गोधवने चारी गोपाळांस
76.
गोधवने चारी गोपाळांसवे । चोरूनी शिदोऱया त्यांच्या खाय ।
नाही म्हणोनी खरी आण वाहे। खोटे खरे तेथे न पाहे ॥१॥
ऐसा वैकुंठींचा सांवळा हरी । खेळू खेळे गोकुळा माझारी ।
बाळपणी केल्या दैत्या भोंवरी । पांडवा साहाकारी हरि जाला ॥२॥
इंद्र कोपता शिळा धारी । नखावरी धरियेला गिरी ।
काळिया कंसासुरा मारी । तोचि श्रीहरी पंढरीये ॥३॥
चोखा म्हणे भावाचा लंपट । म्हणोनी नावडे वैकुंठ ।
येथे आवडले वाळवंट । पुंडलिक पेठ आवडी ॥४॥
