वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › १४. सुवर्णमृगाचा पाठलाग

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088071 · अभंग क्र. १४

14.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय चौदावा ॥
हरिणरुपी मारीचाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचे पंचवटीत आगमन, तेथील विध्वंस पाहून त्याची बिकट अवस्था :

श्रीरामाश्रम पंचवटीं । रावण देखोनि आपुल्या दृष्टी ।
मारिल्या राक्षसांच्या कोटी । तेणे पोटी दचकला ॥१॥
राक्षसांची दीर्घ मढी । पडली देखोनि करवंडी ।
मारीच अत्यंत हडबडी । खाजवी शेंडी भयभीत ॥२॥
आधींच श्रीरामभयें भीत । त्यावरी देखोनि राक्षसघात ।
मारीच चळचळां कांपत । जे राक्षसा अंतक श्रीराम ॥३॥

मारीचाचा अनुनय :

देखोनि राक्षसांचे कंदन । मारीचास स्वये रावण ।
अत्यंत देऊन सन्मान । त्याचे चरण दृढ धरिले ॥४॥
सीताहरण अति निर्वाण । खुंटले स्वामिसेवकपण ।
कृपा करोनि आपण । जानकीहरण साधावे ॥५॥
ज्यालागीं आमुचे आगमन । ते कार्य तो साधावें आपण ।
दावोनिया मायामृगमोहन । सीताहरण मज साधी ॥६॥

स रावणवचः श्रुत्वा मारीचो राक्षसाधिपः ।
मृगो भूत्वाश्रमपदे रामस्य विचचार ह ॥१॥
रुक्मबिंदुशतैश्चित्रः प्रवालमणिभूषितः ।
मुक्ताजालपरिच्छन्नः स बभूव मनोहरः ॥२॥

मारीचाची मनस्थिती :

ऐकोनि रावणाचे वचन । मारीच म्हणे आले मरण ।
श्रीरामबाणें देता प्राण । तै आपण अति धन्य ॥७॥
अंती करी तो रामस्मरण । तो स्वये होय ब्रह्म पूर्ण ।
त्याचा लागलिया निजबाण । कृतकल्याण होईन मी ॥८॥
श्रीरामाच्या बाणघातीं । दासी होती चारी मुक्ती ।
अनायासे ब्रह्मप्राप्ती । श्रीराममूर्ति देखिलिया ॥९॥
ऐसे विचारोनि चित्ती । रावणा सुख द्यावया अंती ।
जाला विचित्रमृगाकृती । लंकापति विस्मित ॥१०॥

मारीचाचे हरिणस्वरुप, त्याचे वर्णन :

नाही सांडीमांडी गेली । नाही फेडीवेडी देखिली ।
घवकरी मृगशोभा शोभली । पडली भुली लंकानाथा ॥११॥
तनु मनोहर लोनसळी । रत्‍नबिंदु रोममूळी ।
पृष्ठी शोभे मुक्ताफळीं । नभोमंडळी जेवी तारा ॥१२॥
खुर आरक्त प्रवाळवर्णी । कळावया मरकतमणी ।
पाचुबिंदु उमटले श्रवणीं । कर्णाभरणीं अति शोभा ॥१३॥
इंद्रनीळशृंगें रत्‍नमुरडी । आरक्त नेत्र जिव्हा तांबडी ।
ठाणठकारपरवडी । मृगशोभा गाढी शोभत ॥१४॥
शृंगाग्री मणी लखलखती । पुच्छ तळपे सिंदूराकृती ।
शुभ्र उदर हंसस्थिती । विचित्राकृति मृगशोभा ॥१५॥
अंगींच्या तेजाची प्रगल्भा । लोपती रविचंद्राची प्रभा ।
सोलींव लावण्याचा गाभा । मृगशोभा शोभत ॥१६॥

मृगाचे अंगविक्षेप, सर्वांस आश्चर्य :

ऐसा चवकत बिचकत । च्कितदृष्टीं चपळ पाहत ।
कांही चरत कांही फडकत । आश्रमांत स्वये आला ॥१७॥
रिघोनियां पंचवटी । सन्मुख सीतेचिया दृष्टी ।
श्रीराम देखे जगजेठी । ऐसा निकटीं विचरत ॥१८॥
श्रीरामापासोनि फडके दुरी । निकट विचरे सीतासुंदरी ।
सर्वांगें दावोनि साजरीं । क्षणामाझारी मोहिली ॥१९॥
मृगासीं होता दृष्टिभेटी । हर्ष जानकीचे पोटी ।
त्याचे लावण्य देखता दृष्टी । आल्हाद पोटी सीतेसी ॥२०॥
देखोनि मृगाचे अवयव । सीतेसी सुख अभिनव ।
परम सुखें सुखावे जीव । जाडला भाव मृगस्वरुपीं ॥२१॥
त्याचे पहावया स्वरुप । सीतेसी अतिशये साक्षेप ।
तंव तो आला अति समीप । आपलें स्वरुप दावावया ॥२२॥
सीता अंग प्रत्यंग न्याहाळी । जवळ येवोनि कुरवाळी ।
तंव मृदुरोमा तनु कोंवळी । दोही करतळी निवारी ॥२३॥
देखोनि मृगशोभा अत्यंत । स्वर्गी सुरवर जाले भ्रांत ।
कोण कोणाचा कैंचा येथ । महा अदभुत हा मृग ॥२४॥
देखोनिया मृगाकृती । ऋषीश्वर पडले भ्रांती ।
तटस्थ ठेली चित्तवृत्ती । अवघे पाहती टकमकां ॥२५॥

मृग पाहून सीतेला त्याचे आकर्षण :

होता मृगाचें दर्शन । मृग आकर्षी सीतानयन ।
मृगसौंदर्या वेधले मन । लागले ध्यान मृगाचें ॥२६॥
हर्षे सांगे श्रीरामासी । उल्हासें बोले लक्ष्मणासी ।
मृगसौदर्या शोभा कैसी । हेंआंगेंसीं रत्‍नावळी ॥२७॥
वने हिंडता कोट्यनुकोटी । ऐसिया मृगेंसीं नव्हे भेटी ।
मज पाहता निजदृष्टीं । ऐसा मृग सृष्टी नसेल ॥२८॥
हा नाही स्रष्ट्यानें स्रजिला । नाही कर्मजन्य जन्मला ।
निखळ लावण्याचा ओतिला । दैवे धाडिला मजलागी ॥२९॥

सीतेची श्रीरामांना विनंती :

ऐसे सीता बोले आपण । श्रीरामा घाली लोटांगण ।
जे मज अपूर्व मागणें दान । ते आपण मज द्यावे ॥३०॥
तू तंव उदार चक्रवर्ती । मी मागतें अति प्रीती ।
कृपा करावी श्रीरघुपती । कृपामूर्ति कृपाळुवा ॥३१॥
म्हणोनि चरण धरिले लल्लाटी । अश्रु भरले नेत्रवाटीं ।
सलज्ज पाहे गोरटी । श्रीरामदृष्टी लक्षोनी ॥३२॥
मृगत्वचा अति कोवळी । हेमरत्‍ने शोभे मुक्तावळी ।
अयोध्याप्रवेशनकाळीं । त्याची कांचोळी करीन मी ॥३३॥
येथोनि अयोध्या प्रवेशावयास । उरली अवधी षण्मास ।
तरी ते कंचुकीची बहुत आस । तुम्ही उदास न व्हावे ॥३४॥
दिव्यालंकारभूषण । त्याहूनि त्वचा शोभायमान ।
तियेपुढें नवरत्‍न । खद्योत जाण श्रीरामा ॥३५॥

इति सीतावचः श्रूत्वा दृष्ट्वा च मृगमदभुतम् ।
उवाच राघवो हृष्टो भ्रातरं लक्ष्मणं वचः ॥३॥
पश्य लक्ष्मण वैदेह्याः स्पृहामुल्लसितामिमाम् ।
रुपश्रेष्ठतया ह्येप मृगोद्य न भविष्यति ॥४॥
न वने नंदनोद्देशे न चैत्ररथसंश्रये ।
कुतःपृथिव्यां सौमित्रे योऽस्य कश्चित्समो मृगः ॥५॥

राम-लक्ष्मण संवाद :

मृगाचे हृदयींचे हृद्‌गत । जाणोनि सीतेचे मनोगत ।
संतुष्टला श्रीरघुनाथ । कर्तव्यार्थ लक्षोनी ॥३६॥
श्रीराम म्हणे गा सौमित्र । पाहे पा कैसा मृग सुंदर ।
ठाणमाणें अति गंभीर । हेमशरीर रत्‍नांक ॥३७॥
ऐसा मृग नंदनवनीं । पूर्वी नाही देखिला नयनी ।
नाहींच चित्ररथवनीं । ऐसा त्रिभुवनी असेना ॥३८॥
वने हिंडतां दिक्पुटीं । ऐशा मृगासी नाही भेटी ।
लावण्यमृगाची कसवटी । नाही दृष्टी देखिली ॥३९॥
या मृगत्वचेची कांचोळी । सप्रेम मागे जनकबाळी ।
अयोध्याप्रवेशाचिचे काळी । स्वये वेल्हाळी लेऊं पाहे ॥४०॥
जे अपूर्व मजकारणें | प्रथम सीतेचे मागणें ।
नेदीं म्हणता लागिरवाणें । मृग मारणें त्वचार्थ ॥४१॥
सीतेच्या मागण्यासाठी । मृगवधार्थ श्रीराम उठी ।
हेमाभरणी धनुष्य मुष्टी । बाण पृष्ठीं सज्जुनी ॥४२॥
श्रीरामे मांडोनियां ठाण । धनुष्यी वाहिलासे गुण ।
सिती लाविलासे बाण । मृग लक्षोन निघाला ॥४३॥

यावत्पृषतमेकेन सायकेन निहन्म्यहम् ।
हत्वैतच्चर्म चादाय शीघ्रमेष्यामि लक्ष्मण ॥६॥

सीतेची हौस पुरविली पाहिजे :

लक्ष्मणा ऐके सावधान । बाणे एके मृग मारीन ।
मृगचर्म शोभायमान । सीतेसी देईन सुखार्थ ॥४४॥
मृगचर्म आलिया हाता । परम सुखे सुखावे सीता ।
ऐके तिच्या मनोगता । उभयभागता विभागूं ॥४५॥
अर्धचर्माची कंचुकी पूर्ण । अर्धचर्माचें मज आसन ।
करिता अयोध्याप्रवेशन । शोभायमान आम्हा दोघा ॥४६॥
मृगचर्माचें भूषण । एक कंचुकी एक आसन ।
ऐसे सीतेचे भावीं मन । पतिवंचन करु नये ॥४७॥
उत्तम अन्न आणि पक्वान्न । वस्त्रे अलंकार आणि भूषण ।
पतीवीण भागी आपण । ते स्त्री जाण समवेश्या ॥४८॥

अहमेतद्धनिष्यामि मृगरत्‍नं न संशयः ।
इह त्वं भव सन्नद्धः शस्त्रवान्रक्ष मैथिलीम् ॥७॥
यावद्रच्छामि सौमित्र मृगमानयितुं वनम् ।
न गंतव्यमितोऽन्यत्र यावन्नाहमिहागतः ॥८॥
राक्षसादृष्टभावत्वाद्वितर्काः संभवंति हि ।
तथा तु तु समादिश्य भ्रातरं तु पुनः पुनः ॥९॥

आपण परत येईपर्यत आश्रमातून कुठेही जाऊ नये असा लक्ष्मणाला दंडक :

असो हे ऐसी सीतेची कथा । लक्ष्मणा सावध ऐक आता ।
मृग मारोनि मज न येता । तिळभर परता होऊं नको ॥४९॥
मृग मारीन मी निश्चित । जरी मिळाले त्रैलोक्यींचे दैत्य ।
तरी मी मागे न सरें श्रीरघुनाथ । संशय येथ न मानावा ॥५०॥
राक्षसांसी पडिले हाडद्वंद्व । तुवा नसावें असावध ।
शस्त्रास्त्रीं असावे सन्नद्ध । सीता सावध रक्षावी ॥५१॥
गुझ सांगे सौमित्रकानीं । राक्षस मायावी ये वनी ।
सीत नेतील छळोनी । सावधानीं रक्षावी ॥५२॥
मृग मारोनि मी ये जंववरी । तुवा न व्हावे येथोनि तिळभरी दूरी ।
संकट आलियाही जीवावरी । धीरें निर्धारी सहावे ॥५३॥
मजविषयीं काही चिंता । तुवा न करावी गा सर्वथा ।
सावधाने राखावी सीता । मागुतमागुता सांगत ॥५४॥
अति संकट देखसी दृष्टी । तरी न सांडावी पर्णकुटी ।
तुणे कानी सांगेन गुह्य गोष्टी । सीता गोरटी रक्षावी ॥५५॥
सन्मुख आलिया राक्षसकोडी । अंगचिया निजप्रौढीं ।
युद्धा न निघावें तांतडी । सीता रोकडी ते नेतील ॥५६॥
तुज गोंवोनि संग्रामासी । राक्षस नेतील सीतेसी ।
झणी सीतेसी विसंबसी । निश्चयेंसी तुज सांगे ॥५७॥
तू चढतां संग्रामपृष्ठीं । मुख्य जानकी नाठवे पोटी ।
मग एकली देखोनि पर्णकुटीं । राक्षस कपटी हरतील ॥५८॥
म्या सांगितल्या ज्या ज्या युक्ती। त्या सुद्दढ धराव्या चित्ती ।
नाना परीच्या उपपत्तीं । सीता सती रक्षावी ॥५९॥
ऐसे सौमित्रा सांगोन । वेंगें निघे मृग लक्षून ।
सवेंचि परतोनि येऊन । सांगे पुन्हा सीता रक्षावी ॥६०॥

मृगाने हूल दाखवून श्रीरामांना लांब नेले :

वारंवार करोनि नेम । मृगवधार्थी निघे राम ।
धनुष्यबाणाचा आक्रमे । अति संभ्रमें तद्वधीं ॥६१॥
श्रीराम देखोनी धनुष्यमुष्टी । मृग फडके चकितदृष्टी ।
सांडोनिया पचवटी । उठाउठी पळतसे ॥६२॥
शूर्णणखेचें नासिकाच्छेदन । तेथे मृगाचें आगमन ।
येता देखोनि श्रीरघुनंदन । सवेग गमन तेणे केले ॥६३॥
राम देखोनिया दुरी । मृग चाटी पाठीवरी ।
तया स्थळा नांव चाटोरी । गंगातीरी अद्यापि ॥६४॥
श्रीराममुखचंद्र न्याहारीं । तया स्थळा नाव चांदोरी ।
श्रीराम न्यावा बहुत दुरी । निघे झडकरी मृग वेगे ॥६५॥
काहाडोनि न्यावा रघुवीर । मृग फडकला मध्यमेश्वर ।
दावळे दावोनि श्रीरामचंद्रा । मृग पुढारा चालिला ॥६६॥
दुरी अंतरावया पंचवटी । मृग पळाला गंगातटीं ।
श्रीराम धांवे पाठोपाठी । धनुष्य मुष्टी सज्जोनि ॥६७॥
कोठे देतो दृष्टी भेटी । कोठे पाहता न दिसे सृष्टी ।
श्रीराम मृगाची न सांडी पाठी । दृढ बाणाटी सज्जोनि ॥६८॥
कोठे दिसे कोठे न दिसे । कोठे उडे मृगविन्यासें ।
श्रीराम धांवे अति आवेशें । बाण सपिच्छ विंधावया ॥६९॥

निरनिराळ्या ठिकाणच्या खुणा व त्यांची नावे :

देखोनि श्रीरामाचा बाण । मृग वेगे सोडी ठिकाण ।
त्या ठाया नांव ठाण । सावधान अवधारा ॥७०॥
प्रथम कुंकुमठाण । मातुळठाण नागठाण ।
बादामठाण पांचवें ते भौमठाण । मृग ठिकाण सोडित ॥७१॥
मृगपाप छेदी श्रीरामरावो । तो छिन्नपाप देहगांवों ।
नेऊर विंधोनि पाडिला पहाहो । तो नेउरगांवो तेथे की ॥७२॥

श्रीरामांचा बाण लागताच मारीचाने श्रीरामांच्या आवाजात मारलेली हाक :

भाळ भेदलें जिव्हारीं । तो भाळगांव गंगातीरी ।
लक्ष्मणा धांव झडकरी । गिरागजरीं मृग पडिला ॥७३॥

संप्राप्तकालमाज्ञाय चकार सुमहास्वनम् ।
सद्दशं राघवस्येव हा सीते लक्ष्मणेतिच ॥१०॥
हा लक्ष्मणेति चुक्रोश त्राहीति महता वने ।
स्वरमेनं तु संश्रुत्य लक्ष्मणस्तां प्रहास्यति ।
लक्ष्मणेन विहीनां तां मैथिलीं रावणो हरेत् ॥११॥

लागता श्रीरामाचा बाण । करोनि सप्तपाळ उड्डाण ।
मारीच सांडी निजप्राण । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥७४॥
मारीच महामावकर । श्रीराम स्वरासारिखा स्वर ।
करोनि आक्रंदे दुस्तर । दीन उत्तर ते ऐका ॥७५॥
लक्ष्मणा वेगी धांव पाव । मिळोनि राक्षससमुदाव ।
रणी निरोधे निरोधिल पहा हो । महाबाहो धांव वेगी ॥७६॥
तू तंव माझा निजसखा । रणभूमीचा पाठिराखा ।
राक्षसी मारिले मारिले देखा । रणमोचका पाव वेगी ॥७७॥
ऐसिया युक्ती आक्रंदोन । मृगपाचा त्याग करोन ।
मारीच राक्षस होता जाण । घेतला प्राण श्रीरामबाणें ॥७८॥

मारीच राक्षसास उत्तम गती :

मृगदेह राक्षसदेहो । स्थूळलिंगकारणदेहो ।
श्रीरामे छेदोनि निःसंदेहो । मारिला पहाहो मारीच ॥७९॥
मरणें मारिले जन्मासहित । देही विदेही केला घात ।
माया मारोनियां समस्त । बाणे अत्यंत सुखी केला ॥८०॥
श्रीरामाचा निजबाण । ज्यासी लागे तो सभाग्य पूर्ण ।
बाण नव्हे हा आनंदघन । सुखसंपन्न श्रीरामे ॥८१॥
स्थूळ देहातें छेदित । ते योद्धे देखिले बहूत ।
परी जीवी जीवपणा करी घात । श्रीरघुनाथ निजयोद्धा ॥८२॥
छेदोनिया भयाभय शोक । छेदोनियां द्वंद्वदुःख ।
श्रीरामे दिधले महासुख । सुखाचे सुख श्रीराम ॥८३॥
मारीचाने नेम केला देख । श्रीरामबाणें पावेन सुख ।
ते रामे दिधले आवश्यक । शत्रु सेवक समपदीं ॥८४॥
जे सुख भोगिती सनकादिक । तेचि सुख मारीचास दे आवश्यक ।
बाप कृपाळु रघुकुळटिळक । सुखदायक संग्रामी ॥८५॥

मारीचाने मारलेल्या हाकेमुळे श्रीराम साशंक :

यापरी श्रीरामे आपण । मारीच मरिला विंधोनि बाण ।
धांव पाव गा लक्ष्मण । रघुनंदन साशंके ॥८६॥
मारीच आक्रंदाची हाक । दुमदुमिले तिन्ही लोक ।
हे सौमित्र ऐकोनि देख । येईल आवश्यक धांवोन ॥८७॥
धांवण्या आलिया लक्ष्मण । अनर्थ होईल दारुण ।
मागे येवोनि रावन । सीताहरण करील ॥८८॥
जरी लक्ष्मण न येईल तत्वता । तरी त्यासी राहू न देईल सीता ।
बोल बोलेल उत्पातता । अति त्रासता धाडील ॥८९॥
हा तंव मायावी मृग पूर्ण । अलक्ष योजिले विंदान ।
धांवण्या आणोनि लक्ष्मण । सीताहरण साधावें ॥९०॥
ऐसे राक्षसीमायामत । आपण जाणोनि समस्त ।
विलंब करों नये येथ । त्वरित रघुनाथ रिघो पाहे ॥९१॥

त्यामुळे लक्ष्मण आश्रम सोडून येण्यापूर्वीच सत्वर परतणे :

जंव आला नाही लक्ष्मण । तंव तेथे जावे आपण ।
विलंब करितांचि जाण । सीता रावण हरील ॥९२॥
लक्ष्मण धांवण्या नये उठाउठी । तंव ठाकावी पंचवटी ।
ऐसे विचारोनि पोटी । मग जगजेठी निघों पाहे ॥९३॥
एका जनार्दना शरण । श्रीराम मारीच मरिला पूर्ण ।
धांवण्या धांवेल लक्ष्मण । कथाविंदान अवधारा ॥९४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडें एकाकारटीकायां
मारिचकपटमृगवधो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
॥ ओव्या ९४ ॥ श्लोक ११ ॥ एवं १०५ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग