संत भानुदास महाराज अ
संत भानुदास महाराज अभंग गाथा
१.
अद्वैत
उद्भवला ॐकार त्रिमातृकेसहित ।
अर्थ मातृके परतें प्रणवबीज ॥१॥
माया महत्तत्त्व जाले तिन्ही गुण ।
चौ देहांची खूण ओळखावी ॥२॥
अंतःकरणी जाला तत्त्वांचा प्रसव ।
पंचतत्त्वें सर्व रुपा आली ॥३॥
पांचहि गुण जाले पंचवीस ।
परि भानुदास वेगळाची ॥४॥
२.
षड्विकार आणि सप्त चक्रावळी ।
अष्ट भिन्न जाली प्रकृत ते ॥१॥
नावनाडी रचन दश इंद्रियांची ।
अकराव्या मनाची गति तूंचि ॥२॥
विषय इंद्रिय वासना उप्तत्ती ।
तुजमाजी येती जाती सर्व ॥३॥
चिन्मयाचा दीप साक्षित्वासी आला ।
भानुदास त्याला नाम जालें ॥४॥
३.
वाचा आणि अवस्था भोग अभिमानी ।
पुरुषार्थ खाणी चारी मुख्य ॥१॥
कीटक भ्रमर जंगम स्थावरत्व ।
भरले महतत्त्व कोंदाटोनी ॥२॥
चेताविता याला कोण आहे येथे ।
ओहं सोहं भाते लाऊनिया ॥३॥
फुंकितो तो कोण आणिक दुसरा ।
वर्म गुरुपुत्रा न कळेचि ॥४॥
सृष्टिचा उभारा केला तो संकल्प ।
भानुदास दीप प्रज्वळिला ॥५॥
४.
तुजपासाव सर्व परी तू नोहेसि ।
ऐसे आपणासी बुझे बापा ॥१॥
कर्तृत्व करुनि आहे तो निराळा ।
परब्रह्मा निर्मळ मळ नाही ॥२॥
देहाचिये ऐसी कारुनी निराळा ।
स्वस्वरुपीं ठसा ठसलासि ॥३॥
चिन्मयरुप मूळ ॐकार बीज ।
भानुदासीं निज लाधले तें ॥४॥
५.
जोडीचे घोंगडें येव्हढीये राती ।
कानींची कुंडले करी जगा ज्योति ॥१॥
वोळखिला वोळखिला खुणा ।
वोळखिला माय पंढरीचा राणा ॥२॥
होये न होये ऐसा संशय गमला ।
निर्धारितां विश्वव्यापक देखिला ॥३॥
हृदयमंदिरी दाटोनी धरावा ।
ही खुण सांगे भानुदास देवा ॥४॥
६.
तुज पाहू जाता नये कांहीं हाता ।
अससी तत्त्वता साध्य नाही ॥१॥
तुझा तूंचि मागें परतोनि पाहें ।
तुजपाशी आहे भुलुं नको ॥२॥
पिंडीं ते ब्रह्मांडी बोलताती वेद ।
होई तू सावध भुलूं नको ॥३॥
भुललिया माया श्रम तुज झाला ।
फिरसी वेळोवेळां चौर्यायंशी ॥४॥
चौर्यायंशी आवर्तनें होती गा तुज ।
सांगतसे गुज जीवी धरा ॥५॥
भानुदास म्हणे सदगुरु कारणे ।
पुरवील तुमचे पेणें निश्चयेंसी ॥६॥
७.
अवतारादिक जाले कर्मभूमीं आले ।
विश्व जनीं दोखिलें आपुले डोळा ॥१॥
देखिल्या स्वरुपा नुद्धरे काय जन ।
तें काय म्हणोन सांगो स्वामीं ॥२॥
उद्धरत काय नहीं आत्मज्ञान ।
देखिले तें जाण सर्व वाव ॥३॥
वाव म्हणो तरी कोंदले स्वरुप ।
लावलिया माप मोजवेना ॥४॥
देखत देखत वेडावल जन ।
रूप डोळेवीन पाहू जाती ॥५॥
भानुदास म्हणे सदगुरुच्या लोभे ।
आहेचि ते उभे विटेवरी ॥६॥
संत भानुदास अभंग अद्वैत समाप्त
