जे केली आळी ते अवघी
2234.
जे केली आळी ते अवघी गेली वाया । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
काय समाधान केले कोण वेळे । कोणे माझे लळे पाळियेले ॥धृपद॥
आभास ही नाही स्वप्नी दुश्चिता । प्रत्यक्ष बोलता कंइचा तो ॥२॥
आता पुढे लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥
तुका म्हणे आता नाही भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
अर्थ :
हे पंढरीराया मी आजपर्यंत तुमच्याकडे जो जो हट्ट केला तो व्यर्थ गेला आणि माझ्या हाती व्यर्थ समज उरला आहे. देवा तु आज पर्यंत माझे काय काय समाधान केले आणि माझे लाड तरी आतापर्यंत कोणी पुरवले का? देवा मला आजपर्यंत स्वप्नात देखील तुझे दर्शन किंवा आभास झाला नाही आणि मला केवळ त्यामुळेच दुःख वाटत आहे आणि तुझ्या समोर अस प्रत्यक्ष बोलताना मला चिंता आणि भय कसलं? हे पांडुरंगा माझी आज पर्यंत जगामध्ये तुझा भक्त म्हणून चांगलीच मान्यता झाली आहे परंतु मला तुझे दर्शन होत नाही त्यामुळे मला तुझा भक्त म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझा तुझ्यावर भरोसा राहिला नाही कारण तु आता मला मोकार टाकून देतोस की काय याची भीती मला वाटत आहे.
