वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › २८. महापार्श्व व महोदरवध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088139 · अभंग क्र. २८

28.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
कुंभकर्णवध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स्वतःची विद्रुपता समजल्यावर कुंभकर्णाचा खेद व संताप :

कुंभकर्णा लावोनि ख्याती । सुग्रीव पावोनि विजयवृत्ती ।
स्वये आला श्रीरामाप्रती । वानर गर्जती उल्लासे ॥१॥
येरीकडे कुंभकर्ण । विजयोल्लासें आपण ।
लंकेसी जातसे जाण । दशानन वंदावया ॥२॥
हांसती लंकेचे जन । हारवोनियां नाक कान ।
विजय मिरवितो आपण । काळे वदन कुंभकर्णा ॥३॥
कुंभकर्ण अति उन्मत्त । नाककाना झाला घात ।
कोणी सांगों न शके मात । तेणे लंकानाथ अति दुःखी ॥४॥
शत्रु मर्दिल कुंभकर्ण । ऐसा भरंवसा होता पूर्ण ।
शेखी हरवोनि नाककान । आला आपण फेंपात ॥५॥
सुग्रीवे छेदिले नाककान । हे कुंभकर्णा व्हावया ज्ञान ।
दीर्घ काष्ठी आरसा बांधोन । दावी रावण कुंभकर्णा ॥६॥
आरसा देखता संमुख । आरशासीं भांडे देख ।
नापितहस्तें तू काळमुख । मज निर्नासिक दाविसी ॥७॥
हाते पाहो जाता स्पष्ट । नाक कान सरसपाट ।
सुग्रीवे केले यथेष्ट । अहा कटकट कुंभकर्णा ॥८॥
सुग्रीव पाहता काखेतळी । तेणे सुटोनि तेचि काळी ।
नाककानां करोनि होळी । श्रीरामाजवळी तो गेला ॥९॥
जळो माझी रणव्युत्पत्ती । सम्मुखपणें विजयवृत्ती ।
कीर्ति जाली अपकीर्ती । केंवी लंकापती मुख दावू ॥१०॥
हारवोनि नाककान । केंवी वंदूं दशानन ।
कोपे परतला कुंभकर्ण । वाररसैन्य निर्दळावया ॥११॥

कर्णनासाविहीनस्तु कुंभकर्णो महाबलः ।
रराज शोणितोत्सेकेर्गिरिः प्रस्रवणौरिव ॥१॥
पुनः स पुर्याः सहसा महात्मा निष्कम्य तद्वनरसैन्यमुग्रम् ।
बभक्ष रक्षो युधि कुंभकर्णः प्रजा युगांताग्नीरवि प्रदप्तिः ॥२॥
बुभुक्षितः शोणितमांसगृध्नुः प्रविश्य तद्वानरसैन्यमाशु ।
चखाद रक्षांसि हरीन्पिशाचानृक्षांश्च मोहाद्युधि कुंभकर्णः ॥३॥
एवं द्वौ त्रीन्वहुंश्चापि वानरान्सराक्षसैः सह ।
समादायैकहस्तेन मुखे प्रक्षिपति स्म सः ॥४॥

संतापातिरेकामुळे कुंभकर्णांचे विवेकशून्य वर्तन :

सुग्रीवे नेले नाककान । अपमानिला कुंभकर्ण ।
कोपे परतला आपण । वानरगण मारावया ॥१२॥
नाकी कानी रुधिरधारा । रक्तें न्हाणिले निशाचरा ।
गेरू शोभे जेंवी गिरिवरा । तेंवी साजिरा रणी दिसे ॥१३॥
सांडोनिया लंकाभवन । केले कुंभकर्णें उड्डान ।
कर्दुनियां वानरगण । स्वये आपण भक्षित ॥१४॥
वटारोनियां दोनी नयन । पररोनियां दीर्घ वदन ।
भक्षीतसे वानरगण । कुंभकर्ण आक्रोशे ॥१५॥
एक दोन तीन चोरी । वानरसैन्याचिया हारी ।
राक्षससैन्या त्याचि परी । मुखभीतरी घालीत ॥१६॥
रणी मातला अति दुर्धर । त्यासी नाठवे आपपर ।
वानर आणि निशाचर । भक्षी एकत्र समसगट ॥१७॥
प्रळयकाळीं हुताशन । सर्व भक्षिता होय आपण ।
तेंवी वानररक्षोगण । कुंभकर्ण भक्षित ॥१८॥
मांस खावया येती भूते । कुंभकर्ण भक्षी त्यांते ।
पिशाचें कंकाळे समस्ते । अस्वलांतें भक्षित ॥१९॥

ते वध्यमाना हरयो रामं जग्मुः सतां गतिम् ।
राघवश्च समुत्पत्य धनुरुग्रं समाददे ॥५॥
स वानरगणैस्तैस्तु वृतः परपुरंजयः ।
लक्ष्मणानुगतो रामः संप्रतस्थे महाबलः ॥६॥

