ब्रह्मादिक तेथे करित
1087.
ब्रह्मादिक तेथे करिताती पूजा | घालिताती सेजा समाधीसी ॥१॥
चिद्रत्न आसन उन्मनीची धुनी | समाधि सज्जनी पाहियेली ॥२॥
धुवट वस्त्राची घडी ते अमोल | तुळसी आणि बेल आंथरिले ॥३॥
दूर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे | पुष्पे ती सकळे समर्पिली ॥४॥
नामा म्हणे येथे छाया निरंतर | सुखी ज्ञानेश्वर सुखावला ॥५॥
