ऐसा हा लौकिक कदा राख
155.
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करिता म्हणती हा दोषी । टाकिता आळसी पोटपोसा ॥२॥
आचार करिता म्हणती हा पसारा । न करिता नरा निंदिताती ॥३॥
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी । येरा आभाग्यासी ज्ञान नाही ॥४॥
धन नाही त्यासी ठायींचा करंटा । समर्थासि ताठा करिताती ॥५॥
बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ । न बोलाता सकळ म्हणती गर्वी ॥६॥
भेटिसी नवजाता म्हणती हा निष्ठुर । येता जाता घर बुडविले ॥७॥
लग्न करु जाता म्हणती हा मातला । न करिता झाला नपुंसक ॥८॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ॥९॥
लोक जैसा ऒक धरिता धरवेना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥१०॥
तुका म्हणे आता आइका वचन । त्यजुनिया जन भक्ति करा ॥११॥
