॥ श्रीएकनाथमहाराजकृत
79.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकोणऐंशीवा ॥
हनुमंत- भरत भेट -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
क्रिशमात्रमयोध्यायाश्चीरकृष्णाजिनाम्बरम् ।
ददर्श भरतं दीनमृषिभिः सह वासिनम् ॥१॥
जटिलं मलदिग्धांगं भ्रातृव्यसनकर्पितम् ॥२॥
हनुमंताला भरत कसा दिसला ? :
अयोध्येहूनि क्रोशमात्र' । नंदिग्राम भरतनगर ।
तेथे येवोनि कपिकुंजर । पातला घर भरताचे ॥१॥
तंव वसिष्ठादि ऋषीश्वर । भरतासमीप थोर थोर ।
व्रतस्थ झाले समग्र । वल्कलांबर कृष्णाजिनीं ॥२॥
तापसवेषी वनचर । कंदमूळफळाहार ।
व्रतें धरियेली दुर्धर । कृशोदर पै भरत ॥३॥
अस्थि चर्म झाले एक । मांस आटले सकळिक ।
रुधिर शोषिलें निःशेख । पंजर देख उरलासे ॥४॥
श्रीरामाचेनि स्मरणे जाण । भरतदेह वांचला पूर्ण ।
तेणे भासे देदीप्यमान । जीवन आन असेना ॥५॥
श्रीराम स्वये वना गेला । विषयभोग सहज चुकला ।
विषयी असोनि त्याग केला । धैर्याथिला महामेरू ॥६॥
राज्यभोग पै समस्त । असता सर्वथा नातळे चित्त ।
भोगी असोनि भोगातीत । अति विरक्त देहभावा ॥७॥
सकळ भोगा देवोनि पाणी । देहा तुच्छत्वें मानोनी ।
अहर्निशी रामचिंतनीं । ख्याति त्रिभुवनी भरताची ॥८॥
सर्वथा ज्यासी न मिळे भोग । त्यासी सहजचि झाला त्याग ।
भोगी असोनिया विराग । अभिनव भाग्य भरताचे ॥९॥
जेवी चंदनाच्या संगतीं । सकळ वनींच्या वनस्पती ।
अवघ्याचि चंदन होती । बहुत शोभती चौफेर ॥१०॥
तैसे भरतें केले पूर्ण । सकळा श्रीराम भजन ।
सांडोनिया मानाभिमान । श्रीराम गुण वर्णिती ॥११॥
एक झाले ते वीतराग । एकी निःशेष केला त्याग ।
एक ध्यानस्थ अभंग । कीर्तन चांग पै एका ॥१२॥
नगरींचे सकळ लोक । श्रीरामालागी त्यक्तोदक ।
भरतनमनालागी देख । आले सकळिक समकाळे ॥१३॥
मुदत संपली तरी राम आले नाहीत म्हणून भरताला चिंता :
तंव भरत चिंताक्रांत । श्रीरामवियोगें संतप्त ।
अति दुःखे विलाप करित । श्रीरघुनाथ का न ये ॥१४॥
पादुका पूजोनि अति निगुती । सकळ ऋषिवरांप्रती ।
भरत पुसतसे प्रीती । श्रीरघुपति का न ये ॥१५॥
चवदा वषै लोटली पुरी । दोन दिवस अधिक वरी ।
श्रीराम न येचि निर्धारी । केली खरी उदासता ॥१६॥
श्रीराम पहिलेंचि विरक्त । राज्यभोगा उदासभूत ।
वरी वनवास झाला प्राप्त । सुख अद्भुत तेणे त्यासी ॥१७॥
आत्माराम पै निश्चित । सुचिंतनेने नित्यतृप्त ।
कायसा राज्य राज्यार्थ । विषय तेथ अति मिथ्या ॥१८॥
मिथ्या पदार्था रघुपती । नातळे सर्वथा निश्चिती ।
आम्हासी लागली आहे भ्रांति ॥ वांछू चित्ती रामभेटी ॥१९॥
भरत स्वतःलाच दोष देतो :
काय आम्ही केली भक्ती । कोण आचरलों तपःस्थिती ।
अथवा नव्हों अंतरवृत्ती । सहोदर निश्चिती रामाचे ॥२०॥
तिळ एक भासे भेदभान । तेथ सर्वथा न मनी मन ।
आम्ही तरी केवळ सापत्न । केंवी रघुनंदन भेटेल ॥२१॥
पूर्वी विषयलोभें ठकलो । मायामातुळें नागवलो ।
श्रीरामासी अंतरलों । भोगबुद्धी करोनी ॥२२॥
तेथोनि येता पै प्रयासीं । सद्गुरुचि माते उपहासी ।
अंगाकारीं तू राज्यासीं । अभिषेकासी करू दे ॥२३॥
मजसन्मुख सकळ जन । बोलती अभिषाप दारुण ।
मारू जातो रघुनंदन । म्हणोनि जग निंदिती ॥२४॥
भेटो गेलो वनवासी । तेथेंही झालो अपेशी ।
सौमित्र मारू धांवे वेगेंसीं । राज्याभिलाषी म्हणवोनी ॥२५॥
श्रीराम स्वये आपण । वचन बोलिला अति कठिण ।
तुज करू अभिषिंचन । म्हणोनि आपण सरसावला ॥२६॥
तेचि काळे देहपात । माझा व्हावा त्वरित ।
का वांचला जीवे जीत । पाषाणवत् भूमिभार ॥२७॥
पुढे अर्थही तैसाचि झाला । विषयाभिलाषें वहिला ।
राज्य घेवोनि परतला । दृढत्वें कळला लोभ रामा ॥२८॥
हनुमंत ओषधींसमवेत । गगनी जातो मार्गस्थ ।
त्यांसींही केले उद्धत । बाण अवचित सोडिला ॥२९॥
श्रीरामभक्तावरी संधान । दृढ न विचारिता केले जाण ।
महापापी आन कोण । मजहूनि पै आहे ॥३०॥
अगाध हनुम्याचा बडिवार । विषाद न मानीच अणुमात्र ।
समाधान वेगवत्तर । मज सत्वर दीथले ॥३१॥
ऐसे जाणतांही तत्वता । कोण माझी विषयासक्तता ।
सर्वे न वचेंचि हनुमंता । लोभे सर्वथा नाडिलो ॥३२॥
नाही वैराग्य कडाडी । निजांगें घालोनिया उडी ।
भेटी न घेंचि तांतडी । धरिली गोडी विषयांची ॥३३॥
महापातकाचें फळ दारुण । निश्चयेसी हेचि जाण ।
विषयगोडी पुनःपुन । सर्वथा मन सांडीना ॥३४॥
महापातकी विषयिपण । म्हणोनिया रघुनंदन ।
निश्चये झाला उदासीन । सर्वथा वदन न पाहे ॥३५॥
कशाशी आहें जीवे जीत । इये पृथ्वीसीं भारभूत ।
वृथा जीवोनि काय येथ । अति निंदित लौकिकी ॥३६॥
उदास होवोनि श्रीराम पाहे । ज्याचे हृदय सांडूनि जाये ।
जळो त्याचे जीवित्व काये । भार न साहे धरित्री ॥३७॥
आम्ही तरी अत्यंत आप्त । बंधु रामाचे म्हणवीत ।
त्यासी न पाहे रघुनाथ । गेला निश्चित सांडूनी ॥३८॥
भरतासहित इतरांचाही रामवियोगामुळे विलाप, भरताला मूर्च्छा :
म्हणोनिया शोकाकुलित । विलाप करी दुःखाक्रांत ।
नेत्री अश्रुधारा स्रवत । पडिला मूर्च्छित धरेवरी ॥३९॥
शोकें जाळिलीं अंतर । प्राण जावों पाहे सत्वर ।
तैसाचि शत्रुघ्न महावीर । दुःखे तत्पर रामविरहें ॥ ४ ० ॥
ऋषीश्वरा तेचि अवस्था । श्रीरामवियोगें भरतें चित्ता ।
नेत्री जलबिंदु स्रवतां । रोमांचितता शरीरी ॥४१॥
कंठी बाष्पे पै दाटती । गात्रें चळचळा कांपती ।
अनावर प्रेमस्थिती । ऋषी लोळती गडबडा ॥४२॥
नागरिक लोक समस्त । श्रीरामवियोगें संतप्त ।
देहभाव न सांभाळित । अवघे मूर्च्छित पडियेले ॥४३॥
देखोनि भरताची अवस्था । प्रेम न साहेचि हनुमंता ।
मूर्च्छित पडिला तत्वता । होय आवरिता विवेके ॥४४॥
सत्वावस्था आवरोनि तेथ । अगोचर हनुमंत ।
येवोनि पहातसे वृत्त । तंव अद्भुत आणिक झाले ॥४५॥
दशरथाच्या स्त्रियांना भरताच्या ठिकाणी रामांचा भास :
सकळ दशरथाच्या कामिनी । सवे कैकेयी सुमित्रा दोनी ।
कौसल्या ज्येष्ठपत्नी । त्वरेंकरोनी पातल्या ॥४६॥
तंव येथे वेगवत्तर । माता देखती विचित्र ।
भरत पाहता रघुवीर । दिसे गोचर सकळांसी ॥४७॥
तेणे झाल्या हाहाभूत । काय झाला तो भरत ।
कोण्या योगें रघुनाथ । येथे मूर्च्छित पडियेला ॥४८॥
काय झाला तो लक्ष्मण । कोठे गेली जनकनंदिन ।
रामे तयांतें सांडून । केले आगमन एकले ॥४९॥
म्हणोनि अवघी दुःखाक्रांत । करमकळीं ललाट पिटित ।
सकळा हंबरडा हाणित । देहपात होऊं पाहे ॥५०॥
रामरूपें भरतासी । माता धरोनि पोटासीं ।
रुदन करी आक्रोशी । झणें मोकलिसी श्रीराम ॥ । ५१ ॥
रायासवें सहगमन । करिता तुझे भेटीलागून ।
अति युक्ति करोनि जाण । सस्तुरूनें आपण राहविलें ॥५२॥
रामाचे भेटीपुढें । सहगमन ते बापुडे ।
म्हणोनिया वाडेंकोडें । निजनिवाडे राहविलें ॥५३॥
यालग्रिन मुखचुंबन । माता करितसे जाण ।
का बा न देसी प्रतिवचन । कायसे मौन धरियेले ॥५४॥
धन्य भाग्य ते भरताचे । ध्यान करिता श्रीरामाचे ।
सबाह्म तदूप झाले साचे । ऐसे ध्यानाचे महिमान ॥५५॥
भरत शुद्धीवर आल्यावर तो राम नाही
हे कळल्याने कौसल्या अधिकच दुःखी :
श्रीरामरूप देखोनि माता । अति आक्रोशे विलाप करिता ।
भरत सावध झाला चित्ता । दुःखित माता देखिली ॥५६॥
येरी पाहे सावधान । तंव राम नव्हे भरत जाण ।
तेणे अत्यंत उद्विग्न । रघुनंदन न देखे ॥५७॥
राम आता येथे होता । तूतें देखिले नाही भरता ।
ऐसे बोल बोलता । झाली माता विव्हळ ॥५८॥
तेणे भरत अत्यंत । सवे झाला दुःखाक्रांत ।
का पा न येचि रघुनाथ । काय ऋषिभाषित लटिकेंचि ॥५९॥
अनागत रामायणीं । वदली वाल्मीकाची वाणी ।
ते लटकी झाली कैसेनी । श्रीराम असूनी न येचि ॥६०॥
हनुमान येवोनियां येथ । स्वये बोलिला पुरुषार्थ ।
शीघ आणीन रघुनाथ । तेंही भाषित लटिके काय ॥६१॥
असो हनुमंताची गोष्टी । असो ऋषीची चावटी ।
श्रीराम स्वये वाक्पुटी । बोलिला गोष्टी तेही लटिकी ॥६२॥
पितृआज्ञा पै नेमस्त । चौदा वर्षे वनवासाव्रत ।
संपादोनि इत्थंभूत । येई निश्चित नेमातीं ॥६३॥
रामांची भेट नाही म्हणून भरताचा प्राणत्यागाचा निर्धार :
श्रीरामाची वचनें ऐसी । तीही वृथा झालीं कैसीं ।
आता ठेवोनि काय देहासी । जीवघातासी करीन ॥६४॥
रामांवाचूनि धडफुडी । देहहाडाची कोरडी ।
कोण सोशील जन्मबेडी । घालूं कडाडीं देहपाता ॥६५॥
ते देखोनि हनुमंत । झाला अत्यंत भयभीत ।
कठिण भारी रघुनाथ । चिन्ह पाहवीत काय याचे ॥६६॥
याहीउपरी पाहता चिन्ह । याचे होईल प्राणोत्क्रमण ।
ऐसे दिसताहे निर्वाण । रामागमन नायकता ॥६७॥
त्या बिकट प्रसंगी हनुमंताचे तेथे आगमन :
म्हणोनि हनुमान लवडसवडी । आठा भावांची परवडी ।
उभवोनि स्वानंदाची गुढी । हाक फोडी रामनामे ॥६८॥
अनुशोचति काकुत्स्थे हनुमान्वाक्यमब्रवीत् ।
प्रियमाख्यामि ते वीर शोकं जहि सुदारुणम् ॥३॥
अस्मिन्मुहूर्ते रामेण भ्रात्रा त्वं संगमिष्यसि ।
निहत्य रावणं रामो प्रियां लभ्य च मैथलीम् ॥४॥
सीता व लक्ष्मण यांसह श्रीराम येत
असल्याचे मारुतीने सर्वांना सांगितले :
सत्वमूर्ती राया भरता । सांडू नको गा जीविता ।
घेवोनि आलो रघुनाथा । सौमित्रसीतासमवेत ॥६९॥
उठवोनिया लक्ष्मण । क्षणे निवटिला रावण ।
बंदींचे सोडविले सुरगण । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥७०॥
सोडवोनि जनकनंदिनी । राया दशरथा भेटोनी ।
विजयी झाला राम त्रिभुवनी । येत विमानी अति वेगे ॥७१॥
मार्गी भरद्वाजे आपण । प्रार्थोनिया रघुनंदन ।
राहविलें फळभोजना । तेथे जाण गुंतले ॥७२॥
तुज होत असेल चिंता । म्हणोनि कळवळा रघुनाथा ।
याचिलागीं तत्वता । पुढे मज आता पाठविले ॥७३॥
तंव तैसेचि देखो येथ । श्रीरामवियोगें समस्त ।
अवघेही दिसता दुःखाक्रांत । जैसी प्रेते जीवहीन ॥७४॥
शोक सांडोनि निश्चिती । व्हावे सावध समस्तीं ।
पैल आला रघुपती । भाक निगुतीं ही माझी ॥७५॥
रामांच्या आगमनाची वार्ता ऐकताच सर्वांना
अपार आनंद. भरताचे मारुतीला दृढालिंगन :
ऐकतांचि तो वचनार्थ । अवघे झाले सावचित्त ।
येवोनि नमिती हनुमंत । आनंदभरित ते सकळी ॥७६॥
प्राणोत्क्रमणसंकटीं । जेवी होय अमृत वृष्टी ।
तेंवी श्रीरामागमनगोष्टी । कपिवाक्पुटीं ऐकिली ॥७७॥
दुकाळिया जेंवी मिष्टान्न । की अवर्षणीं वर्षे घन ।
तेंवी हनुमंताचे वचन । आले जीवन घेवोनी ॥७८॥
देखोनिया हनुमंताते । मिठी घालोनिया भरतें ।
आलिंगोनी ठेविला तेथे । झाली समस्ते सजीव ॥७९॥
भ्रमबुद्धी हरपे रत्न । ते स्वबुद्धी पाहता न लभे जाण ।
दीपागमन होतांचि पूर्ण । सांपडे क्षण न लागता ॥८०॥
तेंवी रामागमनसुखाचा । हनुमान दीप हर्षाचा ।
मोहांधकारी बुडता साचा । झाला प्रकाशाचा सुकाळ ॥८१॥
निरसोनिया मोहांधकार । उजळलें सकळांचें अंतर ।
अंतरी प्रकाशला रघुवीर । दुःख समग्र निरसिले ॥८२॥
दुःख निरसोनि सुखदाता । श्रीरामासी भेटी करिता ।
ऐसिया सद्गुरूसीं तत्वता । उत्तीर्णता केंवी घडे ॥८३॥
चिंतामणि दे चिंतितार्था । कल्पतरू कल्पिले देता ।
सद्गुरू दे निर्विकल्पता । त्यासी आता काय द्यावे ॥८४॥
कामधेनूची दुभणी । कामनारूप त्याची देणी ।
अचिंत्य देणे सद्गुरूवचनी । उत्तीर्ण त्यालागूनी केवी होय ॥८५॥
देऊं परिस धातु अर्थ । अर्थ तितुकाही अनर्थ ।
तेणे न घडेचि उत्तीर्णत्व । अगाध दातृत्व सद्गुरूचें ॥८६॥
देहे उतराई होऊं सद्गुरूसीं । तरी नैश्वर्य देहासी ।
नैश्वर्ये पै अनैश्वर्यासी । उत्तीर्ण त्यासी घडेना ॥८७॥
आता एकचि विवंचन । तनुमनसहित धन ।
कीजे सद्गुरूसीं निवेदन । तरी उत्तीर्ण कांहीएक ॥८८॥
त्याहूनि वेगळा आणिक । न दिसे पदार्थ असंख्य ।
सर्वस्वें अर्पोनियां देख । चरणी मस्तक ठेवणें ॥८९॥
सर्वांचे मारुतीला वंदन व आनंदोत्सव साजरा करतात :
ऐसा करोनि निर्धार । चरणी माथा पै सत्वर ।
ठेवोनि नमिला कपींद्र । मौनेंकरोनि सत्वर पै भरतें ॥९०॥
कौसल्यादि माता अशेष । सुमंतादि प्रधान देख ।
आनंदभरित होवोनि लोक । कपिनायक नमियेला ॥९१॥
दुःख निरसिले सकळिक । आनंद झाला अलौकिक ।
नामे गर्जती एकएक । रघुनायक निजविजयी ॥९२॥
येरयेरा क्षेम देती । येरयेरा आलिगिती ।
खांदीं घेवोनि मारुती । नाचताती आनंदें ॥९३॥
दीपावली नीराजनें । हनुमंतासी अक्षय वाणे ।
जीवभावाची बळिदाने । सांडितीं पवनपुत्रावरूनी ॥९४॥
त्राहाटिल्या निशाणभेरी । गगन गर्जे मंगलतुरीं ।
गुढिया तोरणे घरोघरी । प्रीती थोर उत्साहो ॥९५॥
घरोघरी मंगलार्चनें । प्रीती मांडिली कीर्तने ।
मृदंग श्रुतिमधुर गाणे । टाळ चिपळ्यांसमवेत ॥९६॥
उपांगे वाजती अतिगहिर । तुळसीमाळा परिकर ।
सुमनवृष्टि अति सादर । होती अपार कीर्तने ॥९७॥
रामाच्या दर्शनासाठी निघण्याची तयारी
करावी असे मारुतीने सुमंत प्रधानाला सांगितले :
ते देखोनिं हनुमंत । अत्यंत झाला आनंदभरित ।
प्रधान बोलोवोनि सुमंत । स्वये सांगत तयासी ॥९८॥
निवांत काय होसी मानसी । जाणे श्रीरामभेटीसीं ।
करावया सामग्रीसीं । दळभारेंसी संजोगा ॥९९॥
प्रेमे विकळ भरत । शत्रुघ्न तैसाचि तेथ ।
तुम्ही संपोदोनि समस्त । चला रधुनाथदर्शना ॥१००॥
ऐकोनिया ते वाणी । भरत उठला तत्क्षणी ।
लागला हनुमंताच्या चरणी । भली आठवण दीधली ॥१०१॥
नाही तरी आम्ही येथ । पडिलों असतो तटस्थ ।
कोण करिता सावचित्त । श्रीरघुनाथदर्शना ॥१०२॥
हनुमंतकृत भरतगुणवर्णन :
ऐकोनि भरताचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
करीत अति प्रीती विनवण । सावधान परियेसीं ॥१०३॥
प्रेमा म्हणिजे सत्वावस्था । राम तिही गुणांपरता ।
गुणी पहातो तत्वता । राम सर्वथा भेटेना ॥१०४॥
म्हणोनिया अति सावधान । निःशेष रज तम त्यागून ।
सत्वावस्था उठली जाण । तीही आपण जिरवावी ॥१०५॥
प्रेमावस्थामूर्च्छितवृत्ती । येथे श्रवण कोणाप्रती ।
कोण पावे अर्थप्राप्ती । श्रोते निश्चिती तटस्थ ॥१०६॥
जेथे गुणाचें आवरण । तेथे कैंचे रामदर्शन ।
म्हणोनि साधके आपण । सर्वथा गुण जिंकावे ॥१०७॥
निःशेष गुणांचा निरास । तै मोक्षपुरीसी होय वास ।
तुम्ही तरी तेथींचे क्षितीश । आणि अनुज रामाचे ॥१०८॥
म्हणोनि तुम्ही तत्वता । गिळोनिया सत्वावस्था ।
चला भेटू रघुनाथा । अति सत्वरता निघावे ॥१०९॥
पाक जरी आला निगुतीं । तरी वाफ जिरों देती ।
बाहेर निघाल्या शीघ्रगती । राहे निश्चिती अपक्व ॥११०॥
तेंवी रजतमाचे निरास । सत्य वाढलें असमसाहस ।
तेंही जिरतां सावकाश । राघवेश तै भेटे ॥१११॥
विषयेंद्रियगुणग्राम । रहित स्वसुखआराम ।
तै बोलिजे श्रीराम । सिद्धांत परम उपनिषदी ॥११२॥
ऐसी श्रीरामसंस्था । आम्ही ऐकों परंपरता ।
तरी हे उफराटी वार्ता । तुजप्रति कथा आम्ही सांगो ॥११३॥
तू आमचा माता पिता । स्वामी गुरु कुळदेवता ।
जैसा राम तैसा तू भरता । अति उद्धतता म्या केली ॥११४॥
म्हणोनि घातले लोटांगण । क्षमा करावी आपण ।
आणीक एक ऐके चिन्ह । अधिकार पूर्ण असे आम्हा ॥११५॥
बाळका बोलों शिकवी माता । तीपुढें ते वाचाळता ।
करिता सुखावे माता । परी सर्वथा क्षोभेना ॥११६॥
तेंवी तुमची बाळे आम्ही । म्हणोनि वल्गेजों निजधर्मी ।
न विचरितां सेवकस्वामी । निजकृपा तुम्ही संतोषा ॥११७॥
हनुमंताची विनम्रता पाहून भरताने त्याला आलिंगन दिले :
ऐकोनि हनुमंताचे वचन । भरत झाला सुखायमान ।
हृदयी धरिला आलिंगून । तू जिवलग पूर्ण रामाचा ॥११८॥
आम्ही म्हणवू सहोदर । परी राम नेणो साचार ।
वृथा वाहों शरीरभार । देवोनि आहार नाशित ॥११९॥
रामविस्मरणें आहार देख । जठराग्नि त्याचा शुद्ध पाक ।
सर्वथा न करी देख । करोनि पै नरक सांडी ॥१२०॥
अग्नि क्षोभलियाचें लक्षण । अहर्निशी विषयचिंतन ।
अवस्था उन्मत्त पूर्ण । नरक लक्षण या नांव ॥१२१॥
शुद्ध पाकाचे लक्षण । सर्वेद्रियें सावधान ।
अनिमेष रामस्मरण । होवोनि प्रसन्न अग्नि करी ॥१२२॥
हनुमंताची भरतकृत प्रशंसा :
आपुली निजतेज दीप्ती । श्रीरामभक्तांच्या हाती ।
अग्नि देत संतोषस्थितीं । तेणे शोभती देदीप्यममान ॥१२३॥
हे तुझ्या ठायी प्रत्यक्ष । हनुमंता दिसे सावकाश ।
श्रीरामतेजे स्वप्रकाश । त्रैलोक्यास मंडन ॥१२४॥
आता असोत या उत्पती । असदारोपण म्हणजे स्तुती ।
तरी ते न घडे निश्चिती । तुझी ख्याती अनिवार ॥१२५॥
जितकी श्रीरामाची कीर्ती । तितकी तुझी ख्याति मारुती ।
म्हणोनिमाथा चरणाप्रती । ठेवोनि कपिपति नमियेला ॥१२६॥
प्रत्याख्यानं न मे वीर वदामि वद कि प्रियम् ।
गवां शतसहस्रं वा त्यामाणां व शत वरम् ॥५॥
भरताने प्रसन्न होऊन मारुतीला वर देण्याची तयारी दर्शविली :
प्रेमाचेनि पडिभरें । योग्यायोग्य पै न सरे ।
हनुमंतासी अत्यादरें । नृपवरें विनविले ॥१२७॥
अति प्रिय रामकथा । विजययात्रा हनुमंता ।
तू सांगितली तत्वता । काय आता तुज देऊ ॥१२८॥
प्रीतिपूर्वक परियेसीं । जे उपेक्षा असेल मानसी ।
ते सांगावी मजपासी । शंका मानसी न धरावी ॥१२९॥
देऊं गाईंची शतसहसस्रें । देश नगरे अपारे ।
किंवा धान्याची कोठारे । धनभांडारे असंख्यात ॥१३०॥
इंद्रपद लोकपाळेंसीं । पाताळपन्नग अमृतेंसीं ।
सत्यलोक पै मागसी । कैलासवैकुठासी देईन ॥१३१॥
काय अपेक्षित तुझ्या चित्ता । शीघ्र आलापी पवनसुता ।
तेणे आश्चर्य हनुमंता । भरतप्रताप देखोनी ॥१३२॥
भरताच्या दातृत्वाची प्रशंसा :
अतिशये सुखावोनि चित्ती । हनुमान विनवित भरताप्रती ।
अगाध तुझी उदारशक्ती । बंधु निश्चिती रामाचा ॥१३३॥
जैसी श्रीरामाची निजख्याती । तैसीच तुझी प्रतापशक्ती ।
दानी देता त्रिजगती । अटक निश्चिती नाही तुम्हा ॥१३४॥
आम्ही तुमचे अनुचर । केवळ श्रीरामाचे किंकर ।
श्रीरामभजने चराचर । नाही दुस्तर हरिभक्ता ॥१३५॥
रामभक्तांना कसलीच अपेक्षा नसते :
श्रीरामाचे ध्यान करिता । ब्रह्मादिका दुस्तर चिंता ।
आमचे पद घ्यावया तत्वता । ध्यान रघुनाथाचे करितात ॥१३६॥
म्हणोनि ब्रह्मादि अमरकोडी । विघ्नें उठविती कडाडीं ।
दावोनि नाना विषयगोडी । पाडिती मुरकुंडी मनाच्या ॥१३७॥
तथापि निश्चयाचे भक्त । सर्वथा न होती ध्यानच्युत ।
ते विषयींचा फ्लोकार्थ । सावचित्त परियेसीं ॥१३८॥
त्रिधुवनविभवहेतवेप्यकुंठस्मृति रजितात्मसुरादिप्भिर्विमृग्यात् ।
न चलति भगवत्पदारविंदा- लवजिमिषार्धमपीह वैष्णवाग्र्य: ॥६॥
हनुमंताने वर्णिलेला ध्यानमहिमा :
सुरासुरांचिया पंक्ती । ज्यालागीं नाना साधने करिती ।
तरी ज्यांसी नव्हे प्राप्ती । दुष्प्राप्य निश्चिती त्रिलोकीं ॥१३९॥
तेंवी त्रिलोकींचें राज्य सर्वही । महासिद्धींसमवेत पाही ।
हात जोडोनि भक्ताच्या ठायी । तिष्ठत लवलाही दासत्वें ॥१४०॥
भगवच्चरणारविंदाहून । जरी क्षण एक काढी मन ।
तरी तितुकेंही त्यासी देऊन । म्हणवोनि जाण तिष्ठती ॥१४१॥
परी हा निष्टंक दादुला । दुस्तर धैर्याथिला ।
चरणध्याना वहिला । क्षणही मनाला काढीना ॥१४२॥
चरणध्यानाचा तो क्षण । त्रिमुवनविभव त्यावरून ।
सिद्धिंसहित ओवाळून । निंबलोण सांडित ॥१४३॥
भक्त जिज्ञासु साधक ज्ञानी । तयांमाजी अग्रगणी ।
लवनिमिषार्धही चरणींहूनी । लोभे मन काढीना ॥१४४॥
कोणते म्हणती चरण । ऐक त्यांचेही लक्षण ।
आदिकरोनि त्रिनयन । करिती ध्यान जयाचे ॥१४५॥
ब्रह्मा जो को सृष्टिकर्ता । त्रैलोक्यासी सर्जन करिता ।
सत्यलोकराज्यभोक्ता । वेद मूर्तिमंत तये स्थानी ॥१४६॥
जेथे सत्य मूर्तिमंत । तप मूर्तिमंत तेथ ।
महासिद्धि होवोनी मूर्त । नित्य नांदत जये स्थानी ॥१४७॥
ऐसियां भोगांची विश्रांतीं । ब्रह्मयासीं न मनेचिं सर्वार्थी ।
मग बैसोनी एकांती । चरण चिंती हरीचे ॥१४८॥
तरी सहसा नव्हे प्राप्ती । मग लाजोनी प्रजापती ।
पोटा आला लक्ष्मीप्रती । चरणप्राप्ती तरी नव्हे ॥१४९॥
तैसाच जाण शूळपाणी । त्रिनयन कैलासभुवनी ।
उमेसारिखी कामिनी । अनुदिनी भोगासी ॥१५०॥
नंदी भृंगी आदि महागण । विद्यानिधि हृदयरत्न ।
तेणे न पवेचि समाधान । मग त्यागून निघाला ॥१५१॥
सर्वस्वें त्यागोनी शूळपाणी । हाती पायी राख लावोनी ।
ध्यानस्थ बैसला श्मशानी । चरणचिंतनीं रामाच्या ॥१५२॥
हृदयी ध्यान चरणांचें । मुखीं नाम श्रीरामाचे ।
मुकुटी भूषण निष्कर्माचें । तीर्थ रामाचे परिकर ॥१५३॥
तोही ठकिला हरिमाया । सांडोनी श्रीरामाच्या पाया ।
आलो मोहिनी पुसावया । द्रवोनी वीर्या पडिला तो ॥१५४॥
तेथे इंद्र वरुण कुबेर जाण । यांची गणना करी कोण ।
पावावया हरिचरण । सामर्थ्य जाण तया नाही ॥१५५॥
ऐसे दुष्प्राप्य श्रीरामचरण । ते भक्ता लाधले संपूर्ण ।
ते सांडूनि इच्छी आन । ऐसा अभागी कोण त्रिजगती ॥१५६॥
तू सूर्यवंशी नृपती । आणि अनुज रघुपती ।
याचकें याचितां तुजप्रती । स्वये त्रिजगती अर्पिसी ॥१५७॥
सदैव रामचरणांची प्राप्ती व्हावी अशी
मारुतीने भरताजवळ मागणी केली :
मी किंकर तुझे साचार । हेंचि मागे उत्तरोत्तर ।
श्रीरामचरणाहूनी अन्यत्र । वांछा कोठे न वचावी ॥१५८॥
म्हणोनी घातले लोटांगण । तेथे भरत सुखायमान ।
श्रीरामाचे यथार्थ ज्ञान । तुजसी जाण कळलेसे ॥१५९॥
श्रीराम सांडोनी आन । जो जो का वांछी धन मान ।
त्यासी श्रीरामाचे ज्ञान । सर्वथा जाण दुर्लभ ॥१६०॥
भरताचा दानधर्म :
नमन करोनी कपीसी । आलिंगिला अति प्रीतीसी ।
दान उद्धारिलें वाचेसीं । ते ते याचकांसी देता झाला ॥१६१॥
दिधले गाईंचे सहस्त्र । धान्यकोठारें अपार ।
अश्व गज दानांचे भार । भरतें अपार वांटिले ॥१६२॥
दिधली धनाचीं भांडारे । देश पुरें नगरे ।
भरतें वाटिलीं परिकरे । आशा दानभरे निमाली ॥१६३॥
श्रीरामगमनें विशुद्ध । याचकांसी झाला-परमानंद ।
पेलले संतृप्तीचें दोंद । आनंदकंद श्रीराम ॥१६४॥
भरत वांटीत प्रीतीकरीं । याचकांचे इच्छेवरी ।
तंव याचकांचा दुकाळ भारी । रामागमने करी संतृप्त याञ्चा ॥१६५॥
ऐसे देवोनियां दान । भरत आनंदी-निमग्न ।
तंव विनवी वायुनंदन । चला रघुनंदनदर्शना ॥१६६॥
''रामदर्शनार्थ लवकर चला'' हनुमंत :
येथेंचि विलंब लागला पाहे । श्रीराम येईल लवलाहें ।
मग पुढे जावोनी काये । चला लवलाहें दर्शना ॥१६७॥
ऐकोनि हनुमताचें उत्तर । अवघे उठले वेगवत्तर ।
सिद्ध होवोनी समग्र । जाती रघुवीरदर्शना ॥१६८॥
शरण एका जनार्दना । भरत आणि रघुनंदना ।
सप्रेम भेटी दोघा जणा । त्या निरूपणा राम वदवी ॥१६९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
भरतहनुमंतदर्शनं नाम एकोनाशीतितमोऽध्यायः ७९ ॥
॥ ओंव्या १६९ ॥ श्लोक ६ ॥ एवं १७५ ॥
