राधाविलास - अभंग ७८
78.
राधाविलास - अभंग ७८ ते १०२
एके दिनीं प्रातः काळी । कृष्णें घेतलीसे आळी । देखोनिया उदय मेळी । सुर्यबिंब ॥१॥ देई देई मज ते आई । रडत बैसला हो बाई । काय सांगो हो सई । या बाळाते ॥२॥ मांडिलें विंदान । न कळे कोना महिमान । रडतां राहिना पुर्ण । तो देखे राधिका ॥३॥ राधा म्हणे कृष्णांसी । का रे चोरा रडतोसी । येरु म्हणे गोळा दे मजसी । मग मी न रडे ॥४॥ उचलोनी काखेसी घेतला । तंव तो रडतां राहिला । यशोदा म्हणे राधिकेला । नेई घरा कृष्णतें ॥५॥ घेऊनियां झडकरीं । घरी आली सत्वरीं । सुमनांचे सेजेवरी । पहुडविलें कृष्णा ॥६॥ घरी देखोनी एकांत । चुबन देउनि बोले माते । अससी धाकुटी बहुत । नचले कांही ॥७॥ तंव बोले वनमाळी । थोर होतो हेचि वेळी । डोळे झांकीं तू वेल्हांळीं दावी विंदान ॥८॥ नेत्र झाकिता ते क्षणी । जाहला निमासुर तरुणी । षोडश वर्षी मोक्षदानी । देखे राधिका ॥९॥ धांउनी घातालीसे मिठी । हरुष न समाये पोटी । शयन सुखें गोष्टीं । करी कृष्णांसी ॥१०॥ असता सुखें एकांतासी । भ्रतार आला ते समयासी । उभा राहुनि द्वारासी । हांक मारी ॥११॥ ऐकता भ्रतारांचें वचन । घाबरलें राधिकेचें मन । धरी कृष्नाचे चरण । सान होई ॥१२॥ कृष्ण बोले हास्यमुखे । मंत्र विसरलो या सुखें । आता होणार ते सुखें । होवो यावरी ॥१३॥ भक्तांचे मानसींचा चोर । पाहूनिया तो विचार । पुर्ववत साचार होऊनि रडे ॥१४॥ दही भात कालवुनी । ठेविला पुढे आणुनी । बोले आनयासी प्रती वचनी । क्षणभरी बैसा ॥१५॥ जेवितसे कृष्णनाथ । क्षणभरी बैसा स्वस्थ । ऐकतांचि ऐशीअ मात । निवांत बैसे ॥१६॥
मग द्वार उघडिविलें । राया कृष्णाते देखिले । मन ते मोहिलें । अनायांचे ॥१७॥ आनया बोले राधिकेसी । गृहीं नगमें तुजसी । क्षणभरी कृष्णासी । आणीत जाई ॥१८॥ तुमची आज्ञा प्रणाम । म्हणोनि वंदिले चरण । एका जनार्दनी समाधान । पावले दोघे ॥१९॥
