धरूनि हे आलो जीवी ।
2827.
धरूनि हे आलो जीवी । भेटी व्हावी विठोबासी ॥१॥
संकल्प तो नाही दुजा । महाराजा विनवितो ॥धृपद॥
पायावरी ठेविन भाळ । येणे समुळ पावलो ॥२॥
तुका म्हणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥३॥
अर्थ :
विठोबाची भेट व्हावी हेच मनात धरुन मी येथे आलो आहे. महाराजा विठोबा शिवाय दुसरा कोणताही संकल्प माझ्या मनामध्ये नाही. मी माझे कपाळ त्याच्या पायावर ठेवीन मग मला सगळेच प्राप्त् झाल्यासारखे होईल. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा मी माझे डोळे भरुन हरीचे श्रीमुख पाहीन.
