परधनीं अंधत्व जयाचे नयना । परस्त्री पाहता क्लीबत्व
जयाचे मना । परापवादी मूकत्व जयाचे वदना । तो जनक जाण तीर्थाचा ॥११॥
मने इंद्रिया निग्रह करी । तो गृहीं असता जान्हवीतीरीं । तीर्थी असो अनाचारी । तो कीटकवासी जाणावा ॥१२॥
सत्यशील दृढव्रती । आत्मभावना सर्वाभुती । क्रोधकंटका नातळे चित्ती । तो सर्व तीर्थीं सेविजे ॥१३॥
शुद्धशीळ विद्यातीर्थीं । साधु सुस्नात सत्यतीर्थी । कुलांगना लज्जातीर्थीं । पवित्र होती जाण पा ॥१४॥
धनाढ्य निर्दोष दानतीर्थीं । पापी निष्पाप गंगातीर्थीं । क्षत्रिय राजे धारातीर्थीं । प्रक्षाळिती अघातें ॥१५॥
योगी आत्मध्यान तीर्थीं । आत्मस्वरुप स्वये होती । श्रवणादिक नवही तीर्थी । भक्त होती हरिरुप ॥१६॥
असो या निरोपणाच्या युक्ती । जाणते अथवा हो नेणती । शरीर प्रक्षाळिता तीर्थीं । मोक्षप्राप्ति निर्धारे ॥१७॥
ऋषीश्वरी वेदवचनीं । महा फलें कल्पीं यज्ञीं । ती यज्ञफळीं तीर्थस्त्रानीं । सकळ तीर्थे नामस्मरणीं ॥१८॥
शरण एका जनार्दनी । सकळ तीर्थे नामस्मरणीं । घडती संतसंघटनीं । येथे संशय नाही ॥१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग