मग ओवाळूनिया मृतिका
58.
मग ओवाळूनिया मृतिका ।
घेतले उचलुनि यदुनायका ।
यशोदा म्हणे हे बाळका ।
वरूनि अरिष्ट चुकले ॥१॥
नव्हे शकटे तो मायावी दैत्य ।
आला होता करावया घात ।
कृष्ण ताडिला तो यथार्थ ।
पूतनेऐशी परी केली ॥२॥
तेणे दिधली आरोळी ।
न्या हा उठे तो अंतराळी ।
परी नाही भयाची काजळी ।
सावध वनमाळी सर्व गुणे ॥३॥
ऐसे क्रमिले काही दिवस ।
तव राये पाठविले लोकास ।
मग येऊनि गोकुळास ।
पुनिरपि वस्ती राहिले ॥४॥
कृष्ण खेळता आंगणी ।
गडी म्हणती सारंगपाणी ।
हाराळी नूतन हे कापुनी ।
चारू वत्सासि आपुलिया ॥५॥
तव तो तृणावृत दैत्य ।
हाराळी रुपे होता तेथ ।
इच्छूनिया कृष्णघात ।
तव तो हरीने ओळखिला ॥६॥
म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे ।
येथे दिसत असे हे कुडे ।
रहा अवघे मागलिकडे ।
आपण् पुढे संचारला ॥७॥
तेणे देखताचि श्रीहरी ।
वदने काढिली तृणांकुरी ।
शते सहस्त्र लक्षवरी ।
रुपे धरुनिया ठाकला ॥८॥
भयानके अति विक्राळे ।
दाढा दंत दीर्घ शिसाळे ।
आवाळुवे चाटीत आवेश बळे ।
कृष्णा अंगी झगटला ॥९॥
निळा म्हणे कवळूनिया मुष्टी ।
मुख्य तृणासुराची झोटी ।
उपटूनिया भूमी नेहटी ।
शतचूर्ण करुनि सांडिला ॥१०॥
