भाग्यवंत आम्ही विष्ण
3258.
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥१॥
नाही ते पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखे ॥धृपद॥
प्रीति अंगी असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखे ठायी ॥२॥
आपुल्या स्वभावे जैसे जेथे असो । तैसे तेथे दिसो साजिरेचि ॥३॥
वासनेचा कंद उपडिले मूळ । दुरिते सकळ निवारिली ॥४॥
तुका म्हणे भक्तजनांची माउली । करील साउली विठ्ठल आम्हा ॥५॥
अर्थ :
या संपूर्ण जगामध्ये आम्ही विष्णूदास भाग्यवंत आहोत कारण प्रसंग कोणताही येवो आमच्या अंगामध्ये जे धैर्य आहे ते कधीही भंगत नाही. ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे व जी गोष्ट आमच्याजवळ नाही अशी गोष्ट आम्हाला विठू माऊली आणून देते आणि आमच्यासाठी ती गीत गाऊन आम्हाला प्रेमसुख देते. या विठूबाई माऊलीच्या अंगी आमच्याविषयी खूप प्रेम आहे त्यामुळे आम्ही काहीही जरी नाही केले तरी सर्व काही जागच्या जागीच आमच्याजवळ जे आम्हाला हवे आहे ते येते. आम्ही आमच्या स्वभावाने ज्या ठिकाणी जेथे कोठे असो तेथे आम्ही शोभूनच दिसतो. आम्ही वासनेचा जो मूळ गंध आहे तो म्हणजे अविद्या अज्ञान तोच उपटून काढला आहे आणि सर्व पातकांचा नाश देखील करुन टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा भक्तजणांवर आमची विठू माऊली नेहमी तिची कृपेची छाया करीत राहील.
