संत राका कुंभार
2263.
संत राका कुंभार
कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥
पंढरीक्षेत्रांत राहता आनंदे । वाचे गोविंद आळविती ॥२॥
करिती आपुला स्वकर्म व्यवहार । वाचे निरंतर रामनाम ॥३॥
घडोनि भाजणे ठेविली घरांत । व्याली डेरियांत मांजर ते ॥४॥
न देखिता त्याने आवा तो रचिला । अग्नि तो लाविला तेचि वेळा ॥५॥
फिरूनि मांजर घरासि ते आली । नाहींत ती पिल्ली डेरा तोही ॥६॥
आव्यापाशी तेव्हा आली ती धांवत । ओरडत फिरत भउताली ॥७॥
पाहूनि राका समजला मनी । आहा चक्रपाणी काय केले ॥८॥
जळो जळो माझा प्रपंच व्यवहार । नाही म्या विचार केला देवा ॥९॥
करावया गेलो प्रपंचाचे हित । पापाचे पर्वत झाले माथा ॥१०॥
अज्ञान ही बाळे जळतील आता । धांव पंढरीनाथा येचि वेळा ॥११॥
पांडव ते रक्षिले लाक्षाते जोहरी । तैसी करी परि पिल्लियांसी ॥१२॥
आगीमाजी तुवा प्रल्हाद रक्षिला । अगाध हे तुला काय झाले ॥१३॥
रक्षी यासी आता येऊनिया अंगे । घेईन वैराग्य नवस हाचि ॥१४॥
तिघांजई तेव्हा त्यजिले अन्नपाणी । धांव चक्रपाणी लवलाही ॥१५॥
तीन रोज झाले शांत झाला अग्नि । पाहाती उकलूनि आवा तेव्हा ॥१६॥
सर्वस्व भाजणे भाभूनिया गेली । खेळताती पिल्ली डेरियांत ॥१७॥
कच्च असे डेरा नसे आंच त्याला । माझे नवसास पावला पांडुरंग ॥१८॥
पाहती सकळ पंढरीचे लोक । अगाध कवतुक देवाजीचे ॥१९॥
आनंदोनी राका बोलवी ब्राम्हण । दिले ते लुटून घर तेव्हा ॥२०॥
वेंचूनिया चिंध्या लाविती ढुंगासी । भावे ह्रषिकेशी आळविती ॥२१॥
जाऊनिया वनी वेंचिताती काष्ठे । उदरापुरते विकिताती ॥२२॥
अखंड करिती नामाचा गजर । ध्यानी मनी वर रखुबाईचा ॥२३॥
बंका गेली असे चंद्रभागे स्नाना । नामयाचि कन्या धुया आली ॥२४॥
बंका बोले बाई सिंतोडे येतील । ऐकूनिया बोले येरी तिसी ॥२५॥
जातीची कुंभार कामीक वैराग्य । घेतलेंसे सोंग कासीयासी ॥२६॥
ऐकूनिया बंका करीत उत्तर । बौद्ध अवतार पांडुरंग ॥२७॥
रडका हा नामा घॆतलीसे आळी । त्याने वनमाळी बोलविला ॥२८॥
अबोल हा देव बोलविला याने । काय थोरपण आले यासी ॥२९॥
वाढविली कीर्ति जगांत डांगोरा । बोलविला खरा पांडुरंग ॥३०॥
चंद्रभागे तीरी झाला वृत्तांत । श्रुत झाली मात नामयासी ॥३१॥
नामदेव तेव्हा आले राउळासी । विनंति देवासी करुनी बोले ॥३२॥
राकाकुंभाराने घेतलेंसे वैराग्य । कांहो केला त्याग संसारींचा ॥३३॥
बोले पांडुरंग निष्काम हे भक्ती । दावितो प्रचिती तुजलागी ॥३४॥
विठ्ठल रखुमाई नामा असे संगे । आली तेव्हा तिघे बनाप्राती ॥३५॥
रुक्मिणीने तेव्हा काढुनी कंकण । ठेविले झांकून काष्ठामाजी ॥३६॥
राका बंका वंका वेंचिताती काष्ठ । आली अव्चित तया ठाया ॥३७॥
उचलिता काष्ठ देखिले कंकण । दिले ते ढाकून तेचि वेळा ॥३८॥
म्हणती याजलागी विटाळ जाहला । न घेती तयाला म्हणोनिया ॥३९॥
पाहुनी रुक्मिणी विस्मय करीत । निष्काम हे भक्त देखीयेले ॥४०॥
बोले रखुमबाई अहो पांडुरंगा । भेटावे श्रीरंगा याज लागी ॥४१॥
नामा म्हणे देवा वंदितो मी चरण । धरा आलिंगून तिघांजणा ॥४२॥
होती हे आवडी देवाजीचे चित्ती । आलिंगिली प्रीती तिघेजण ॥४३॥
राका बंका वंदिती चरण । कांहो येणे केले देवराया ॥४४॥
उष्णकाळ दिन श्रमली माझी आई । बैसा रसुमाबाई छायेखाली ॥४५॥
ऐसी असे ज्याची देवावरी माया । करी त्यासी दया पांडुरंग ॥४६॥
नामदेव बोले त्यचा मी हा दास । शरण तयास वारंवार ॥४७॥
