मायबाप सवे नये धनवित
3294.
मायबाप सवे नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥
म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवू ॥धृपद॥
आयुष्य शेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हे ॥२॥
तुका म्हणे काळे लावियेले माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥३॥
अर्थ :
मेल्यानंतर तुझ्याबरोबर तुझे आई, बाप, धन, वित्त कोणीच येणार नाही जे तू पुण्यकर्म पापकर्म करशील तेच संचित तुझ्याबरोबर येईल आणि त्याच्यानुसारच तुला भोग भोगावे लागतील. म्हणूनच आपला लाभ कशात आहे याचा तू विचार कर प्रपंचित चालीरितींवर चित्त ठेवू नकोस. अरे आयुष्य तर शेवटी तर संपणारच आहे कारण तुझे शरीरच हे खरे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे काळ तुझ्या आयुष्याचे मापच लावून बसलेला आहे त्यामुळे तू सावध हो तू जे काही पाप पुण्यकर्म करशील ते सर्व कर्म तो तुझ्या नावावर जमा करीत आहे.