श्रीरामांचे प्रतिकारार्थ आगमन :

वृक्षशिळापर्वत पाषाण । वानरी युद्ध करिता निर्वाण ।
रणी नागवे कुंभकर्ण । आले धांवोन श्रीरामापाशीं ॥२०॥
कुंभकर्ण नाकेंविण । रणी वानरा करिता कंदन ।
देखोनि कोपला रघुनंदन । धनुष्यबाण सज्जूनी ॥२१॥
सुवर्णबंदी अति सुंदर । मणिरत्‍नांकित मनोहर ।
पाचूबंद परिकर । चाप गंभीर शोभत ॥२२॥
ऐसिया सज्जोनिया धनुष्यासी । वानर घालोनि पाठींसीं ।
राम खवळला रणाभिनिवेशीं । कुंभकर्णासी निघटावया ॥२३॥

बिभीषणाची श्रीरामांना विनंती :

श्रीरामे सज्जोनिया मेढा । उभा कुंभकर्णापुढा ।
राम नेटका धनुर्वाडा । मागा पुढा हालों नेदी ॥२४॥
दोही बाही वानरगण । निकटवर्ती लक्ष्मण ।
रणी क्षोभतां रघुनंदन । बिभीषण धांविन्नला ॥२५॥
घालोनिया लोटांगण । वंदोनि श्रीरामचरणा ।
मृदु मंजुळ मधुर वचन । बिभीषण विनवीत ॥२६॥
कुंभकर्णा आवडी मोठी । त्याची घेवोनिया भेटी ।
जंव मी सांगेन जीवींच्या गोष्टी । तंव शरवृष्टी न करावी ॥२७॥
निवारुन वानरगणा । युद्ध ठेवोनि अर्ध क्षणा ।
भेटावया कुंभकर्णा । आज्ञापना मज द्यावे ॥२८॥
कृपेने बोले रघुनाथ । कुंभकर्ण अति उन्मत्त ।
रागे करील तुझा घात । कुळक्षयार्थ वाढेल ॥२९॥
ऐकता श्रीराम वचन । बिभीषणा आले रुदन ।
प्रेम देखोनि रघुनंदन । आज्ञापन दीधलें ॥३०॥

बिभीषणः पुरो दृष्ट्वा मालिनीय लघुः
सदा । करुणाक्रोधलज्जाभिर्व्याप्तो विहृलतां गतः ॥७॥
बिभीषणो महाबाहुः कुंभकर्णमुवाच ह ।
गदितं मे कुलस्यास्य रक्षणार्थमरिंदम ॥८॥
न कृतं सर्वरक्षोभिस्तस्तोऽहं राममागतः ।
क्षमितव्यं तु भवता सुकृतं दुष्कृतं तु वा ॥९॥
एवमुक्त्वाश्रुपूर्णाक्षो गदापाणिर्बिभीषणः ।
एकांतमाश्रितो भूत्वा चिंतयामास तत्क्षयम् ॥१०॥

कुंभकर्ण व बिभीषण यांची भेट :

संमुख देखोनि बिभीषण । कुंभकर्णा आले रुदन ।
बाळपणापासून प्रतिपालन । येणे केले ॥३१॥
माता पिता धाय धाता । त्याहून त्याची अधिक प्रेमता ।
त्यासी रावणे हाणिता लाता । अति विव्हलता स्फुंदत ॥३२॥
देखोनि कुंभकर्णाचे रुदन । स्वये बोले बिभीषण ।
कुळरक्षणार्थ आपण । स्वहित संपूर्ण सांगितले ॥३३॥
हा सविवेक प्रपंचहिता । हाचि हितार्थ परमार्था ।
त्यासी रावणे हाणितल्या लाथा । दुःखावस्था स्फुंदत ॥३४॥
ते स्वहिताची माझी मात । नायके इंद्रजित लंकानाथ ।
प्रधान परिवार समस्त । शेखी प्रहस्त नायके ॥३५॥
लाथा हाणिल्या सभेप्रती । मज क्षोभ चढला नाही चित्ती ।
बलात्कारें धरोनि हाती । श्रीरामाप्रती दवडिलें ॥३६॥
यालागी गा आपण । श्रीरामासी आलो शरण ।
माझे अपराध जे दारुण । क्षमा संपूर्ण करावे ॥३७॥
ऐकता बिभीषणवचन । कुंभकर्णा आले रुदन ।
दोघा पडिले आलिंगन । स्रवती नयन दोघांचें ॥३८॥
बिभीषण धरोनि हाती । कुंभकर्णो नेला एकांती ।
वैर करिता रघुपती । कुळसमाप्ती कुळाक्षयो ॥३९॥
देखोनिया अति एकांत । कुंभकर्ण सांगे अति भावार्थ ।
बिभीषणा तुझे भाग्य समर्थ । श्रीरघुनाथ पावलासी ॥४०॥
करिता जप तप ध्यान । योगायोग अनुष्ठान ।
स्वप्नीं न दिसे रघुनंदन । तो सुप्रसन्न तुज जाला ॥४१॥

आत्मकार्यं कृतं वत्स यस्त्वं राममुपागतः ।
त्वमेको रक्षसां लोके सत्यर्माभिरक्षितः ॥११॥
नास्ति सत्याभिसक्तानां व्यसनं तु कदाचन ।
संतानर्थं त्वमेवैकः कुलस्यास्य भविष्यसि ॥१२॥
राघवस्य प्रसादाच्च रक्षसां राज्यमाप्स्यसि ।
प्रकृत्याहं सुदुर्धर्षः शीघ्रं मार्गादपक्रम ॥१३॥
नस्थातव्यं पुरस्तान्मे संभ्रमान्नष्टचेतसः ।
न वेद्मि संयुगे सक्तः स्वान्परान्वा निशाचर ॥१४॥
रक्षणीयोसि मे वत्स सत्यमेतद्व्रवीमि ते ॥१५॥

कुंभकर्ण रामाच्या हातून मरण्याची इच्छा व्यक्त करतो :

दोघे बंधूचा एकांत । कुंभकर्ण सांगे भावार्थ ।
पूर्णावतार श्रीरघुनाथ । निश्चितार्थ मी जाणे ॥४२॥
नारदवाक्याच्या निर्धारी । श्रीराम अवतारां अवतारी ।
त्यासी पहाता वैराकारीं । करील बोहरी कुळाची ॥४३॥
श्रीराम वैरी करिता जाण । सुपुत्र ससैन्यप्रधान ।
क्षय पावेल रावण । हेंही संपूर्ण मी जाणे ॥४४॥
तुवा थोर केले उचित । होवोनि श्रीरामा शरणागत ।
कुळ तारिले निश्चितार्थ । आम्ही समस्त उद्धरिलों ॥४५॥
राक्षसांच्या कुळाप्रती । बिभीषणा तू भावार्थी ।
तुझ्या ठायी श्रीरामभक्ती । परम परमार्थी तू एक ॥४६॥
राक्षसकुळी धर्मभुषण । सत्यानुवर्ती बिभीषण ।
तुझ्या धर्माचें निशाण । वैकुंठी जाण गाजत ॥४७॥
ज्याच्या ठायी श्रीरामभक्ती । त्यास भय नाही कल्पांती ।
कळिकाळ शरण येती । पाया लागती महाविघ्नें ॥४८॥
रणी खवळला श्रीरघुनाथ । करील राक्षसांचा घात ।
मजसकट लंकानाथ । कुळ समस्त निर्दाळील ॥४९॥
रिघोन श्रीरामासी शरण । राक्षसकुळा संरक्षण ।
तू वांचलासी बिभीषण । तिळतर्पण पिंडदाना ॥५०॥
तुझे भाग्य अति समर्थ । तुज तुष्टाला श्रीरघुनाथ ।
लंकाराज्य होईल प्राप्त । जाण निश्चित बिभीषणा ॥५१॥
धन्य प्रतापी रघुनंदन । न जिणता दशानन ।
लंकाराज्य दिधले दान । अन्यथा कोण करु शके ॥५२॥
आम्ही जोडिला लौकिकार्थ । दाटुगेपणाचा पुरषार्थ ।
तुवा जोडिला श्रीरघुनाथ । निजमोक्षार्थ राक्षसा ॥५३॥
लागता श्रीरामाचे बाण । मी पावेन ब्रह्म पूर्ण ।
परम उल्लासें आपण । कुंभकर्ण अनुवादे ॥५४॥
घालोनिया लोटांगण । वंदून बिभीषणाचे चरण ।
श्रीरामासी करावया रण आज्ञापन मज देई ॥५५॥

कुंभकर्णाचा बिभीषणाला निरोप व रणभूमीवर आगमन :

मज कोप आल्या घोरांदर । युद्धी नाठवे आपपर ।
तू येथोनि परता सर । आम्ही निशाचर अविवेकी ॥५६॥
आम्ही राक्षस अति उन्मत्त । संमुख तुजला असता येथ ।
अवचट होईल अनर्थ । नीग निश्चित सुबंधो ॥५७॥
तू श्रीरामाचा शरणागत । तुज मारणें नाही येथ ।
जवळी असता होईल अनर्थ । नीघ निश्चित सभाग्या ॥५८॥
ठाकूनि जाई श्रीरघुनाथ । तेथे तुज न लागे आघात ।
ऐसे बोलोनि कुंभकेत । रणाआंत निघाला ॥५९॥

मर्दंतं वानरान्संख्ये कालांतकयमोपमम् ।
तं दृष्ट्वा राक्षसश्रेष्ठं प्रदीप्तानलवर्चसम् ॥१६॥
विस्फारयामास तसा कार्मुकं पुरुषर्षभः ।
स तस्य चापनिर्घोषात्कुपितो नैर्‍ऋतर्षभ ॥१७॥
अमृष्यमाणस्तं घोषाममिदुद्राव राघवम् ।
तस्मिन्काले सुमित्रायाः पुत्रः परबलार्दनः ॥१८॥
चकार लक्ष्मणः क्रुद्धो युद्धं शस्त्रविदां वरः ।
स कुंभकर्णस्य शराञशरीरे सप्त वीर्यवान् ॥१९॥
निचखानाददे चान्यन्विससर्ज स लक्ष्मणः ।
अतिक्रम्य स सौ‍मित्रिं कुंभकर्णो महाबलः ॥२०॥
राममेवाभिदुद्राव कंपयन्निव मेदिनीम्॥२१॥

कुंभकर्णाच्या आगमनामुळे वानरसैन्य भयभीत :

जैसा काळ भूतां आंकळित । का यम यमपाशीं बांधित ।
अंतक सगळाचि गिळित । तेंवी वानरांते कुंभकर्ण ॥६०॥
जेंवी वन्ही वनाआंत । वनस्थळी भस्म करित ।
तेंवी कुंभकर्ण वानरांत । कंदन करित कपिकुळा ॥६१॥

रामधनुष्याच्या टणत्काराने कुंभकर्ण दचकला :

करित वानरा मर्दन । येता देखोनि कुंभकर्ण ।
तेणे क्षोभला रघुनंदन । धनुष्यबाण सज्जूनी ॥६२॥
करित धनुष्यी टणत्कार । नादे दुमदुमिले अंबर ।
कुंभकर्णाचे जिव्हार । अति दुर्धर दचकलें ॥६३॥
ऐकोनि चापगर्जन । कोपे खवळला कुंभकर्ण ।
लक्षुनियां रघुनंदन । सवेग आपण धांविन्नला ॥६४॥

कुंभकर्ण रागाने रामांवर चालून जात असता लक्ष्मण मध्ये येतो :

धावोनि येता कुंभकर्ण । आडवा आला लक्ष्मण ।
धनुष्य सज्जोनि संपूर्ण । सात बाण विंधिले ॥६५॥
लागतांही सात बाण । डंडळीना कुंभकर्ण ।
ते देखोनि लक्ष्मण । बाण दारुण विंधिले ॥६६॥
अव्हेरुन त्याचे बाण । उपेक्षोनिया लक्ष्मण ।
लक्षूनियां रघुनंदन । कुंभकर्ण धावला ॥६७॥

कुंभकर्णो महातेजा राघवं वाक्यमब्रवीत् ।
नाहं विरोधो विज्ञेयो न कबन्धः खरो न च ॥२२॥
न वाली न च मारीचः कुंभकर्णमवैहि माम् ।
पश्य मे मुदरं घोरं सर्वकालायसं दृढम् ॥२३॥
अमेन निर्जिता देवा दानवाश्च मया रणे ।
शक्रश्च निर्जितो राम नप्ताहं च स्वयंभुवः ॥२४॥
विकर्णनास इति मां नावज्ञातुमिहार्हसि ।
अल्पापि हि न मे पीडा कर्णनासाविकर्तनात् ॥२५॥

लक्ष्मणाला अव्हेरुन कुंभकर्णाची रामांना दार्पोक्ती :

श्रीरामाची आंगवण । नोकोनि बोले कुंभकर्ण ।
रणी मारिले रक्षोगण । ते उपेक्षून अनुवादे ॥६८॥
विराध नव्हे मी वनगोचर । त्रिशिरा दूषण नव्हे मी खर ।
मी तंव नव्हे वाळी वानर । दुश्चित्ता शर विंधावया ॥६९॥
कबंध नव्हे मी पायेंवीण । मारीच नव्हे मी कनकहरिण ।
माझे नांव कुंभकर्ण । रामलक्ष्मण मर्दावया ॥७०॥
माझे हातींचा मुद्‌गर । तिखट तिख्याचा दुर्धर ।
येणे जिंतिले सुरासुर । यक्ष किन्नर पन्नर ॥७१॥
दैत्य दानव मानव । येणे जिंतिले म्या सर्व ।
रणी मारावया राघव । घेवोनि धांव आलो असे ॥७२॥
इंद्र धरिला जीवे जीत । तो मी ब्रह्मयाचा नात ।
नाककानां जाला घात । उपेक्षित न मानावा ॥७३॥
नाककानांची हे व्यथा । अल्प बाधीना माझ्या चित्ता ।
उणीव नव्हेच पुरुषार्थ । रणी रघुनाथा मर्दिन ॥७४॥

कुंभकर्ण मुद्‌गारानें श्रीरामांवर प्रहार करतो :

ऐकोनि कुंभकर्णवचन । रामे विंधिले दुर्धर बाण ।
तेणे न ढळे कुंभकर्ण । मग निर्वाण मांडिलें ॥७५॥
रामे विंधिता रुद्रास्त्र । त्याचे हृदयी भेदला शर ।
अति विव्हळ निशाचर । हातींचा मुद्‌गर गळाला ॥७६॥
मुद्‌गर पडतांचि क्षिती । कोपे खवळला भर्दजाती ।
तोचि मागुता घेवोनि हाती । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥७७॥
रणी मर्दित वानर । आपुले भक्षी राक्षसभार ।
गिळित अश्व खर कुंजर । आपपर नोळखे ॥७८॥
रणी मातला निशाचर । नोळखे आपपर ।
मारावया श्रीरामचंद्र । घेवोनि मुद्‌गर धांविन्नला ॥७९॥
मुद्‌गरेंसीं घेवोनि धांव । निकट ठाकिला राघव ।
तो जंव हाणीं घाव । केले लाघव श्रीरामे ॥८०॥

दर्शयेक्ष्वाकुशार्दूल वीर्यं गात्रेषु मेऽनघ ।
ततस्त्वां भक्षयिष्यामि दृष्टपौरुषविक्रमम् ॥२६॥
वायव्यमादाय ततो महास्त्रं रामः प्रचिक्षेप निशाचराय ।
समुद्ररं तेन जहार बाहुं निकृत्तबाहुस्तुमुलं ननाद ॥२७॥
स कुंभकर्णोऽस्त्रनिकृत्तबाहु र्महासिकृत्ताग्र इवाचलेंद्रः ।
उत्पाटयामास करेण वृक्षः ततोमिदुद्राव रणे नरेंद्रम् ॥२८॥
तं तस्य बाहुं सहशालवृक्षं समुद्यतं पन्नगभोगकल्पम् ।
इंद्रास्त्रयुक्तेन जहार रामो बाणेन जांबुनदभूषितेन ॥२९॥

श्रीराम कुंभकर्णाचा डावा हात तोडून टाकतात :

निकट येता कुंभकर्ण । वायव्यास्त्र सज्जून ।
श्रीरामे सोडिला बाण । निजनिर्वाणसाटोपें ॥८१॥
धन्य त्या बाणाची नव्हाळी । मुद्‌गर असतांही करतळी ।
बाहू छेचोन समूळी । भूमंडळी पाडिला ॥८२॥
बाहुं छेदिता समूळी । कुंभकर्ण आतुर्बळी ।
तेणे घाये न डंडळीं । आला आरोळी देऊनी ॥८३॥

उजव्या हाताने शालवृक्ष घेऊन कुंभकर्ण रामांवर धावला :

छेदिलिया वामहस्त । माझा न वचे पुरुषार्थ ।
दक्षिण हस्ते मी समर्थ । रणी रघुनाथ मारावया ॥८४॥
श्रीराम लक्षून केवळ । दिर्घ उपडोनिया शाल ।
धांविन्नला उतावेळ । रणकल्लोळ संग्रामी ॥८५॥
रणी सरकत थरकत । शालहस्ते तळपत ।
मारावया श्रीरघुनाथ । असे धांवत साटोपे ॥८६॥
श्रीरामाचे येता बाण । शालहस्ते मोडून ।
रणी मारावया रघुनंदन । आला गर्जोन कुंभकर्ण ॥८७॥
आजानुबाहु अत्यंत थोर । शोभा शोभे भुजंगाकार ।
मारावया श्रीरामचंद्र । शाल वृक्ष उचलिला ॥८८॥

श्रीरामांनी कुंभकर्णाचा उजवा हात इंद्रास्त्राने तोडला :

त्याचा जंव लागे घावो । तंव श्रीरामे करोनि लवलाहो ।
इंद्रास्त्र सज्जूनि पहा हो । सशाल बाहु छेदिला ॥८९॥
सुवर्णपत्री बाण शोभत । छेदोनि कुंभकर्णाचा हात ।
बाण परतोनि भातां रिघात । श्रीरघुनाथ प्रतापी ॥९०॥
उभय भुजा रघुपती । छेदोनि पाडिलिया क्षिती ।
धनुष्य ठेवोनिया हाती । श्रीरघुपति राहिला ॥९१॥
उभय भुजा जाल्या क्षीण । रणी निःशस्त्री कुंभकर्ण ।
त्या वीर न विंधी बाण । धर्मप्रवीण श्रीराम ॥९२॥

हस्तविहीन कुंभकर्णाने उड्डाण केले :

कुंभकर्ण म्हणे श्रीरामासी । तू का रे युद्ध न करिसी ।
प्रळयशक्ति आहे मजपासीं । तुम्हा दोघांसी मारावया ॥९३॥
मज न मानी निःशस्त्री क्षीण । करोनिया रण‍उड्डाण ।
दोघा करीन शतचूर्ण । वानरसैन्यसमवेत ॥९४॥
ऐसे बोलोनि कुंभकर्ण । दुर्धर धांव घेतली जाण ।
मारावया रामलक्ष्मण । आला आपण साटोपे ॥९५॥
अमित विंधिता पै बाण । मागे न सरे कुंभकर्ण ।
दोघा करावया शतचूर्ण । दीर्घ उड्डाण तेणे केले ॥९६॥

त कृत्तबाहुं समवेक्ष्य रामः समापतंतं सहसोन्नदन्तम् ।
ततोऽर्धचंद्रौ निशितो गृहीत्वा चिच्छेद पादौ युधि राक्षसस्य ॥३०॥
स कृत्तबाहुर्विनिकृत्तपादो विदार्य वक्र्त्रं वडवामुखाभम् ।
दुद्राव रामं सहसाभिगर्जन्‍राहुर्यथा चंद्रमिवांतरिक्षे ॥३१॥

श्रीरामांनी कुंभकर्णाचे दोन्ही पाय तोडले :

बाहु छेदिल्या निशाचर । मारावया रामचंद्र ।
धांविन्नला अति सत्वर । कोपे दुर्धर उडाला ॥९७॥
सवेग घालोनि उड्डाण । चूर्ण करावे रामलक्ष्मण ।
येणे लाघवें कुंभकर्ण । आला धांवोनि आवेंशें ॥९८॥
म्हणे रामा राहे साहें । माझा यावा आला पाहे ।
तुझ कोण राखेल माये । गर्जोनि लवलाहें उडाला ॥९९॥
येता देखोनि निशाचर । बाण काढिला अर्धचंद्र ।
ज्याची लागतांचि धार । छेदी जिव्हार वायूचें ॥१००॥
श्रीराम धनुर्वाडा संपूर्ण । विंधोनि अर्धचंद्र बाण ।
उडता विंधोनि दोनी चरण । कुंभकर्ण पाडिला ॥१॥
नाही नाक नाही कान । छेदोनियां करचरण ।
रणी पाडिला कुंभकर्ण । तरी आंगवण सांडीना ॥२॥
पसरोनिया निजमुख । झेंपावे श्रीरामासंमुख ।
ते देखोनि शक्रादिक । अलोलिक मानिती ॥३॥
नाही नासिक नाही कर्ण । नाही त्यासी करचरण ।
अभिनव सोंग कुंभकर्ण । वानरगण हांसती ॥४॥
मुख नाडिले सुग्रीवे । करचरण खंडिले राघवें ।
कुंभकर्ण हे सोंग नवें । उचित पावे श्रीरामे ॥५॥
श्रीराम उदार चकवर्ती । त्यासी छेदोनि दरिद्रकुमती ।
त्यासी देईल ब्रह्मप्राप्ती । वेद गर्जती पवाडे ॥६॥

हस्तपादविहीत कुंभकर्णाचे धूड श्रीरामांना ग्रासावयास धांवले :

जेंवी का राहु आकाशी । ग्रासूं धांवे पूर्ण चंद्रासी ।
तेंवी कुंभकर्ण श्रीरामासी । ग्रासावयासी धांवत ॥७॥
सुवर्णपत्री श्रीरामबाण । मुखें ग्रासी कुंभकर्ण ।
जे जे सोडी रघुनंदन । ते ते आपण स्वये ग्रासी ॥८॥

अथाददे सूर्यमरीचिकल्पं सब्रह्मदंडातककालतुल्यम् ।
अरिष्टमैंद्रं निशितं सुपुंखं रामः शरं मारुततुल्यवेगम् ॥३२॥
तं कार्मुके समाधाय विकेष्य च महाबलः ।
ससर्ज कुंभकर्णस्य वधाय शरमुत्तमम् ॥३३॥
दिव्यं मघवता दत्तं ज्वलंतमिव तेजसा ।
स विसृष्टो बलवता रामेण निशितः शरः ॥३४॥
कुंभकर्णस्य हृदयं भित्वा धरणिमाविशत् ॥३५॥

श्रीरामांचा कुंभकर्णाच्या हृदयावर बाणानें हल्ला :

निजमुखे कुंभकर्ण । रणांगणी ग्रासी बाण ।
तेणे क्षोभोनि रघुनंदन । शर दारुण सज्जिले ॥९॥
घ्यावया राक्षसाचा प्राण । जेंवी खडतर सूर्यकिरण ।
तैसे सज्जिले निर्वाणबाण । ज्यांसी निवारण असेना ॥११०॥
श्रीरामे सज्जूनि कोदंड । काळदंड यमदंड ।
अनिवार ब्रह्मदंड । तैसाच प्रचंड शरविंधी ॥११॥
अरिघ्नास्त्र आणि रुद्रास्त्र । दोन्ही अस्त्रे अनिवार ।
रामे सज्जून समंत्र । रणी रघुवीर विंधत ॥१२॥
ऐसे विधितां निर्वाणबाण । हृदयी भेदे कुंभकर्ण ।
घायीं पडला मूर्च्छापना । धरा भेदून शर गेला ॥१३॥

अथाददे शरं चान्यं दिव्यं दिव्याभिमंत्रितम् ।
कुंभकर्णवधस्यार्थे राघवो हि महाबलः ॥३६॥
स तं महापर्वतकूटसन्निभं सुवृत्तदंष्ट्रं चलचारुकुंडलम् ।
चकर्त रक्षोधिपतेः शिरस्तदा यथैव वृत्रस्य पुरा पुरंदरः ॥३७॥
तद्रामबाणाभिहतं पपात रक्षःशिरः पर्वतसन्निकाशम् ।
बभंज पुर्या गृहगोपुराणि प्राकारमुच्चं तमपातयश्च ॥३८॥

कुंभकर्णाचा शिरच्छेद झाला तरी त्यांचे शिर रामांवर आले :

हृदयी भेदला बाण । तरी मरेना कुंभकर्ण ।
श्रीरामासी करावया रण । उपरमे आपण साटोपे ॥१४॥
ऐसे देखोनि जाण । दिव्यास्त्र परम निर्वाण ।
श्रीरामे सज्जिला बाण । कुंभकर्ण मारावया ॥१५॥
सुवर्णपत्री सुतीक्ष्ण । श्रीरामे स्वये अभिमंत्रून ।
मारावया कुंभकर्ण । निर्वाणबाण सोडिला ॥१६॥
अचुकहस्ती श्रीरामचंद्र । पर्वतप्राय त्यांचे शिर ।
छेदूनि पाडिलें भूमीवर । तरी निशाचर मरेना ॥१७॥
शिर उडोनि आकाशी । ग्रासूं धांवे श्रीरामासी ।
धड गडबडित वेगेंसी । ये रघुरायासी रगडावया ॥१८॥

रामांनी कुंभकर्णाचे धड लंकेमध्ये उडविल्याने लंकेमध्ये आकांत :

श्रीरामे शरधारी । शिर उडविलें अंबरी ।
धड विंधोन बाणेंकरीं । लंकेमाझारीं पाडिलें ॥१९॥
धड पाडिता लंकेआंत । तेथेंही मांडला आकांत ।
गृहें गोपुर पाडित । रगडू रघुनाथ धड धांवें ॥१२०॥
धड धांवे रगडावयासी । ते पिटून घाली बाणेंसीं ।
शिर येता ग्रासावयासी । उडवी आकाशी शराग्रे ॥२१॥
धड धांवे धरेंसी । शिर धांवे आकाशी ।
श्रीराम पिटी त्या दोहींसी । लघुलाघवेंसीं बाणाग्रें ॥२२॥

वरदाच्या बळाने कुंभकर्णाला पाठ दाखवेपर्यत प्राण जात नाही :

कुंभकर्णवरदाची थोरी । दुधड केलिया शरीरी ।
पाठिमोरा न होता वैरी । तो धरेवरी पडेना ॥२३॥
शिववरदाची निजथोरी । रणी पाठिमोरा जाल्या वैरी ।
तैंच पडावें धरेवरी । प्रेतापरी अचेतन ॥२४॥

बिभीषणाची अर्धा क्षण पाठ दाखविण्याची श्रीरामांना विनंती :

बिभीषण म्हणे श्रीरामासी । क्षणार्ध पाठी द्यावी यासी ।
तरीच मरण कुंभकर्णासी । येरवी आकल्प मरेना ॥२५॥
ऐकता बिभीषणवचन । क्षोभा चढला रघुनंदन ।
आकल्पांत करिता रण । पाठी आपण दावीना ॥२६॥

सूर्यवंशास लांछनास्पद म्हणून श्रीरामांचा नकार :

तिळभरी मागे सरणें । तरी सूर्यवंशा आले उणें ।
पूर्वजांसी लाजिरवाणे । निंद्य जिणें क्षत्रियांचे ॥२७॥
मागे सरणे नाही सर्वथा । हे नित्य व्रत श्रीरघुनाथा ।
बिभीषणासी परम चिंता । होय सांगता कपीप्रती ॥२८॥
पाठी न देता रघुनंदन । आकल्प करिता रण ।
तरी मरेना कुंभकर्ण । अटक संपूर्ण ओढविले ॥२९॥
अंगदसुग्रीवादि जुत्पत्ती । अवघे गजबजिले ठाती ।
कोणे बुझवावा रघुपती । चिंतावर्ती समस्त ॥१३०॥
कार्य साधावया आकांत । एक बळियाढा हनुमंत ।
आतर्क्य साधील कार्यार्थ । तोही वृत्तांत अवधारा ॥३१॥

हनुमंताने शेपटीने श्रीरामांना डिंवचताच
श्रीरामांनी पाठ फिरविली व कुंभकर्णाचे धड पडले :

युद्ध करीतां धडशिरेंसी । हनुमान येवोनि पाठींसीं ।
पुच्छे डंवची श्रीरामासी । तो फिरोनि त्यासी पूसत ॥३२॥
राम फिरता रणांगणी । धडशिर पडले धरणी ।
जयजयकारें देववाणी । स्वर्गी निशाणीं गाजत ॥३३॥
एक वेळ जयजयकार । अवघे गर्जती वानर ।
विजयी झाला श्रीरामचंद्र । निशाचर पाडिला ॥३४॥
क्षोभो न देता रघुनाथ । हनुमंते साधिला कार्यार्थ ।
अवघे वानर आल्हादयुक्त । हारिखें गर्जत हरिनामें ॥३५॥
माझे राखोनि सत्यव्रत । कळो न देता विमुख पुरुषार्थ ।
हनुमंते साधिला कार्यार्थ । तेणे रघुनाथ तुष्टला ॥३८॥
बळवंत विवेकवंत । भक्तिवैराग्य ज्ञानवंत ।
सर्वार्थां साधक हनुमंत । श्रीरघुनाथ तुष्टला ॥३७॥
ऐसे अनुवादोनि गुण । संतोषोन रघुनंदन ।
देवोनि हनुमंता आलिंगन् । सुखसंपन्न स्वये केला ॥३८॥
सुखसंपन्न सुरगण । सुखसंपन्न सिद्ध चारण ।
सुखसंपन्न वानरगण । रणी कुंभकर्ण पाडिला ॥३९॥

तं तु भूमौ निपतितं रक्षा विक्षिप्तभूषणम् ।
राक्षसानां सहस्रे द्वे कायेनातिव्यपोथयत् ॥३९॥
स चातिकायो हिमवत्प्रकाशो रक्षोधिपस्तोयनिधेः समीपे ।
ग्राहान्परान्मीनवरान्मुजंगान्विक्षोभ्य भूमिं च तथा पपात ॥४०॥
सवेगं पतता लंका प्राकारास्तोरणानि च ।
तस्मिन्निपतिते भूमौ चक्षुमे च महोदधिः ॥४१॥

कुंभकर्णाच्या शरीरावयवपाताने अनेक जीवांना त्रास :

मुकुट कुंडले सालंकार । विक्राळ दंष्ट्रा दशन क्रूर ।
कुंभकर्णाचे दीर्घ शरीर । रामे सत्वर छेदिले ॥१४०॥
श्रीरामे शिर छेदोनि बाणी । सवग पाडितांचि धरणी ।
दोन सहस्र राक्षसश्रेणी । दडपोनि रणी निमाले ॥४१॥
दडपोनि मारावया श्रीरामासी । धड गडबडितां आवेशी ।
असंख्य दडपिलें राक्षसांसी । अति आवेशी रणमर्दे ॥४२॥
शरीर रणवेगे गडबडित । जावोनि पडिले समुद्रांत ।
तेथे जळचरांचा विघात । केला वृत्तांत तो ऐका ॥४३॥
तिमि तिमिंगिळ मत्स्य मगर । कच्छप नक्र जळचर ।
या अवधियाचा करिता चूर । गेले सत्वर पाताळा ॥४४॥
कुंभकर्ण पडता तळी । भूकंप जाला ते काळी ।
गडबडिल्या लंकापौळी । समुद्र ते काळी उचंबळला ॥४५॥
बैसतांचि रसातळीं । महाभुजंगाच्या मेळी ।
पन्नग दडपले देहातळी । नेटेंपाटे बैसला ॥४६॥
जैसा हिमाचल गिरिवर । तैसे शरीर महाथोर ।
करित जळचरांचा चकचूर । गेले सत्वर रसातळा ॥४७॥

राक्षस-सैन्याची लंकेला माघार :

रणी मारिता वानर । उरले जे का निशाचर ।
दीर्घ करोनि बोंबस्वर । रणी सत्वर पळाले ॥४८॥
युद्धाभिघातें अति आंत । रणमारे जर्जरीभूत ।
कण्हत कुंथत कापत । लंकेआंत पळाले ॥४९॥
जेंवी इंद्रे मारिला वृत्रासुर । तेंवी रामे मारिला महावीर ।
सुमनें वर्षती सुरवर । जयजयकारें गर्जोंनी ॥१५०॥
एका जनार्दना शरण । रणी मारोनि कुंभकर्ण ।
विजयी जाला रघुनंदन । सुखसंपन्न कपिकुळें ॥५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
कुंभकर्णवधो नाम अष्टविंशतिमोऽध्यायः ॥२८॥
ओंव्या ॥१५१॥ श्लोक ॥४१॥ एवं ॥१९२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग