विकट विकास विनट रूपस
71.
विकट विकास विनट रूपस । सर्व हृषिकेश दिसे आम्हा ॥१॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । उन्मनिनिर्धारे भोगू आम्ही ॥२॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा । लेशु त्या पापाचा नाही तेथे ॥३॥
निवृत्ति म्हणे ते सुखरूप कृष्ण । दिननिशी प्रश्न हरि हरि ॥४॥
अर्थ:
ह्य जगतात काही रुप विक्राळ, प्रचंड, कुरुप आहेत. व काही रुप सुंदर साजिरी असली तरी ती सर्व एकत्वाने त्या हृषिकेश रुपात एकवटली आहेत. पण सुंदर शोभिवंत असे नंदाच्या घरी अवतरलेले कृष्ण रुप आम्ही उन्मनी अवस्थेत भोगत आहोत. असे रुप ज्याच्या मनात संचरते त्याच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तोच सुखरुप असलेला परमात्मा कृष्णरुपनामाने हृदयातील नामरुप प्रश्नांचे नामरुप उत्तर होतो.
