तव आली वार्षिक यात्र
125.
तव आली वार्षिक यात्रा ।
करणे इंद्रपूजा सर्वत्रा ।
गोरसे काढुनी कावडी भरा ।
हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥
जाऊनिया पर्वतासी ।
सुरपती पुजावा प्रतिवरुषीं ।
जागोनिया त्याची दिवसासी ।
निदसुरिया देती आठव ॥२॥
म्हणती उच्छिष्ट न करावे गोरस ।
दूध दही तूप सायास ।
लोणी भरुनिया कावडीस ।
रंग लावावा घागरमाळा ॥३॥
ध्वजा कुंचे सिध्द करा ।
विदया लावूनिया अपारा ।
जावे परिवारेंसी सत्वरा ।
प्रात:काळी देवपूजे ॥४॥
गोवर्धनी सुररावो ।
पूजा इच्छी देखोलि भावो ।
यालागी सकळही समुदावो ।
जावे आपुल्या कल्याणा ॥५॥
मेघा तोषोनि यावरी ।
इच्छिल्या ऐसी वृष्टि करी ।
तेणे पिकती घुमरी ।
आणि गोधनेंही दुभती ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि श्रवणी ।
विस्मय मानी चक्रपाणी ।
म्हणे मज प्रत्यक्षा सांडुनी ।
कैचा इंद्र आणियला ॥७॥
