बैसल्या पंगती चोखिया
3683.
बैसल्या पंगती चोखियाच्या अंगणी । जेवी शारंगपाणी आनंदानें ॥१॥ नामदेवासहित अवघे गणगंधर्व । इंद्रादिक देव नारदमुनी ॥२॥ चोखामेळा म्हणे दोन्ही जोडोनी कर । मज दुर्बळा पवित्र केले तुम्ही ॥३॥ यातीहीन मी अमंगळ महार । कृपा मजवर केली तुम्ही ॥४॥ पंढरीचे ब्राम्हण देखतील कोण्ही । बरें मजलागुनी न पाहती जन ॥५॥ ऐसे एकोनियां हांसती सकळ । आनंदें गोपाळ हास्य करी ॥६॥ विडे देऊनिया देवे बोळविले । इंद्रिदिक गेले स्वस्थानासी ॥७॥ पंढरीचे ब्राम्हणी चोख्यासी छळिले । तेंहीं संपादिले नारायणे ॥८॥ एका जनार्दनी ऐशी चोखियाची मात । जेवी पंढरीनाथ त्याचे घरी ॥९॥
