भलते जन्मी मज घालिसी
2235.
भलते जन्मी मज घालिसील तरी । न सोडी मी हरी नाम तुझे ॥१॥
सुख दुःख तुज देईन भोगिता । मग मज चिंता कासयाची ॥धृपद॥
तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगिता विठ्ठला गर्भवास ॥२॥
कासया मी तुज भाकितो करुणा । तारी नारायणा म्हणवुनि ॥३॥
तुका म्हणे तुज येऊ पाहे उणे । तारिसील तेणे आम्हा तया ॥४॥
अर्थ :
हे हरी तु मला कोणत्याही जन्मास घातले तरी मी तुझे नाम सोडणार नाही. देवा तु मला कुठेही जन्माला घातले तरी त्या जन्मातील जी सुखदुःखे आहेत ती सर्व सुखदुःख तुला अर्पण करीन तुलाच भोगायला लावीन मग मला चिंता कसली आहे? हे विठ्ठला मी कोणताही गर्भवास भोगत असलो तरी स्वतःला तुझाच अंकित आहे असे म्हणून घेईन. हे नारायणा अरे मी तुला करुणा का भाकत आहे कारण तु मला या भवसागरातून तारावे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात तु जर आम्हाला तारले नाहीस तर तुझे जगामध्ये उणेपणा म्हणजे कमीपणा होईल या भीतीने तरी तु आम्हाला तारशील.
