नको कर्म धर्म वार्ता
878.
नको कर्म धर्म वार्ता । सुखे करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणे तुटे तुमची ॥१॥
सोपे साधनाचे सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्यांशींची ॥२॥
नका वेदशास्त्र पाठ । नामे धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥
म्हणोनि करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एका जनार्दनी भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥
