वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 19. संत भानुदास › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94 › 12. मांभळभट

संत भानुदास अभंग मां

🙏 19. संत भानुदास · ABH-074184 · अभंग क्र. ९३

९३.
संत भानुदास अभंग मांभळभट

कंसराव चिंता करी । नवल बालकाची परी ।
या गोकुळामाझारी एक अरिष्ट वर्तले ॥१॥
आमुच्या सकळिका प्रधाना । माजी बलिवंत पूतना ।
विष भरोनियां स्तना । पांजुं तया पाठविली ॥२॥
तवं तो वेताळ की पिशाच्च । काळभैरव की राक्षस ।
त्याने केला तिचा ग्रास । विषासहित शोषिलें ॥३॥
तो अवतरला गोकुळी । दैत्य दानव मर्दन बळी ।
जिनें बाळके शोषिलीं । तेहि शोषिली पूतना ॥४॥
आम्ही दुष्टबुद्धि केली । बहिण देवकी पीडिली ।
तेची बाळके वधिलीं । आपुलें अरिष्ट चुकवावया ॥५॥
तंव ते न चुकतां पातले । विघ्न नसतांचि उगवलें ।
आम्ही जाणतो इतुलें । तरी कृश्ण आणा बांधुनी ॥६॥
एवं माभळभट उठिला । तेणे विडा मागितला ।
निरंजनी सांडवीन तान्हुला । जो गोकुळी वाढतसे ॥७॥
ऐसे वचन ऐकोनी । विडा दिधला ततक्षणी ।
आपुल्या आश्रमा जाऊनी । काय करिता जाहला ॥८॥
मग बोले स्त्रियेसी । आम्ही जातों गोकुळासी ।
बाळक जालें यशदेसी । तें सांडवीन निरंजनी ॥९॥
ऐसे बोलोनी निघाला । मार्गीं जातसे एकला ।
तंव श्रीकृष्ण हासिन्नला । हा विप्र भ्रमित जालासे ॥१०॥
गोकुळ ठाकिलें बिडालें । देखे उपलिया धवलारे ।
तेथीचीं माणसे अति नांगरें । लेणीं लुगड़ी मिरवती ॥११॥
कृष्ण अवेधें वेधलीं । अवघी देवरुप जाहलीं ।
वाचेसी सरस्वती आली । तैसें मधुर बोलती ॥१२॥
आला नंदाच्या मंदीरा । उपमा दिसे क्षीणसागरा ।
तेथीच्या गौळणी असती सुंदरा । परिये देती कृष्णाते ॥१३॥
वृद्ध बहुकाळ ज्योतिषी । देखोनि हारिखली मानसी ।
यशोदा लागली पायासी । साउमेयासी म्हणीतलें ॥१४॥
पाट बैसकेचा घातला । पुढें तिसरा ठेविला ।
येरें आशिर्वाद दिधला । मग कुशलता पुसिली ॥१५॥
तंव त्या कृष्णाते दाविती । पहा हो याची जन्मतिथी ।
येरे उकलिती प्रीती । चंक्रांकिता साजिरी ॥१६॥
शनि मंगळराहु केतु । दुष्ट ग्रह ऐसे सांगतु ।
रोहिणी नक्षत्रु अष्टमी आंतु । भिन्नरात्री उपजला ॥१७॥
पुढें विघ्न असे थोर । मागें एक चुकलें गंडांतर ।
कंसरायाचे भय फार । या बाळकासी असे ॥१८॥
दैत्य करिती वळवळा । मेघ वर्षती शिळा ।
गोकुळ सांडुन अवघे पळा । ऐसा अनर्थ होईल ॥१९॥
पुत्र नव्हे हो लहाणा । हा तुम्हे वोपा का पोसणा ।
हासिन्नला यादवराणा । मग विंदान मांडिले ॥२०॥
होता बैसकेचा पाटु । तेणे घेतला उचाटु ।
पिढीयाचा खडखडाटु । घरोघरी सुटला ॥२१॥
भट वाचित होता पाताडें । तें तंव मुखी आदळालें पिढें ।
येर सुजविलें थोबाडे । मग भयबीत पळतु ॥२२॥
रागे सुजविलें पाताडे । म्हणे गौळिये लाताडें ।
आम्हा जोशिया केव्हडे । पिढेंदान दिधले ॥२३॥
तंव त्या विशाळ काठवटी । लागती माभळभटापाठीं ।
तिवया सिराळीं तिखटीं । पाठी पोटीं रुपताती ॥२४॥
तेला तुपाचींमापें । डवले खोडवे आमुपें ।
बडगे खुंटे खुटें भलिया कोपे । पूजा बांधती मस्तकी ॥२५॥
थोर आवेशा चढले चाटु । म्हणती यातें सगळें घाटु ।
लाटणें म्हणती भोईसी लाटुं । ऐसा दृष्ट काय किजे ॥२६॥
शाळिग्राम गडबडिले । देवपाट साह्र आले ।
अर्गळांचे सळ सुटले । खिळखिंळिले खिळखंबे ॥२७॥
थोर विसुरा केला डांगी । मार्ग रुंधिला चौरंगीं ।
मुसळें कांडावयालागीं । भोंवता वेढा घातला ॥२८॥
होते रवियांचे नाथलें । देह नवनीतें माखिलें ।
तें येऊन सर्वागी बैसलें । हिवें ऐसे मवाळ ॥२९॥
नव्हे नव्हे गा जोशी । राख राख हृषीकेशी ।
उखळा मुसळांचिया राशी । दाही दिशा व्यापिल्या ॥३०॥
पाठी पिढियाम्छॆ मेळ । तिही झांकिलें रविमंडळ ।
गजबजिलें लोकपाळ । नव्हे गोकूळ सोपारें ॥३१॥
माभळभटाचिया झडपणीं । देखोनि पळालिया गौळणी ।
दह्मा दुधाचिया सांजवणीं । पिढा भरणी फुटती ॥३२॥
देखे मांदियाचे थाट । त्यामाजी शीरे माभळभट ।
म्हणे गोकुळींचा शेवट । दैवयोगे पातलों ॥३३॥
शेतीं होती तिफणीं । नांगर कुळवांची रुमणीं ।
पाठी लागलिया दणाणी । भटजी आमुचा स्वयंपाक ॥३४॥
ब्राह्मण म्हणोनि राखिला । धोत्रे पाताड्या मुकला ।
मथुरा प्रांत ठाकिला । नग्न हिंडे राजबिंदी ॥३५॥
देखोनि दैत्यसभा घन दाट । उठा उठा आले पाट ।
धापा फुटो पाहे पोट । पुसे वाट घराची ॥३६॥
कंसासी सांगतिला वृत्तांतु । अझून काय रे निश्चितु ।
बळिया वैकुंठीचा नाथु । तो गोकुळीं वाढतसे ॥३७॥
ते वेळी कागासुर बकासुर । तृणावर्त दैत्य आघासुर ।
मुष्टिक चाणुर वीर । तिही विडे मागितले ॥३८॥
थोर बोलती पैजा । आम्ही निर्दाळुं बोजा ।
ये कथेसीचित्त दीजा । विनवो तुम्हा संतानोम ॥३९॥
देवा भानुदास म्हणे । श्रोते कोपतील झणें ।
पंढरीरायाचे योगाने । हा विनोद गाइला ॥४०॥

संत भानुदास अभंग मांभळभट समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग