संत जगमित्र नागा.
2253.
संत जगमित्र नागा.
परळी वैजनाथी जगमित्र नागा । ध्यानी पांडुरंगा आठवीत ॥१॥
सर्वांभूती त्यासी दिसे वासुदेव । नाही दुजाभाव त्याचे मनी ॥२॥
निद्य आणि वंद्य लेखितो सारिखे । पाहे ब्रह्मरूप सर्वत्रांसी ॥३॥
रात्रंदिवस करी हरीचे भजन । सुखे आनंदाने राहतसे ॥४॥
सज्जन हे त्यासी बहुत मानिती । दुर्जन द्वेषिती त्याज लागी ॥५॥
परि त्याचे चित्ती वाटेना हे दु:ख । मानी प्रेमसुख आनंदाने ॥६॥
दुर्जनांनी त्याच्या घरासी तो अग्नि । लाविला येऊनि रात्रीमध्ये ॥७॥
अग्नि मोठा तेव्हा प्रदिप्त तो झाला । वृत्तांत कळला सज्जनांसी ॥८॥
धांवुनी ते आले पाहती नयनी । कांहो चक्रपाणी ऐसे केले ॥९॥
तुजवीण कोण राखे यासी आता । धांव तू अनंता येचि वेळा ॥१०॥
पांडव राखिले लाक्षांतून जो हरी । तैसी करी परी नागयासी ॥११॥
येथे नाही देवा कोणाचा उपाय । घाली आता घाय पांडुरंगा ॥१२॥
प्रल्हाद रक्षिला अग्नि तो माझारी । तैसी करी परी त्यासी आता ॥१३॥
ब्रीद हे सांभाळी आपुले अनंता । राखी आता भक्ता आपुलिया ॥१४॥
ऐकोनिया स्तुस्ति आले नारायण । शांत झाला अग्नि तेचि वेळा ॥१५॥
स्वस्थ असे नागा आनंदाने सुखे । पाहती सर्वलोक परळीचे ॥१६॥
सज्जन संतोष अंतरी मानिती । धांवण्या श्रीपति धाविन्नला ॥१७॥
दुजेंनांची तेव्हा तोडे जाहली काळी । साह्य वनमाळी भक्तालागी ॥१८॥
चाहुर एक भूमी इनाम त्या दिली । पत्रिका लिहिली त्याच्या नांवे ॥१९॥
ग्रामवासी त्यासी पिकवुनी धान्य । देती ते नेऊन नाग्या घरी ॥२०॥
वारसीक नेम चालविती लोक । आला नवा एक अमलदार ॥२१॥
करोनी पाहणी मागतसे सारा । नायके विचारा कोणाचिया ॥२२॥
तयासी उत्तर करिती ग्रामवासी । नवसिले देवासी सर्वत्रांनी ॥२३॥
जगमित्न नागा हरिचा तो भक्त । सांगती वृत्तांत त्याजलागी ॥२४॥
याचे मनी नाही कांही दुजा भाव । सर्वांभूती देव पाहतसे ॥२५॥
कृपावंत असे यासी चक्रपाणी । नका तुम्ही मनी आणू दुजे ॥२६॥
मनामाजी त्याने केला तो विचार । पाहू चमत्कार याचा आता ॥२७॥
जगमित्र नागा त्याने बोलाविला । बोलता त्या झाला सुभेदार ॥२८॥
आमुचिया घरी मुलींचे ते लग्न । व्याघ्राचे कारण असे आम्हा ॥२९॥
घेऊनिया आता यावा तुम्ही व्याघ्र । म्हणविता जगमित्र पाहू कैसे ॥३०॥
व्याघ्ररूप असे माझा नारायण । येतो मी घेउनी आतांची हा ॥३१॥
आनंदाने नागा निघाला तेथुनी । आला असे वनी अरण्यांत ॥३२॥
धांवूनिया तेथे आले पांडुरंग । पुसतसे अंगे त्याजलागी ॥३३॥
कोठे जासी बापा घोर अरण्यांत । भय असे तेथे श्वापदांचे ॥३४॥
मारतील तुज फिर तु माघारी । येरु म्हणे हरि रक्षी आम्हा ॥३५॥
सुभेदार माझा असे परम मित्न । पाहिजे हा व्याघ्र त्याजलागी ॥३६॥
येरु म्हणे सुभेदार आहे नष्ट । काय त्याची गोष्ट ऐकसी तू ॥३७॥
तया चांडाळासी वधितो मी आता । झाला तो बोलता जगन्मित्रा ॥३८॥
तूंचि हा चांडाळ बोलसी या गोष्टी । नको करू कष्टी मित्र माझा ॥३९॥
जाय तू वाटेन आपुल्या या आता । होतसे बोलता उशीर मज ॥४०॥
व्याघ्र तेचि वेळा जाहले नारायण । धरी आलिंगुनी नागा त्यासी ॥४१॥
गळांत्याचे तेव्हा बांधिले अंगवस्त्र । घेऊनिया व्याघ्र आला नागा ॥४२॥
भयाभीत झाले तेव्हा ग्रामवासी । लावियेया वेसी गांवीचिया ॥४३॥
ग्रामवासी यांनी लावियेले द्वार । करी सुभेदार विचार तेव्हा ॥४४॥
करीत गर्जना भयानक व्याघ्र । कांपती थरथर सकळ लोक ॥४५॥
जगमित्र नागा आला वेसीपासी । उघडा द्वारासी हांका मारी ॥४६॥
ऐकोनिया कोणी न देती उत्तर । मोडियेले द्वार व्याघ्राने ते ॥४७॥
प्रवेशला नागा सुभेदारा घरी । हांका त्यासी मारी यावे आता ॥४८॥
करा करा कार्य सिद्धि घेऊनिया व्याघ्र । हांका वारंवार मारीतसे ॥४९॥
द्वारपाळ त्याचे नुघडिती द्वार । मोडोनिया व्याघ्र शिरे आंत ॥५०॥
करीत गर्जना आपटूनि पुच्छ । जाहले भयाभीत सकळ लोक ॥५१॥
सुभेदार होता जया मंदिरांत । व्याघ्र नागा आंत गेले दोघे ॥५२॥
सुभेदार बोले द्वाराचे आंतून । देई जीवदान मज आता ॥५३॥
पतीत मी पापी तुझा शरणागत । होई कृपावंत जगमित्रा ॥५४॥
कर जोडोनिया करितो विनंती । अज्ञानाची भ्रांति झाली मज ॥५५॥
वारंवार तुज घेतो लोटांगणी । देई वा सोडोनी वनी व्याघ्र ॥५६॥
कृपावंत साधु वर्णिताती वेद । करी अपराध क्षमा माझा ॥५७॥
ऐकोनिया व्याघ्र गर्जना करीत भक्षावया धांवत त्याजलागी ॥५८॥
जगमित्र नागा अवरीत त्यासी । चाल तू वनासी मायबापा ॥५९॥
घेऊनिया व्याघ्र चालिला जगमित्र । पाहती सर्वत्र लोक तेव्हा ॥६०॥
भक्तांनी जिंकिला भाव बळे देव । घालीतसे धांव संकटी तो ॥६१॥
संतांचा महिमा न वर्णवे कांही । जाहला लीन पायी नामदेव ॥६२॥
