हरि म्हणा बोलता हरि
1086.
हरि म्हणा बोलता हरि म्हणा चालता । हरि म्हणा खेळतां बाळपणी ॥१॥
म्हणा हरिनाम पुरती सकळ काम । हरिनामें ब्रह्मा हाता चढें ॥२॥
हरि म्हणा उठता हरि म्हणा बैसतां । हरि म्हणा पाहता लोकलीला ॥३॥
हरि म्हणा आसनी हरि म्हणा शयनी । हरि अम्हणा भोजनी ग्रासोग्रासी ॥४॥
हरि म्हणा जागतां हरि म्हणा निजता । हरिम्हणा झुंजतां रणांगणां ॥५॥
हरि महणा एकटीं हरि म्हणा संकटीं । हरि धरा पोटींभावबळें ॥६॥
हरि म्हणा हिंडतां हरि म्हणा भांडतां । हरि म्हणा कांडिता साळी दाळी ॥७॥
हरि म्हणा देता हरि म्हणा मागतां । हरि म्हणा गाता पदोपदीं ॥८॥
हरि म्हणा देशी हरि म्हणा परदेशी । हरि म्हणा अहर्निशी सावधान ॥९॥
हरि म्हणा एकांती हरि म्हणा लोकांती । हरि म्हणा अंतीं देहत्यागीं ॥१०॥
हरि म्हणा धर्मता हरि म्हणा अर्थता । हरि म्हणा कामता सकाम काम ॥११॥
हरि म्हणा स्वार्थी हरि म्हणा परमार्थी । हरि म्हणा ब्रह्माप्राप्तीलागीं ॥१२॥
हरि म्हणा भावता हरि म्हणा अभावता । हरि म्हणा पावतां मोक्षपद ॥१३॥
हरि म्हणा निजनिधी हरि म्हणा आनंदि । हरि परमानंदि आनंद तो ॥१४॥
हरि म्हणा जनी हरि म्हणा विजनी । एका जनार्दनी हरि नांदें ॥१५॥
