॥ श्रीएकनाथमहाराजकृत
26.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय सव्विसावा ॥
श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लग्नाचे वर्हाड अयोध्येकडे निघाले :
चौधी बहिणींसहित जाण । जाले जानकीपाणिग्रहण ।
जनकें केली बोळवण । सुख संपूर्ण दशरथासी ॥१॥
चौघे पुत्र चौघी सुना । कीर्ति न समाये त्रिभुवना ।
येव्हढे आल्हादे जाणा । अयोध्याभुवना निघाला ॥२॥
संनद्ध केलिया दळभार । महामदें गर्जती कुंजर ।
घंटाकिंकिणीं सालंकार । पताकी अंबर शोभत ॥३॥
घोदे नाचविती वीर । जी जी मा मा थीर थीर ।
तीपायीं असिवार । अति अरुवार नाचती ॥४॥
अढाऊ झेली साबळधर । कोयतेतकार धनुर्धर ।
चालती पायांचे मोगर । अलगाइत बाणाइत ॥५॥
वोढणिये थैकार देत । जेठिये तळपत चमकत ।
ऐसे सैन्य पुढे चालत । भाट गर्जत कैवारें ॥६॥
राजे मुकुटाचे वरिष्ठ । पाठीसी चाले घनदाट ।
अतिरथी घडघडाट । सुख उद्भसट दशरथा ॥७॥
मार्गांतील अपशकुनांमुले राजा साशंक :
राजा वसिष्ठ सकळ जन । समानरथीं समसमान ।
चालती सुखसंपन्न । तो पुढे अपशकुन देखती ॥८॥
सव्य जाताति पै तास । अपसव्य जाती वायस ।
मयूरें गाळिती पीस । सर्प मुंगुस भांडती ॥९॥
भालुवा भुंकिती सन्मुख । पक्षी करकरिती अग्निमुख ।
युद्ध होईल अचुक । थोर धुकधुक रायासी ॥१०॥
श्रीराम शकुन अपशकुन । दोनी देखे समसमान ।
नाही भय कंपायमान । नित्य सावधान निर्भयत्वे ॥११॥
राजा सांगे वसिष्ठासी । अपशकुन का होती आम्हांसी ।
दिशा धुमधुमित चौपासी । शशिसूर्यांसी प्रभा मंद ॥१२॥
दिवसा ग्रहगण गगनस्थ । एक पूर्वे एक पश्चिमे जात ।
रवि चंद्र परिघ करित । अति उत्पातदायक ॥१३॥
सन्मुख गगनाचे पोटी । अंधकारलिया दिठी ।
वसिष्ठा तू मर्मज्ञ दृष्टी । हे यथार्थ गोष्टी सांग मज ॥१४॥
वसिष्ठांचे दशरथाला आश्वासन :
राया जी जी चिन्हे दिसती । तेणे दुसतर विघ्नप्राप्ती ।
परी आम्हांसवे चालती शांती । विघ्नें आम्हांप्रती विमुख ॥१५॥
अपशकुन पूर्वे जात्यासी । शकुन पश्चिमेच्यासी ।
तेंवी भूतीं भगवद्धाव ज्यासी । विघ्नें त्यासी निजविजयो ॥१६॥
येरवी विघ्नांचें सूचक । युद्ध होईल ठाकठोक ।
विजयी होईल रघुकुळटिळक । हे आवश्यक निजभावीं ॥१७॥
रामनामाच्या नामोक्तीं । विघ्नें चरणा शरण येती ।
तो श्रीराम असता सांगाती । विघांची प्राप्ती निजविजयो ॥१८॥
प्रचंड वावटळीतून परशुराम येतात :
ऐसे दोघे बोलत बोली । तं उठली वाहुटळी ।
नभ व्यापिले धुळी । संज्ञा मोडली सैन्याची ॥१९॥
लागता त्या वायूची झडप । सप्त सागर सप्त द्वीप ।
तेणेंसी पृथ्वी सकंप । सुटे चळकांप मेरूसी ॥२०॥
त्यामाजी उठली विकट हाक । सैन्य मूर्छित पडे निःशेष ।
दशरथें घेतला धाक । राम निःशंक निजनिधडा ॥२१॥
विद्युत्प्राय जटा शिरी । सतेज परशु खांद्यावरी ।
धनुष्यबाण घेवोनि करी श्रीरामावरी चालिला ॥२२॥
वसिष्ठांकडून स्वागत, दशरथ भयभीत, त्याची परशुरामास प्रार्थना :
परशुरामाते देखून । वसिष्ठे केले पूजन ।
ते पूजा भार्गवे अंगीकारून । चालिला आपण श्रीरामावरी ॥२३॥
अत्यंत पराक्रम देखोन । दशरथ जाला कंपायमान ।
घालोनिया लोटांगण । दीनदानव बोलत ॥२४॥
परशुरामा तुझी थोरी । तीन सप्तकें पृथ्वी निःक्षत्री ।
करून दिधली द्विजकरीं । शस्त्र त्वा करी संन्यासिले ॥२५॥
तू क्षत्रियांचा कर्दनकाळ । हे तुझिया ब्रीदाचे शीळ ।
श्रीराम माझे केवळ बाळ । त्यावरी प्रबळ क्रोध न करी ॥२६॥
श्रीरामाते मारिसी । तेचि मरण आम्हा सर्वांसी ।
येव्हढे करावया कदनासी । उचित तुम्हांसी नव्हे स्वामी ॥२७॥
मी पुत्रार्थीं अति दीन । पुत्रभयें अति कृपण ।
मज द्यावे पुत्रदान । घाली लोटांगण नृपनाथ ॥२८॥
परशुरामाचे श्रीरामांना आव्हान व दोघांचा संग्राम :
ऐसे दशरथभाषित । ते उपेक्षोनिया समस्त ।
जेथे होता रघुनाथ । भार्गव तेथे स्वये आला ॥२९॥
रामा श्रीरामा झुंजारी । श्रीराम रामाते निवारी ।
रामा श्रीरामा प्रीति पुरी । ऐक्य करी निजबोध ॥३०॥
त्या दोघांचा निजसंग्राम । सुरवरवीरां अति दुर्गम ।
युद्धी पावोनि निजवर्म । उपरभ निजबोधें ॥३१॥
देखोनिया रघुनंदन । भार्गव सोडी दारुण बाण ।
श्रीरामे सांडिलें तोडून । क्रोधे परिपूर्ण जामदाग्न्या ॥३२॥
परशुराम सोडी दिव्यास्त्रें । श्रीराम निवारी क्षणमात्रें ।
कोपे सोडिलीं निर्वाणशस्त्रें । तींही रघुवीरे निवारिलीं ॥३३॥
रेणुका दिधल्या भार्गवहातीं । दोनी आपुल्या निजात्मशक्ती ।
सकळ शस्त्रास्त्राम्च्या अंती । त्या निर्वाणार्थीं सोडाव्या ॥३४॥
त्या काळी कराळी उभय शक्ती । जाणोनि राहिल्या रामाप्रती ।
तिही ओवाळून रघुपती । श्रीरामभात्याप्रती प्रवेशल्या ॥३५॥
श्रीरामाच्या सामर्थ्यापुढे परशुराम निष्प्रभ ठरल्यामुळे उद्विग्न :
भार्गव म्हणे नवल आता । माझ्या शक्ति याव्या माझे हाता ।
त्या प्रवेशल्या श्रीरामभात्या । साह्य रघुनाथा त्या जाल्या ॥३६॥
माझ्या निर्वाण निजशक्ती । जावोनि राहिल्या श्रीरामाप्रती ।
हे आश्चर्य मानोनि चित्ती । छळणें वचनोक्ती बोलत ॥३७॥
जी जी शस्त्रे म्या प्रेरिलीं । ती ती स्वये त्वा निवारिली ।
परी आपुली नाही सोडिलीं । हे उणीव आली रघुनाथा ॥३८॥
जाणसी शस्त्रांचे निवारण । परी नेणसी शस्त्रांचे प्रेरन ।
हेंचि तुज उणेपण । शौर्य संपूर्ण तुज नाही ॥३९॥
ऐकोनि परशुराम वचन । श्रीरामे केले नमन ।
ब्राह्मणापुढें उणेपण । सर्वथा जान आम्हांसी ॥४०॥
श्रीराम उवाच -
अयं कठः कुठारस्ते कुरु राम यथोचितम् ।
निहंतुं हंत गोविप्रान् न शूरा राघवा वयम् ॥१॥
’गो-ब्राह्मण क्षत्रिय हे अवध्य’ असे श्रीरामांचे परशुरामास उत्तर :
भार्गवा परशु तुझ्या हाती । म्या कंथ ओपिलासे तुजप्रती ।
जे करणे असेल तुझे चित्ती । ते त्वा निश्चिती करावे ॥४१॥
गाई ब्राह्मण करावया घात । स्वप्नीं नुपजे मनोरथ ।
त्यांवरी उचली शस्त्रहात । ऐसा सूर्यवंशात शूर नाही ॥४२॥
गाई आणि ब्राह्मणांपुढें । आमुचे शौर्य बापुडे ।
तुझे निवारावया कुर्हामडे । धनुष्यबाण पुढे म्या धरिले ॥४३॥
विष्णुचाप सज्ज करण्याचे श्रीरामांना आव्हान :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । परशुराम हास्यवदन ।
परिसोनि हरचापभंजन । तुज ठाकूनि जाण मी आलो ॥४४॥
असो युद्धाची अटाटी । सांडिली शत्र धरावयाची गोष्टी ।
विष्णुचाप आहे माझे मुष्टी । ते तू जगजेठी सज्जीं पा ॥४५॥
जरी तू हे सज्जिसी संपूर्ण । तरी तुवा मज जिंतिले जाण ।
श्रीराम म्हणे हे भाषण । मज दूषण द्विजविषयीं ॥४६॥
तू अगाध ब्राह्मण ब्रअह्मचारी । पितृसेवेची परम थोरी ।
तुझी आज्ञा वंध्य शिरी । विष्णुचाप करी करिता जाला ॥४७॥
श्रीराम म्हणे भार्गवरामा । तुझेनि तीर्थे प्रताप आम्हा ।
तेणे प्रतापें द्विजोत्तमा । धनुर्वर्मा सज्जीन ॥४८॥
शिवचापापरीस भारी । विष्णुचापाची पै थोरी ।
श्रीरामे धरोनि करी । क्षणामाझारी सज्जिलें ॥४९॥
भार्गवाचे दृष्टीपुढा । श्रीरामे सज्जिला विष्णुमेढा ।
ठाण मांडोनि निधडा । बाण गाढा जोडिला ॥५०॥
जैसा अंतका अंतक । समूळ कळिकाळा घातक ।
देखोनि भार्गवे घेतला धाक । अलोलिक श्रीराम ॥५१॥
श्रीरामाच्या प्रतापप्रौढीं । तेजे भार्गवा पडे झांपडी ।
धनुष्य ओढिता कानाडी । चाप कडाडी वैष्णवी ॥५२॥
श्री रामांचा प्रताप पाहून परशुरामांना त्यांच्या खर्याी स्वरूपाचे ज्ञान :
परशुरामे अति तांतडी । लागवेगें घालोनि उडी ।
श्रीराम धरिला लवडसवडी । चाप न मोडीं वैष्णवी ॥५३॥
शिवचाप मोडिलें क्षणामाझारी । तैसे विष्णुचापा क करी ।
तुझ्या पराक्रमाची थोरी । चराचरी अतुल्य ॥५४॥
तुझे बळ अति अद्भुरत । कळिकाळ तुझे नित्यांकित ।तूं
अवतार श्रीरघुनाथ । मज निश्चित मानले ॥५५॥
मी तुझा करू आलो छळ । तुजेह् पाहता स्वभावशीळ ।
माझी निमाला खळबळ । तू केवळ परमात्मा ॥५६॥
ऐसे वोलोनियां आपण । प्रेमे दिधले आलिंगन ।
दोघा जाहले समाधान । मुळींची खूण पावोनि ॥५७॥
परस्परांचे अभिनंदन :
श्रीरामे रामा समाधान । श्रीरामे राम सुखसंपन्न ।
श्रीरामे रामा आमंद पूर्ण । चैतन्यघन श्रीरामे राम ॥५८॥
श्रीरामे रामा अति आल्हाद । श्रीरामे रामा परमानंद ।
श्रीरामे रामा निजात्मबोध । जाला अभेद रामे रामा ॥५९॥
मी एक राम दाशरथी । हे नाथवे श्रीरामप्रती ।
मी एक भार्गव भृगुपती । नाठवे चित्ती परशुरामा ॥६०॥
ऐसे पडिले आलिंगन । निघोट कोंदलें चैतन्य घन ।
खुंटला बोल तुटले मौन । जाले परिपूर्ण पूर्णत्वे ॥६१॥
अवतारकृतकार्यार्थ । साधावया श्रीराम सावचित्त ।
भार्गवातें श्रीरघुनाथ । उद्बोधित निजबोधें ॥६२॥
तो जंव होय सावधान । सावध करिता रघुनंदन ।
देखोनि विस्मयसंपूर्ण । शिरोरत्न। श्रीराम ॥६३॥
कर्मब्रह्मस्थिति समसमान । श्रीराम अवतार शिरोरत्न ।
भार्गवे जाणोनि संपूर्ण । सुखसूपूर्ण श्रीरामे ॥६४॥
सुसज्ज केलेल्या बाणाचा उपयोग :
श्रीराम म्हणे अमोघ बाण । धनुष्यी करविला आरोपण ।
तो मागे काढिता नये जाण । कोठे प्रेरण करू स्वामी ॥६५॥
ऐसे पुसतां रघुनाथ । परशुराम अति विस्मित ।
बाणाचें लक्ष सावचित्त । विचारिता अनुलक्षी ॥६६॥
श्रीरामाचा निजशर । अतिशयेंसी अति दुर्धर ।
तेणे निवटीं माझे गत्यंतर । ऐसे परशुराम सांगत ॥६७॥
श्रीरामाचा निजबाण । जेथे पडे तेथे अक्री कंदन ।
येणे निवटावा माझा अभिमान । गमनागमन मग कैंचें ॥६८॥
मी तपस्वी अति श्रेष्ठ । तपें जिंकिले लोक वरिष्ठ ।
ते लोकांतराची वाट । करी सपाट येंएं बाणे ॥६९॥
मी वीर धीर महाशूर । रणांगमीं अति दुर्धर ।
शत्रुदलनीं एकांगवीर । हाही अहंकार निर्दाळी ॥७०॥
माझा निवटल्या अहंकार । कैंचें लोकलोकांतर ।
सहजे खुंटले गत्यंतर । हे करी साचार श्रीरामा ॥७१॥
जुंझार बाह्य शत्रू संहारी । श्रीराम निवटी अंतरवैरी ।
अहंममता जीवे मारी । धनुर्धारी श्रीराम ॥७२॥
श्रीरामाचे अनुसंधान । वीरा शूरां न कळे जाण ।
शिव चाप धरी आपण । त्यासी संपूर्ण लक्षेना ॥७३॥
अहंकारातें छेदिता । आणिक नाही रघुनाथा ।
येणे बाणे तू आता । अहंममता छेदावी ॥७४॥
मी अख्यपास पृथ्वी दिधली दान ।तेथें मी वसेन निरभिमान ।
लोकलोकांतर अभिमान । त्याचे छेदन करी श्रीरामा ॥७५॥
निरभिमान वसतां क्षिती । दोष नाही गा रघुपती ।
लोकलोकांतरगती । माझी निश्चिती निर्दाळी ॥७६॥
ऐसे बोलिला परशुराम । तेंचि करू पाहे श्रीराम ।
कैसे आश्चर्य केले परम । गत्यंतराचें वर्म श्रीराम छेदी ॥७७॥
अलक्ष लक्षोनि श्रीरामचंच्रें । बाण जोडोनि निजनिर्धारे ।
अर्धमात्रा अर्धचंद्रशरे । अहं रघुवीरे निवटिले ॥७८॥
जेव्हा गुण वाहिला विष्णुचापासी । तेव्हांचि बोळवण अहंकारासी ।
मागुन येईल भार्गवापासीं । तो अर्धमात्रेंसीं निवतिला ॥७९॥
निवटितांचि अहंकार । कैचें लोकलोकांतर ।
कैचें गतिगत्यंतर । केला स्थिर परशुराम ॥८०॥
यापरी श्रीरामचंद्र । सोडोनियां निजशर ।
सुखी केला परशुधर । स्वर्गादि गत्यंतर खुंटोनी ॥८१॥
कथांतरीं निरूपण । भार्गवाचें स्वर्गगमन ।
श्रीरामे खुंटिलें आपण । विंधोनी बाण क्षणमात्रें ॥८२॥
श्रीरामे स्वर्गवाटेसी । काये कूड घातला बाणेंसी ।
का भिंती घातली चौपासी । स्वर्गगति खुंटली ॥८३॥
ऐसियां पाहता सूक्ष्म गती । तेथींची न कळे अंतर्वृत्ती ।
बाह्य लौकिक पंडितयुक्ती । रामे स्वर्गगती खुंटविली ॥८४॥
बाणे खुंटे स्वर्गगती । हे लौकिक कथावदंती ।
अहं निवटून रघुपती । लोकांतरगती खुंटविली ॥८५॥
ज्यासी अनुलक्षी रामचंद्र । त्याचा गळे अहंकार ।
सहजें खुंटे गत्यंतर । यापरी रघुवीर स्वर्गगती खुंटी ॥८६॥
श्रीरामे ऐसिया रीती । परशुरामाची स्वर्गगती ।
खुंटविली यथार्थ निश्चिती । हे ग्रंथार्थी निजगुह्य ॥८७॥
श्रीरामे जिंतिला परशुधर । गगनी सुरवरांचा गजर ।
भूतळीं गर्जती ऋषींश्वर । विजयी रघुवीर निजात्मवीर्यें ॥८८॥
शिवचाप आणि विष्णुचाप । दोही चापांचा दुर्धर दर्प ।
राघवें केला निर्वीर्यरूप । श्रीरामप्रताप निजविजयी ॥८९॥
परशुरामाचा गर्वपरिहार व क्रोधाचा त्याग :
श्रीरामपरशुरामांचे क्रीडित । ब्रह्मादिदेव विमानांत ।
कौतुक पाहू आले समस्त । दोघे अद्भुित महावीर ॥९०॥
ते देव गर्जती आंबरीं । श्रीराम निजविजयी निर्धारी ।
वर्षती सुमनांच्या संभारी । ऋषि जयजयकारीं गर्जती ॥९१॥
परशुराम म्हणजे श्रीरघुनाथा । त्वा मज जिंतिले तत्वता ।
जे मज लाज नाही सर्वथा । अधिक श्लाघ्यता मज तुझेनि ॥९२॥
जेंवी मूळ गोडी द्विविधा नाम । परी स्वरूपीं नाही द्विविध धर्म ।
तेंवी मी तू आत्माराम । लज्जा परम कोनाची ॥९३॥
देह लाजेना अवयवा । रूप लाजेना देहभावा ।
तेवीं मज तुज राघवा । असेना हेवा लाजेचा ॥९४॥
ऐसे बोलोनि तत्वता । मग म्हणे गा रघुनाथा ।
धर्म रक्षण तुझे माथा । लोकपाळण त्वा कीजे ॥९५॥
होता जमदग्नीचा कोप । आणि आपुला निजसाटोप ।
तो श्रीरामी केला निक्षेप । जाला सुखरूप परशुराम ॥९६॥
श्रीराम लागला रामचरनां । रामे श्रीरामा केली प्रदक्षिणा ।
रामनामे गर्जोंनि जाणा । गेला स्वस्थाना परशुराम ॥९७॥
श्रीराम विजयी अलोलिक । वसिष्ठासी आल्हाद अधिक ।
तेणे आलिंगिला रघुकुळटिळक । गेली धुकधुक दशरथाची ॥९८॥
श्रीरामे वसिष्ठासी लोटांगण । दशरथासी साष्टांग नमन ।
येरे दिधले आलिंगन । निवालें मन रायाचे ॥९९॥
विजयी जाला श्रीरामचम्द्र । ऋषिरायांसी आल्हाद थोर ।
अवघे करिती जयजयकार । चालिले भार स्वानंदे ॥१००॥
एकाजनार्दना सह्रण । जाली परशुरामाची बोळवण ।
आता अयोध्याप्रवेशन । स्वानंदे गमन श्रीरामा ॥१०१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामपरशुरामएकात्मबोध निरूपणं नाम षड्विंशतितमोध्यायः ॥२६॥
॥ ओंव्या १०१ ॥ श्लोक १ ॥ एवं १०२ ॥
